नॅशनल पार्कमधील वन्यजीवांचा पालनकर्ता !

    27-Jun-2022   
Total Views |
mukesh moreएकदा का वन्यजीव जायबंदी झाला की, त्याचे आयुष्य पिंजर्‍यातच जाते. अशा वातावरणात त्यांच्यावर मायेची सावली धरणारे प्राणीरक्षक मुकेश पुनमचंद मोरे यांच्याविषयी...मुंबई (अक्षय मांडवकर) - आईच्या सावलीपासून दुरावलेली आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या कचाट्यामधून बचावलेल्या वन्यजीवांचा हा पालनकर्ता. प्राण्यांच्या वेडापायी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या प्राण्यांच्या संगोपनामध्ये झोकून दिले. कित्येक अनाथ वन्यजीवांना मायेची सावली दिली. तन-मन झोकून प्राणीरक्षणाचे काम करण्यासाठी आज ते वन विभागात ओळखले जातात. हतबल वन्यजीवांना मायेची कुस देणारा हा व्यक्ती म्हणजे बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या निवारा केंद्राचे प्राणीरक्षक मुकेश मोरे.

मोरे यांचा जन्म दि. ९ मार्च, १९६८ साली जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील पुनमचंद मोरे हे पोलीस विभागात नोकरीला होते. मोरेंच्या शालेय वयातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. पोरके झालेले हे कुटुंब चोपडा या आपल्या मूळ गावी परतले. कुटुंबाच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. त्या लहान वयातच प्राणी पाहायचे वेड मोरे यांना लागले. गावातील शेत-शिवारांमध्ये जंगली श्वापदांचा वावर होता. या प्राण्यांना घाबरू नकोस, असा विश्वास आईने त्यांना दिला होता. त्यामुळे निर्भिडपणे या प्राण्यांना ते पाहायचे. त्यावेळी अशाच एक प्रसंग घडला. एका बिबट्याचे तोंड मडक्यामध्ये अडकले होते. मडक्यामधून सुटका करून घेण्यासाठी हा बिबट्या शेतामध्ये फिरत होता. या बिबट्याला पाहून गावामध्ये काही अफवा पसरल्या. त्यामुळे कोणीही या बिबट्याच्या मदतीला सरसावले नाही. अशावेळी मोरे यांनी धाव घेऊन बेचकीच्या साहाय्याने बिबट्याच्या डोक्यात अडकलेले मडके फोडले आणि बिबट्याची सुटका झाली. मोरे यांनी केलेल्या या कृतीचे त्यावेळी कौतुक झाले. वन विभागाकडून त्यांना बक्षीसही मिळाले. मात्र, त्यापलीकडे जात मोरेंच्या मनात वन्यप्राण्यांच्या प्रती ममत्वाची भावना निर्माण झाली.


शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोरे नोकरीच्या शोधात मुंबईला गेले. साधारण 1997 साली त्यांनी मुंबईत येऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आपल्या बहीणीचे घर गाठले. त्यावेळी राष्ट्रीय उद्यानात नव्यानेच व्याघ्र सफारीला सुरुवात होणार होती. त्यासाठी काही वाघ त्याठिकाणी आणण्यात आले होते. या वाघांचे संगोपन करण्यासाठी एका प्राणीरक्षकाची गरज होती. तत्कालीन वनाधिकारी आनंद भारती हे एका प्रामाणिक प्राणीरक्षकाच्या शोधात होते. त्यांच्या नजरेस मोरे आले. त्यांनी लागलीच मोरे यांचा प्राणीरक्षक पदी काम करण्याबाबत विचारणा केली. वन्यजीव संगोपनाचे काम असल्याने मोरे यांनीही होकार दिला आणि मोरे हे राष्ट्रीय उद्यानाचे पहिले प्राणीरक्षक झाले. जगन्नाथ कांबळे हे त्यावेळी प्राणी रक्षणाचे काम करायचे होते. त्यांच्यासोबत बारकाईने निरीक्षण करुन ते लिपिक पदावर गेल्यानंतर पुढील कामाची धुरा मोरे यांनी सांभाळली. प्रत्यक्ष प्राण्यांना सांभाळून त्यांना अनेक अनुभव मिळाले. याचदरम्यान अलिबागमध्ये एका सापळ्यात बिबट्या अडकल्याची वार्ता आली. या बिबट्याच्या बचावासाठी मोरे यांना त्याठिकाणी धाडण्यात आले. मोरे यांनी शिताफीने त्या बिबट्याला बेशुद्ध करून त्याचे प्राण वाचवले. या कामामुळे त्यांना वन्यजीव बचावाचाही अनुभव मिळाला आणि खर्‍या अर्थाने तेव्हापासून मोरेंची घोडदौड सुरू झाली.


mukesh more

तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक गोगटे यांचे सखोल मार्गदर्शन मोरेंना मिळाले. त्यापुढे एक पाऊल जात मोरे यांनीदेखील पिंजराबंद अधिवासातील प्राण्यांच्या वर्तनाचे सखोल निरीक्षण केले. पुढच्या काळात मुंबईतील मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत गेली. अनेक जखमी प्राण्यांच्या बचाव सुरू झाला. या कामाची जबाबदारी मोरेंवर सोपवण्यात आली. राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट बचाव पथकामध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्यात आले. पशुवैद्यकांच्या मदतीने बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यामध्ये मोरेंचे कसब होते. ही कसब असल्याने त्यांनी आजवर साधारण 60 बिबट्यांचा बचाव केला आहे. याशिवाय मुंबईतून सात घुबड, 40 साप, 15 घारी, 15 माकडे आणि दहा हरणांचा बचाव केला आहे. राष्ट्रीय उद्यानात बिबट्या निवारा केंद्र सुरू झाल्यानंतर प्रशासनाकडून मोरेंना बिबट्या संगोपनाची जबाबदारी देण्यात आली. आईसोबत पुनर्भेट न होऊ शकलेली बिबट्यांची पिल्ले केंद्रात दाखल होऊ लागली. या सगळ्यांना मायेचा लळा लावून त्यांना वाढण्याचे काम मोरेंनी केले. साधारण बिबट्यांच्या 62 पिल्लांचे संगोपन करून मोरेंनी त्यांना वाढवले. मोरेंनीच वाढवलेले 15 वर्षांहून अधिक वयाचे बिबटे आजही निवारा केंद्रात खुशाल जीवन जगत आहेत. तसेच वाघाटीच्या 12 अनाथ पिल्लांना त्यांनी वाढवले आहे. शिवाय मानव-वन्यजीव संघर्षातून पकडलेल्या मात्र हल्ल्यास कारणीभूत नसलेला एखादा बिबट्या पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात कसा परतेल, यासाठीही ते धडपडत असतात. कोरोना काळातही सर्व नियम पाळून त्यांनी केलेले प्राणीरक्षणाचे काम वाखाणण्याजोगे आहे.


प्राण्यांचे निरीक्षण करण्याबरोबरच मोरे यांनी वन्यजीव संगोपनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. अहमदाबादच्या ‘कमला नेहरु झुओलॉजिकल पार्क’आणि ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅनिमल वेलफेअर’ याठिकाणी त्यांचे प्राणीरक्षणाचे प्रशिक्षण पार पडले आहे. त्यामुळे संगोपनातील तांत्रिक बाबी आणि वैद्यकीय औषधांची त्यांना इंत्यभूत माहिती आहे. अशा पद्धतीने पिंजराबंद अधिवासातील वन्यजीवांची काळजी घेणार्‍या प्राणीरक्षकांची आज गरज आहे. मोरेंसारख्याच प्राणीरक्षकांमुळे आज अनाथ आणि मानव-वन्यजीव संघर्षातून बचावलेले अनेक वन्यजीव सुरक्षित आणि आरोग्यदायी आयुष्य जगत आहेत. त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.