द्रमुक सरकारने संघाची संचलने होऊ नयेत म्हणून थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती; पण हिंदू समाजावर आणि संघावर अन्याय करणारा निर्णय न्यायालयाने फेटाळून लावला आणि तामिळनाडू राज्यामध्ये ५५ ठिकाणी संघाची संचलने थाटात निघाली.
तामिळनाडूमध्ये ५५ स्थानी संघाची पथसंचलने
तामिळनाडूमधील द्रमुक सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनांवर थातुरमातुर कारणे देऊन बंदी घालण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण, त्या सरकारने घातलेली बंदी न्यायालयात टिकली नाही. तामिळनाडू सरकारच्या आदेशाविरुद्ध मद्रास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने सरकारचा निर्णय रद्द करून दि. २२ आणि २९ ऑक्टोबर रोजी पथसंचलन काढण्यास अनुमती दिली होती. पण, त्या निर्णयाविरुद्ध द्रमुक सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे द्रमुक सरकारला संचलनास अनुमती द्यावी लागली आणि १९ नोव्हेंबर ही त्यासाठी अंतिम तारीख ठरविण्यात आली. तो निर्णय लक्षात घेऊन, संघाने संपूर्ण तामिळनाडू राज्यात विविध ठिकाणी पथसंचलने आयोजित केली होती. चेन्नईमध्ये आणि अन्यत्र आयोजित कार्यक्रमात हजारो स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते. चेन्नईमधील संचलनाचा मार्ग तीन किलोमीटरचा होता. संचलानापूर्वी ध्वज प्रणाम आणि प्रार्थना होऊन संचलनास प्रारंभ झाला. संचलनाच्या मार्गावर उपस्थित असलेल्या माता-भगिनी आणि अन्य जनतेने स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी केली. घोषाच्या तालावर संचलनात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांची पावले पडत होती. चेन्नईमध्ये आयोजित कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कराईकुडीमधील संचलनात त्या जिल्ह्यातील ४०० स्वयंसेवक सहभागी झाले होते. तेथे आयोजित प्रकट कार्यक्रमामध्ये अरुमुगम सीताईअंमल एज्युकेशनल ग्रुपचे उपाध्यक्ष रामेश्वरम यांनी संबोधित केले. कोईमतूरमधील तुदियालूर येथे संचलन आणि प्रकट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिरुपूर येथील संचलनात स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संचलनानंतर येथे प्रकट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निलगिरी जिल्हा, तंजावर जिल्हा, सालेम जिल्हा आदी जिल्ह्यांमध्येही संचलनाचे कार्यक्रम योजण्यात आले होते आणि त्यास हिंदू समाजाने उत्तम प्रतिसाद दिला. द्रमुक सरकारने संघाची संचलने होऊ नयेत म्हणून थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती; पण हिंदू समाजावर आणि संघावर अन्याय करणारा निर्णय न्यायालयाने फेटाळून लावला आणि तामिळनाडू राज्यामध्ये ५५ ठिकाणी संघाची संचलने थाटात निघाली.
‘हलाल’मागे धार्मिकपेक्षा आर्थिक कारणे; ’हिंदू ऐक्य वेदी’चा आरोप
प्रत्येक वस्तूचे ‘हलाल’ प्रमाणीकरण करण्याच्या प्रकाराविरुद्ध केरळमधील ’हिंदू ऐक्य वेदी’ या संघटनेने आवाज उठविला आहे. ‘हलाल’ प्रमाणीकरणामागे धार्मिक कारणांपेक्षा आर्थिक कारणे असून, या व्यवस्थेद्वारे एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी निर्माण केली जात आहे, असा आरोप या संघटनेचे राज्य महासचिव आर. व्ही. बाबू यांनी केला आहे. ‘हलाल’ प्रमाणीकरणाविरुद्ध राज्यभर मोहीम हाती घेण्यात आली असून, अशा ‘हलाल’ उत्पादने आणि सेवांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या संघटनेने केली आहे. हॉटेलमध्ये ‘हलाल’ खाद्यपदार्थ देण्यास आमची काही हरकत नाही. पण, गोष्टी इतक्या थराला गेल्या आहेत की, या ‘हलाल’ प्रमाणीकरणामुळे मुस्लिमेतरांच्या नोकर्या आणि व्यवसायांच्या संधी धोक्यात आल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.आर. व्ही. बाबू यांनी म्हटले आहे की, ‘हलाल’ प्रमाणीकरण मिळविण्यासाठी, एक तृतीयांश कर्मचारी मुस्लीम असले पाहिजेत. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी व्यापार्यांना सक्तीने ‘हलाल’ उत्पादने विकण्याशिवाय अन्य पर्यायच राहणार नाही. जे यास नकार देतील, त्यांच्या व्यवसायावर यामुळे परिणाम होणार, हे नक्की. हा प्रकार एवढ्या थराला गेला आहे की, आता ‘हलाल’ प्रमाणीकरण असलेले निवासी गाळे आणि आयुर्वेद औषधे विकली जाऊ लागली आहेत. इस्लामच्यानुसार, आयुर्वेद हराम आहे, हे लक्षात घ्या. ‘हलाल’ व्यवस्था ही भेदभाव करणारी असून, ही व्यवस्था एक प्रकारची अस्पृश्यताच आहे. घटनेनुसार भारतात अस्पृश्यतेवर बंदी आहे, याकडे बाबू यांनी लक्ष वेधले. २० वर्षांपूर्वी असला काही प्रकार नव्हता. हे अलीकडेच सर्व सुरू झाले आहे, असेही त्यानी निदर्शनास आणून दिले.
भारतात जी ‘हलाल’ प्रमाणीकरण यंत्रणा आहे, ती असे प्रमाणपत्र देण्यासाठी अर्जदारांकडून काही शुल्क आकारते. त्यास ’जकात’ म्हटले जाते. हा जकात रुपात मिळणारा पैसा जे दहशतवादी कारावासात आहेत, त्यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी वापरला जातो. ‘हलाल’-हराम यामुळे जातीय सलोखा बिघडत आहे, याकडेही बाबू यांनी लक्ष वेधले आहे.दरम्यान, ५० हजार रुपये दिले की, ‘हराम’चे ‘हलाल’मध्ये रुपांतर होते, असा आरोप या संघटनेच्या अध्यक्ष के. पी. शशिकला यांनी केला आहे. अल्कोहोल उत्पादनांना ‘हलाल’ प्रमाणपत्र दिल्याची, त्यांची पोस्ट ही समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. इथिल असेटेटचे उत्पादन करणार्या एका प्रमुख कंपनीस ‘हलाल’ प्रमाणपत्र मिळाले आहे. या कंपनीच्या उत्पादनामध्ये ९० टक्के अल्कोहोल आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्कोहोल असलेल्या उत्पादनास ‘हलाल’ प्रमाणपत्र मिळत असल्याबद्दल शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. ५० हजार रुपयांना असे प्रमाणपत्र दिले जाते आणि ही रक्कम धनादेशाद्वारे नव्हे तर रोकड स्वरुपात घेतली जाते. हे सर्व पाहता पैसे टाकले की, कोणतीही ’हराम’ वस्तू ’हलाल’ होऊ शकते, हे शशिकला यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
जावेद मियाँदादने उचलली जीभ लावली टाळ्याला!
अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराच्या निर्मितीचे कार्य वेगाने सुरू आहे. या मंदिराची होत असलेली उभारणी पाहून, अनेकांना आतापासूनच पोटशूळ उठू लागला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मियाँदाद या अशा लोकांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. खरे म्हणजे, राम मंदिराच्या प्रश्नात एका पाकिस्तानी खेळाडूने नाक खुपसण्याचे काहीच कारण नाही. पण, त्याचा विचार न करता जावेद याने नाक खुपसलेच!अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाची निमंत्रणे सर्वत्र जाऊ लागली असताना, माजी पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू मियाँदाद याचा एक व्हिडिओ प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये जावेद याने अत्यंत स्फोटक आणि भडक विधाने केली आहेत. त्याने एक विधान असेच भन्नाट केले आहे. “राम मंदिरास जे भेट देतील, ते मुस्लीम होतील,” असे त्याने म्हटले आहे. राम मंदिर पाडून आक्रमकांनी तेथे मशीद उभारली, आता जेथे मूळ राम मंदिर होते, तेथे पुन्हा भव्य राम मंदिर उभे राहत आहे. आपल्याच राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यास जाणारे हिंदू मुसलमान कसे होतील, हे जावेद सांगू शकेल काय? जावेदचा हा व्हिडिओ दि. ८ ऑगस्ट २०२० रोजीचा आहे. पण, आता राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्याचा सोहळा जवळ येत असल्याचे लक्षात घेऊन अलीकडेच तो व्हायरल करण्यात आला आहे. ‘जे हिंदू राम मंदिरास भेट देतील, ते तेथून मुस्लीम म्हणून बाहेर पडतील,’ असे अजब तर्कट या जावेदने लढविले आहे. जावेद मियाँदादसारख्या पाकिस्तानी माणसाने या प्रकरणी नाक खुपसायला नको होते. पण, त्याचा जो कोणी ‘बोलविता धनी’ त्याच्या मुखातून हे वदवून घेत असेल, तर हे कदापि शक्य नाही, हे त्याने लक्षात घेतले पाहिजे.
- दत्ता पंचवाघ