काँग्रेसच्या पराभवाचे मंथन कधी होणार?

    13-Mar-2023
Total Views |
Congress lose elections

पुणे : पिंपरी-चिंचवड आणि कसबा या मतदारसंघात पार पडलेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवाराने दणदणीत विजय मिळवत, मविआच्या उमेदवाराला पराभूत केले. तर कसबा येथे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. याठिकाणी मविआचा उमेदवार विजयी झाला. पण कसबा मतदारसंघात भाजपचा पराभव होताच, मविआच्या नेत्यांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली.
 
मविआतील काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून, कसब्यात भाजपचा पराभव झाला. आता देशभर होणार. जनतेने नाकारले, अशी विधाने करण्यात आली. मुख्य म्हणजे निवडणूक म्हटलं कि त्यात हार जीत असते. कसब्यात मविआच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराला पराभूत केल्याचे मविआचे नेते सांगत आहेत. पण पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या महिला उमेदवाराने मविआच्या नेत्याला पराभूत केले, हे मविआने विसरू नये.
 
कसब्यात भाजपला जनतेने नाकारले, या मुद्द्यावर मविआचे नेते भरभरून बोलत आहेत. मग पिंपरी-चिंचवडमध्ये मविआने जिंकण्याचा दावा करूनही जनतेने मविआला नाकारले, त्याबद्दलही मविआच्या नेत्यांनी बोलावं. एका ठिकाणी भाजपचा पराभव झाला म्ह्णून तेच चित्र देशभर दिसेल, हा मविआचा दावा निराधार आहे. मुख्य म्हणजे एका पराभवाने फरक पडत नाही. आज देशभरात भाजपची ताकद मोठी आहे.

भाजपला देशवासीयांचे समर्थन दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवले आहे. त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपने बहुमत मिळवत सत्तेत पुनरागमन केले. तर मेघालयमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपने निर्णायक भूमिका बजावली. या तिन्ही राज्यांमध्ये मविआतील काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. तेव्हा देशभर भाजपचा पराभव होणार हे म्हणणाऱ्या मविआच्या नेत्यांनी आधी तीन राज्यात काँग्रेसचा जो पराभव झालाय त्यावर चिंतन करावे. लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडे पाषाण ही अवस्था मविआची झाली आहे.


- मनोहर विश्वासराव, शिवडी

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.