पक्षी पिसार्‍यांची परी...

    27-Dec-2023   
Total Views |
Aisha Munshi

पक्ष्यांच्या केवळ पिसांचा संग्रह असणारे, जगातील एकमेव आणि भारतातील पहिले पक्ष्यांच्या पिसांचे संग्रहालय सुरू करणार्‍या ‘फेदर लायब्ररी’च्या संस्थापिका ऐशा मुन्शी यांच्या अनोख्या प्रवासाचे शब्दचित्रण...

वास्तुविशारद क्षेत्रामध्ये चांगला जम बसलेल्या, व्यवसायाला टाळं ठोकून, दोन वर्षांपूर्वी जगातील पहिले आणि अद्याप एकमेव असलेले पक्षी पिसांचे संग्रहालय ’फेदर लायब्ररी’चे दालन उघडणार्‍या ऐशा मुन्शी. अहमदाबादमध्ये जन्मलेल्या आणि लहानाच्या मोठ्या झालेल्या ऐशा. शालेय जीवन, महाविद्यालयीन शिक्षण आणि त्यानंतर करिअरमध्येही अत्यंत मेहनतीने त्यांनी चांगला जम बसवला. शालेय वयापासूनच हुशार आणि विविध गुणांनी परिपूर्ण असलेली ऐशा तिच्या आजोबांची लाडकी बुलबुल होती. विविध पक्ष्यांचे आवाज, त्यांची नावे आणि त्यांच्या रंजक गोष्टी आजोबा नातीमध्ये रंगायच्या. बालमनावरच झालेले हे संस्कार ऐशा यांना या वळणावर घेऊन येतील, याचा कुणी तेव्हा विचारही केला नसेल. महाविद्यालयीन शिक्षणानंतर अहमदाबादच्या ‘स्कूल ऑफ आर्किटेक्ट्स’ येथून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

कमल मंगलदास यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तुविशारद क्षेत्रात नऊ वर्षं सराव केल्यानंतर, त्यांनी स्वतःची स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. मात्र, दि. २ ऑगस्ट २०१३ या दिवशी कार्यालयाच्या परिसरातच ’ब्लॅक काईट नाईट हेरॉन’ या पक्ष्याचे त्यांना दर्शन झाले आणि ऐशा यांचे कुतूहल चाळवले. मग काय पक्षीविश्वाकडील त्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला. आवडीने पक्षी निरीक्षणाला सुरुवात झाली, पक्षी छायाचित्रणाला सुरुवात झाली आणि बघता-बघता ऐशा भारतभरातील काही पक्षी निरीक्षकांच्या चमूतही दाखल झाल्या. भारतात पक्ष्यांच्या नोंद असलेल्या १ हजार, ३५८ प्रजाती अस्तित्वात आहेत. त्यापैकी ऐशा यांनी १ हजार, ७८ प्रजाती स्वतः पाहिल्या असून, उर्वरित सर्व प्रजाती पाहण्याची त्यांची इच्छा आहे. २०१५ पासनू पक्षी निरीक्षण करता-करता, त्यांनी पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करायलाही सुरुवात केली. २०१९ मध्ये त्यांनी अमेरिकी संस्था ’कॉरनेल लॅब’ची बंगळुरूतील ’नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस’ (छउइड) येथे पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करण्याच्या, कार्यशाळेमधून शास्त्रीय पद्धतही शिकून घेतली. ’ई-बर्ड’ आणि ‘मर्लिन’ यांसारख्या ऑनलाईन अ‍ॅप्सवर हे आवाज टाकायला सुरुवात केल्यानंतर, त्यांच्या लक्षात आलं की, बरेचसे नवीन आवाज अ‍ॅपवर टाकणार्‍या, त्या पहिल्याच व्यक्ती आहेत. ‘नारकॉन्डॅम हार्नबिल’, ‘ग्रँडेला’, ‘यलो थ्रोटेड लाफिंग थ्रश’ अशा अनेक पक्ष्यांचे रेकॉर्डेड आवाज त्यांनी प्रथमच ’ई-बर्ड’ आणि ’मर्लिन’वर टाकले होते.

लहान वयात चित्र काढण्याचे, कथ्थक नृत्य आणि वाचन असे अनेक छंद असणार्‍या ऐशा यांना पुढे पक्ष्यांच्या अद्भुत विश्वाने अक्षरशः वेड लावले. इतके की त्यांनी स्वतःचा वास्तुविशारद क्षेत्रामध्ये चांगला जम बसलेला, व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. पक्षी छायाचित्रण अनेक जण करतात, आपण काहीतरी वेगळे करुया, या विचाराने ऐशा सतत काही तरी नावीन्याच्या शोधात असत. त्यामुळेच पक्ष्यांच्या पिसार्‍यांविषयीचं प्रत्येकाच्याच मनात असणारं, कुतूहल वाढत जाऊन, पक्ष्यांच्या पिसार्‍यांचे संग्रहालय सुरू करण्याची अनोखी कल्पना त्यांच्या मनात डोकावली. या कल्पनेवर आधारित ऑक्टोबर २०२१ मध्ये शर्विन एव्हरेट या सहसंस्थापकाबरोबर त्यांनी कामाला सुरुवात केली. ’फेदर लायब्ररी’ या नावाने त्यांच्या वाढदिवशी म्हणजेच दि. १५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी त्यांनी या लायब्ररीचे उद्घाटन केले. ‘बार्न आऊल’, ‘कॉमन क्वेल’, ‘इंडियन पिटर’, ‘व्हाईट थ्रोटेड किंगफिशर’ आणि ‘रोजविंग्ड पॅराकिट’ अशा अवघ्या पाच प्रजातींसह हे संग्रहालय त्यांनी सुरू केले.

पुढील काही काळात अमेरिकेत दौरा साधून आला असता, पुन्हा एकदा कॉरनेल लॅबची मदत घेत, त्यांनी पक्षी ठेवण्यासाठी काय पद्धत वापरली जावी, याविषयीचा ‘टॅक्सीडर्मी’ कोर्स ही पूर्ण केला. जगातील हा पहिलाच अभिनव प्रकल्प असल्याने, कॉरनेलमध्येही त्यांचे स्वागतच झाले आणि पुढे शास्त्रीय पद्धत शिकून घेत, ऐशा मायदेशी परतल्या. रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारांसाठी आणलेले पक्षी किंवा वन विभागाकडे आलेले मृत पक्षी यांच्या यथोचित परवानग्या मिळवत, त्यांनी यांचा संग्रह करायला सुरुवात केली. आजवर या ’फेदर लायब्ररी’मध्ये १३० प्रजातींचा संच संग्रहित करण्यात त्यांना यश मिळालं आहे. त्यांच्या या ‘फेदर लायब्ररी’ची भारतातील काही वृत्तसंस्थाबरोबरच कॅनडा, अमेरिका यांसारख्या परदेशातील अनेक वृत्तसंस्था तसेच माध्यमांनी दखल घेतली. ’पिसे आणि पिसारा’ या विषयावर त्यांनी अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये त्यांच्या कामाबाबत माहितीपर सत्रे घेतली आहेत.

वाचन, संशोधन आणि पक्षीप्रेमाच्या जोरावर हे संग्रहालय उभारणार्‍या ऐशा यांचा भारतातील तसेच जगभरातील प्रत्येक प्रजातीच्या पक्ष्यांच्या पिसार्‍यांचा संग्रह आणि त्यांची योग्य नोंद करणं हे स्वप्न आहे. त्याचबरोबर इतर देशांसारखं भारतातही ‘ऑर्निथोलॉजी म्युझियम’ बनवण्याची त्यांची मनोमन इच्छा आहे. शालेय जीवनातील मुलांबरोबरच, पक्षी निरीक्षक, अभ्यासक, संशोधक आणि संवर्धक अशा सर्वांनाच याचा निश्चित फायदा होऊ शकतो, अशी त्यांना खात्री आहे. पक्षीमय विश्व झालेल्या, ’ख लीशरींहश इळीवी’ असं म्हणणार्‍या ऐशा मुन्शी यांच्या या अफलातून कार्याला दै. ’मुंबई तरुण भारत’च्या मनस्वी शुभेच्छा!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.