लंडन : इंग्लंडमधील एका समलिंगी जोडप्याने मुलाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मातांच्या गर्भात हे मुल वाढले आहे. अशाप्रकारे मुलाला जन्म देणारे हे जगातील दुसरे जोडपे ठरले आहे. गेल्या महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी या जोडप्याने डेरेक एलॉय नावाच्या मुलाला जन्म दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय एस्टेफानिया आणि २७ वर्षीय अजहरा यांच्या गर्भात डेरेकने जन्म घेतला आहे. एस्टेफानिया आणि अजहरा यांनी गर्भधारणेसाठी इनवोसेल (INVOcell) नावाच्या एका नवीन उपचारपद्धतीचा उपयोग केला आहे. या उपचारपद्धतीमध्ये अंडी आणि शुक्राणू असलेली एक लहान अंगठ्याच्या आकाराची कॅप्सूल योनीमध्ये ठेवली जाते.
सुरुवातीला हे कॅप्सुल एस्टेफानियाच्या योनीमध्ये ठेवण्यात आले होते. ते तिच्या शरीरात पाच दिवसांपर्यंत ठेवण्यात आले. त्यानंतर एस्टेफानियाच्या शरीरातून हे कॅप्सूल काढले आणि भ्रूणांची तपासणी करून त्यातील चांगले भ्रूण अजहराच्या गर्भाशयात ठेवण्यात आले. अजहराने नऊ महिने आपल्या गर्भाशयात ते वाढवले. त्यानंतर सी सेक्शनद्वारे अझहराने डेरेक एलॉय या मुलाला जन्म दिला.
डेरेक हा INVOcell पद्धतीचा वापर करून जन्माला आलेला पहिला युरोपियन बाळ ठरला. या उपचारासाठी या जोडप्याला औषधांसह ५,४८९ अमेरिकन डॉलर्स खर्च करावे लागले. यापूर्वी २०१८ मध्ये अमेरिकेतील टेक्सासमधील ब्लिस आणि अॅशले कुल्टर यांनी त्यांच्या स्टेटसन नावाच्या मुलाच्या जन्माच्या वेळी हे तंत्र वापरले होते.