कॅनडातील वाढता ‘हिंदूफोबिया’

    02-Feb-2023   
Total Views |
Gauri Shankar Mandir defaced with anti-India graffiti in Canada

अमेरिकेनंतर उच्च शिक्षणासाठी आणि कायमस्वरुपी स्थायिक होण्यासाठी भारतीयांच्या सर्वाधिक पसंतीस उतरणारा देश म्हणजे कॅनडा. म्हणूनच आज लाखो भारतीय कॅनडामध्ये स्थिरावलेले दिसतात. परंतु, कोणेएकेकाळी भारतीयांसाठी अतिशय सुरक्षित आणि सुसंस्कृत देश म्हणून नावारुपाला आलेल्या कॅनडामध्ये सध्या भारतीयांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

विशेषत: कॅनडामध्ये राहणारे हिंदू बांधव भीतीच्या छायेखाली असून, जे प्रकार ब्रिटन आणि नंतर ऑस्ट्रेलियामध्येही निदर्शनास आले, तशाच घटनांना कॅनडामध्येही ऊत आला. धक्कादायक बाब म्हणजे, हिंदूंवर, हिंदूंच्या मंदिरांवर हल्ला चढविणारे इस्लामी जिहादी किंवा वर्णद्वेषी ख्रिश्चन नाहीत, तर भारतातूनच कॅनडामध्ये वर्षानुवर्ष स्थिरावलेले काही खलिस्तानी फुटीरतावादी शीख बांधव आहेत. याचाच प्रत्यय नुकताच कॅनडातील बॅ्रम्पटन शहरात आला.

ब्रॅम्पटनमधील गौरी शंकर मंदिराच्या भिंतीवर ‘खलिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद’च्या घोषणा मोठ्या अक्षरात रंगवल्या गेल्या. एवढेच नाही, तर ‘संत भिंद्रनवाले हे हुतात्मा आहेत,’ असेही ठळक अक्षरात नमूद करण्यात आले. यावरून हे कृत्य खलिस्तानवादी आणि त्यांच्या ‘सिख्ज फॉर जस्टिस’ या बंदी घातलेल्या म्होरक्यांचेच असल्याचे स्पष्ट होते. पण, मग अशी घटना कॅनडामध्ये पहिल्यांदाच घडली का? तर नाही, जुलै 2022 पासून अशा किमान तीन ते चार घटना कॅनडाच्या विविध शहरांमध्ये घडल्या.

गेल्याच वर्षी अशा घटनांच्या धर्तीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडामधील भारतीय तसेच भारतातून कॅनडामध्ये जाणार्‍या प्रवाशांना सावधानतेचा इशाराही जारी केला होता. कॅनडाच्या ट्रुडो सरकारलाही खलिस्तानवाद्यांवर कारवाई करण्याचे भारत सरकारने वेळोवेळी सूचित केले. पण, ट्रुडो सरकारने आजवर भारताच्या या मागणीकडे दुर्लक्ष करुन खलिस्तानवाद्यांना पाठीशी घालण्याचेच उद्योग केले. त्याचाच परिणाम म्हणजे या खलिस्तानींची हिंदूंच्या मंदिराची विटंबना करण्यापर्यंत गेलेली मजल!

कॅनडाचे खासदार चंद्र आर्य यांनीदेखील तेथील संसदेत हिंदूंवरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत, याविषयी सरकारने कठोर पावले उचलण्याची मागणी केली. त्याचबरोबर कॅनडामधील या वाढत्या ‘हिंदूफोबिया’बद्दलही त्यांनी चिंता व्यक्त करुन ट्रुडो सरकारच्या निद्रिस्त कारभारावर ताशेरे ओढले. ज्याप्रमाणे ‘इस्लामोफोबिया’, ‘ज्यूफोबिया’ कॅनडामध्ये बोकाळला, तशीच स्थिती आज हिंदूंबाबत वाढीस लागल्याचे आर्य यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले. यापूर्वीही टोरंटोमध्ये अशाच प्रकारे हिंदू मंदिरांवर आक्षेपार्ह टिप्पणीचे प्रकार घडले होते.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येच तब्बल सहा मंदिरांना खलिस्तानवाद्यांनी लक्ष्य केले होते. पण, अशा घटना वारंवार घडल्यानंतरही ट्रुडो प्रशासनाने खलिस्तानवाद्यांच्या विरोधात तोंडातून ब्रही काढला नाही. त्यामुळे एकीकडे ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून घोषणा करायची, पण हिंदूंच्या, त्यांच्या मंदिरांच्या सुरक्षेसाठी हातावर हात धरुन मूकदर्शक व्हायचे, हाच ट्रुडो आणि कॅनडाचा दुटप्पीपणा! त्यातच कॅनडा आणि मोदी सरकारचे संबंध याच खलिस्तानवाद्यांना पाठीशी घालण्याच्या ट्रुडोंच्या अतिलिबरल धोरणांमुळेच फारसे मधुर नाहीत, हे वेगळे सांगायला नको. पण, अशाप्रकारे कॅनडासारख्या पुरोगामी, लिबरल राष्ट्रात हिंदूंवरच, हिंदू आस्थास्थळांवर हल्ले होणार असतील, तर त्याकडे कदापि दुर्लक्ष करून चालणार नाही, हेही तितकेच खरे.

2021च्या जनगणनेनुसार, कॅनडामधील हिंदूंची लोकसंख्या ही आठ लाखांहून अधिक असून, शीख बांधवांची संख्याही त्याच आसपास आहे. त्यामुळे मतपेढी म्हणून शीख मतदारांइतकेच महत्त्व हिंदू मतदारांचेही. त्यामुळे ट्रुडो सरकारने ‘एसएफजे’सोबत या हिंदूद्वेष्ट्या, भारतविरोधी खलिस्तानवाद्यांच्या मुसक्या आवळायलाच हव्यात, अन्यथा कॅनडामध्ये गुण्यागोविंदाने, आपुलकीने राहणार्‍या हिंदूंनाही आपली वज्रमूठ घट्ट करून या सरकारला हादरा द्यावाच लागेल.

एवढेच नाही, तर या घटनेनंतर हेदेखील सिद्ध होते की, मुसलमानांवर परदेशात होणार्‍या हल्ल्यांनंतर पुरोगाम्यांकडून ‘इस्लामोफोबिया’विरोधात रान उठविले जाते. पण, हिंदूंवरील अशा हल्ल्यांविरोधात याच टोळीतील तथाकथित सेक्युलर मंडळी मात्र मूग गिळून बसतात. तेव्हा, कॅनडा असेल किंवा ऑस्ट्रेलिया, अशाप्रकारे ‘हिंदूफोबिया’विरोधात भारताने वेळोवेळी कठोर भूमिका घेतली आहेच. आता तेथील हिंदूंनीही दबावाखाली न येता, या विरोधात पेटून उठावे आणि मती गोठलेल्या ट्रुडोंचे डोके ठिकाणावर आणावे, हीच अपेक्षा!आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची