दाऊदच्या साथीदारासोबत ‘उबाठा’ गटाच्या नेत्याने झोडली डान्स पार्टी; एसआयटी’मार्फत चौकशीचे देवेंद्र फडणवीसांचे आदेश

    15-Dec-2023
Total Views | 124
nitesh
 
नागपूर : मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राईमचा शार्पशूटर ‘सलीम कुत्ता’ हा पेरोलवर तुरुंगाबाहेर असताना उद्धव ठाकरे गटाच्या नाशिक महानगरप्रमुखाने त्याच्यासोबत डान्स पार्टी झाडल्याचा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी शुक्रवार, दि. १५ डिसेंबर रोजी विधानसभेत केला. या पार्टीचे फोटो त्यांनी सभागृहात सादर केले, तसेच व्हिडिओपुरावे अध्यक्षांकडे अधिक आकलनासाठी पाठवून दिले. या गंभीर विषयाची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एसआयटी’च्या माध्यमातून समयमर्यादेत (टाईमबॉण्ड पद्धतीने) तपास करण्याची घोषणा केली.
 
नितेश राणे म्हणाले, ‘सलीम कुत्ता’ हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊदचा साथीदार आहे. त्यांनी शिवसेनाभवनाबाहेरही स्फोट घडवला होता. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला ‘कुत्ता’ पेरोलवर बाहेर आला असताना, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर त्याच्यासोबत डान्सपार्टी करीत होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेल्या माणसासोबत उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी पार्टी करत असतील, तर हे कसले बाळासाहेबांचे वारसदार? या ‘कुत्ता’ला नुसता अटक करू नका, तर त्याचा राजकीय गॉडफादर कोण आहे, तो कोणाच्या संपर्कात असतो, कोणाशी त्याचा दूरध्वनीद्वारे संवाद सुरू असतो, त्याचा सीडीआर रेकॉर्ड तपासा, अशी मागणी राणे यांनी केली.
 
 
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही नितेश राणे यांनी सभागृहात मांडलेला विषय अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. सलीम कुत्ता हा दाऊदचा शार्पशूटर आहे. त्याच्यासोबत पार्टी करणारा सुधाकर बडगुजर काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये रोजीरोटीसाठी भटकत होता, तो आज शेकडो कोटींचा मालक आहे. देशद्रोह्यांसोबत डान्स पार्टी करणारा बडगुजर छोटा मासा आहे. त्याला कोणाचा वरदहस्त आहे, त्याचे कुणाशी लागेबांधे आहेत, अतिरेक्यांना पैसे पुरवण्यात यांचा हात आहे का, याच्या खोलात जायला हवे. गृहमंत्र्यांनी तातडीने तसापासे आदेश द्यावेत, अन्यथा काही पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे, असे दादा भुसे म्हणाले.
 
टाईमबॉण्ड पद्धतीने तपास होणार – देवेंद्र फडणवीस
या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बॉम्बस्फोटातील आरोपी, पेरोलवर असलेला दाऊदचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टीचा प्रकार अतिशय गंभीर आहे. बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत कोणी पार्टी करीत असेल, तर त्यांच्या संवेदना मेल्या आहेत हे सिद्ध होते. सुधाकर बडगुजर याचे ‘कुत्ता’शी काय संबंध आहेत, याचा तपास केला जाईल. त्या पार्टीत कोणकोण होते, बडगुजर याला कोणाचा वरदहस्त आहे, हे शोधले जाईल. तसेच या प्रकरणाचा एसआयटीच्या माध्यमातून टाईमबॉण्ड पद्धतीने तपास केला जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121