‘युटर्न खान’ आणि बाजवांचा सल्ला

    06-Jul-2022
Total Views |
 
imran khan
 
 
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान कप्तान इमरान खान सध्या सैरबैर झाले आहेत. कारण, हातातून सत्ता गेल्यापासून ते नुसते पाकिस्तानच्या कानाकोपर्‍यात मोठाल्या रॅली घेऊन शक्तिप्रदर्शन करण्यातच धन्यता मानताना दिसतात. पाकिस्तानी आवाम अजूनही माझ्या पाठीशी आहे, हेच दाखवून देण्याचा हा सगळा नसता खटाटोप. एप्रिल महिन्यात विश्वासदर्शक ठरावावेळी इमरान खान यांनी अखेरपर्यंत आपली खुर्ची वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, इतके सगळे करूनही इमरान खान यांच्या हातातून सत्ता निसटलीच. तेव्हापासून ते कालपरवापर्यंत आपले सरकार उलथवण्याचा हा अमेरिकेचाच कट असल्याचे खान उच्चरवाने बोंबलत होते.
 
 
एक साध्या अमेरिकन राजनयिकाच्या पत्राला पुरावा बनवून खान यांनी आपल्याविरोधात अमेरिकन सरकारने रचलेले हे षड्यंत्र असल्याचा जोरदार अपप्रचार केला. इतके की, पाकिस्तानी नागरिकांचाही इमरान खान यांच्या या दाव्यावर विश्वास बसू लागला. अमेरिकेने कधीही पाकिस्तानचे हित चिंतले नाही, इमरान खान यांची रशियातील पुतीन भेट अमेरिकेला रुचली नाही, म्हणूनच त्यांचे सरकार अमेरिकेने विरोधकांना हाताशी घेऊन उलथवले वगैरे वगैरे अचंबित करणारे मोठमोठाले दावे यावेळी केले गेले. पण, अमेरिकेने, संबंधित राजनयिकानेही हे सगळे आरोप फेटाळून लावल्यानंतरही इमरान खान यांनी अमेरिकेविरोधी गरळ ओकणे मात्र नित्यनेमाने सुरूच ठेवले. परंतु, नुकत्याच पाकिस्तानातून आलेल्या एका वृत्तानुसार, इमरान खान आणि त्यांच्या ‘पीटीआय’ पक्षाने अमेरिकेची या प्रकरणी माफी मागितली असल्याचे समोर आले आहे.
 
 
पाकिस्तानचे विद्यमान संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी यासंदर्भात नुकताच मोठा खुलासा केला. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, इमरान खान यांच्या ‘पीटीआय’ पक्षाने पडद्याआड अमेरिकेची बिनशर्त माफी मागितली. एवढेच नाही, तर यासंदर्भात सगळे पुरावेही आपल्याकडे असल्याचे आसिफ यांनी सांगितले. अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशियासंबंधी घडामोडींचे साहाय्यक सचिव डोनाल्ड लू, ज्यांच्यावर इमरान खान यांनी आरोपांची लडी पेटवली होती, त्या लू यांचीही माफी ‘पीटीआय’ने मागितल्याचे आसिफ म्हणाले. तसेच अमेरिकेबरोबर आपले संबंध सुधारण्यासाठीही इमरान खान यांनी तयार दाखविल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे इमरान खान यांच्या ‘युटर्न खान’ या प्रतिमेवर पुनश्च शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा पाकिस्तानात रंगली असून, खान यांचा खोटेपणा, दुटप्पी भूमिकाच यावरून अधोरेखित होते.
 
 
पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर आधी जे जे गोड वाटायचे, ते ते सगळे इमरान खान यांना एकाएकी खुपू लागले. एवढेच नाही, तर ज्या लष्कराचा टेकू घेऊन खान सरकार तग धरुन होते, त्या लष्करावरही इमरान खान यांनी सत्ताच्युत झाल्यानंतर आरोपांची लाखोली वाहिली. त्यामुळे देशांतर्गत विविध पक्ष, लष्कर आणि अमेरिकेसारख्या देशासोबत इमरान खान यांचे संबंध पराकोटीचे बिघडले. पण, त्याचे तसूभरही गांभीर्य न ओळखता खान यांनी आरोपांची शृंखला कायम ठेवली. लष्करप्रमुख बाजवा आणि देशाचे सैन्यही त्याला अपवाद नाहीच.
 
 
आता त्याच पार्श्वभूमीवर बाजवांनी त्यांच्या कमांडर्स आणि उच्च पदस्थ अधिकार्‍यांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. एवढेच नाही, तर सैन्यातील अधिकार्‍यांनी राजकारण्यांशी संवाद साधू नये, असेही बाजवा म्हणाले. खरंतर बाजवांचे हे विधान वरकरणी पाकिस्तानमध्ये बदलांचे संकेत देणारे वाटले तरी, पाकिस्तान लष्कर, खुद्द बाजवा आणि ‘आयएसआय’ यांची मुळे राजकारणातच घट्ट मुरलेली आहेत. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर राजकारणमुक्त होईल, ही भाबडी आशाच ठरावी. कारण, या देशाचा इतिहासच साक्षीदार आहे की, स्वातंत्र्यानंतर अर्ध्याहून अधिक काळ या देशावर पाकिस्तानच्या लष्करी हुकूमशहांनीच राज्य केले. लोकशाही, संविधान, कायदे हे कागदोपत्री असले तरी सर्व ताकद ही लष्कराच्याच हातात एकवटलेली. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याचा राजकारणाशी, राजकीय घडामोडींशी तीळमात्र संबंध नाही, आमचा तो मार्गच नाही, असे कितीही दाखविण्याचा आव आणला तरी सत्य बदलणार नाही. हा देश पूर्वीही सैन्याच्या ताब्यात होता आणि भविष्यात अस्तित्वात राहिला तरी सैन्याच्या टाचेखालीच राहील, हीच काळ्या दगडावरची रेष...
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.