ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह प्रदान केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा गड असलेल्या ठाण्यातील शिवसेना शाखावरून घमासान होण्याची चिन्हे दिसत आहेत. मंगळवारी उबाठा सेनेच्यावतीने खा. राजन विचारे यांनी शाखा बळकावणार्या शिंदे गटाला योग्य समज द्यावी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. याची पोलिसांनी दक्षता घ्यावी, अशी मागणी ठाणे पोलीसआयुक्त जयजित सिंग यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर विधानभवन तसेच, संसदेतील पक्ष कार्यालये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालीत शिवसेनेलाबहाल करण्यात आली, तर आता शिवसेनेच्या शाखाही ताब्यात घेण्याचा सपाटा सुरू झाल्याने ठाण्यात आता ठाकरे गट चांगलाच धास्तावला आहे.
खा. राजन विचारेंच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले. निवेदनात, सर्वोच्च न्यायालयात पात्र अपात्रतेचाव नुकताच निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचा प्रश्न प्रलंबित आहे. असे असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या जुन्या शाखा बळकावण्याचे षड्यंत्र रचले जात आहेत.तेव्हा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी संबंधितांना प्रोत्साहन न देता योग्य समज द्यावी. अन्यथा सर्वस्वी जबाबदारी शिंदे गट आणि पोलीस खात्याची राहील,असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.