विदर्भातील प्राण्यांचा तारणहार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2022   
Total Views |

amol
 
वन्यजीव बचावाचे काम करून मानव-वन्यजीव संघर्षात सापडलेल्या विदर्भातील वन्यजीवांचा तारणहार ठरलेल्या वनरक्षक अमोल साहेबराव गावनेर यांच्याविषयी...
 
 
 
वन विभागाच्या नोकरीतील नेहमीच्या कामांची चौकट मोडून या माणसाने वन्यजीव बचावाचे तांत्रिक प्रशिक्षण मिळवले. वन्यजीवांंना बेशुद्ध करण्यासारखे कठीण काम त्यांनी अवगत केले. बचावकार्यामुळे मिळालेल्या अनुभवाच्या आधारे हा माणूस संकटात सापडलेल्या विदर्भातील प्राण्यांचा आधारवड बनला. आजतागायत या माणसाने दोन हजारांहून अधिक वन्यजीवांचा बचाव केला आहे. वन विभागातील आपल्या नोकरीला वेगळा आयाम देत वन्यजीवांचा तारणहार ठरलेला हा वनरक्षक म्हणजे अमोल गावनेर.
 
 
गावनेर यांचा जन्म दि. ५ ऑगस्ट, १९८५ साली अमरावती येथे झाला. लहानपणापासून त्यांना जंगलात भटकण्याची आवड. त्यानिमित्ताने त्यांचा वन्यप्राण्यांची जवळचा संबंध आला. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणानंतर उच्च शिक्षण घेत गावनेर हे नोकरीच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी पोलीस आणि वन विभागाच्या भरती प्रक्रियेत आपले नशीब आजमावले. योगायोगाने त्यांची निवड वन विभागात झाली. २००८ साली गावनेर वन विभागात वनरक्षक पदावर रुजू झाले. अकोट वन्यजीव विभागात त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. साधारण २०१० साली जारोदा वन्यजीव विभागातील एका गावात अस्वलाचा हल्ला झाला. या हल्ल्यात चार लोकांचा मृत्यू झाला. यावेळी अमरावतीमध्ये वन्यजीव बचाव पथक नसल्याने तत्काळ अस्वलाचा बचाव करता आला नाही. त्यासाठी नागपूरहून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, त्यादरम्यान घटनास्थळी बराच गोंधळ निर्माण झाला. या घटनेनंतर तत्कालीन वरिष्ठ वनाधिकारी ए. के. मिश्रा, पशुवैद्यक डॉ. स्वप्निल सोनावणे आणि डॉ. अरुणकुमार खुरकुटे यांनी अमरावतीमध्येच वन्यजीव बचाव पथक तयार करण्याचा वसा घेतला. या निर्णयामुळे गावनेर यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
 
 
अमरावतीच्या वन्यजीव बचाव पथकातील सदस्य नियुक्तीकरिता प्रक्रिया सुरू झाली. प्राण्यांप्रती आवड असल्याने गावनेरही या प्रक्रियेत सहभागी झाले. स्वखर्चाने त्यांनी वन्यजीव बचाव प्रशिक्षण घेतले. अखेरीस ३५० उमेदवारांमधून त्यांची वन्यजीव बचाव पथकात २०११ साली नेमणूक झाली. ’प्रोजेक्ट टायगर’ अंतर्गत मेळघाट व्याघ्र प्रकल्पात हे पथक कार्यरत होते. मात्र, मेळघाटापेक्षा अमरावती शहराच्या आसपासच्या प्रादेशिक वनक्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना अधिक घडत होत्या. त्यामुळे २०१३ साली गावनेर यांची बदली अमरावती प्रादेशिक विभागात करून त्याठिकाणी बचाव पथक कार्यरत करण्यात आले. सुरुवातीच्या काळात वन्यजीव बचावाचे तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी गावनेर यांनी मेहनत घेतली. खासकरून त्यांचा ओघ हा वन्यजीवांना भूल देण्याच्या प्रशिक्षणाकडे होता. बचावकार्यादरम्यान प्राण्यांना भूल देणे ही संवेदनशील बाब असते. कारण, भुलीच्या औषधाचे प्रमाण चुकल्यास प्राण्याचा मृत्यू होऊ शकतो किंवा तो बिथरुही शकतो. त्यामुळे गावनेर यांनी प्रशिक्षणादरम्यान प्राण्यांच्या पुतळ्यावर डाट बंदुकीच्या आधारे भूलीचे इंजेक्शन देण्याचा सराव केला. प्रत्यक्षात बचावकार्यादरम्यान त्यांनी माकड, लंगूर अशा छोट्या प्राण्यांपासून सुरुवात केली.
 
 
२०१६ ते २०२१ या काळादरम्यान गावनेर यांनी १,०५१ वन्यप्राण्यांचा बचाव केला आहे. यामध्ये वाघांपासून बिबट्या, अस्वल आणि तरसांसारख्या प्राण्यांचा समावेश आहे. मात्र, गावनेर यांचा हा प्रवास सोपा नव्हता. प्रत्येक बचावकार्यावेळी त्यांच्यावर त्या प्राण्याची आणि आपल्या सहकार्याच्या जीवाची जबाबदारी होती. शिवाय प्रत्येक बचावकार्य हे जीवावर उदार होऊन करण्यासारखेच होते. अकोट वन्यजीव विभागातील एका गावात १०० फूट विहिरीत बिबट्या पडला होता. इतक्या अंतरावरून त्याला डाट बंदुकीच्या आधारे भूलीचं इंजेक्शन देणे शक्य नव्हते. अशावेळी गावनेर हे जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरले. विहिरीत ८० फूटांवर उतरून त्यांनी बिबट्याला भूलीचे इंजेक्शन देऊन त्याचा बचाव केला.
 
 
 
गावनेर यांनी तीन वाघांचाही बचाव केला आहे. या तिन्ही वाघांचा मेळघाट आणि पांढरकवडा वनक्षेत्रातून मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनामधूनच बचाव करण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे पावसाळी हंगामात वाघापासून १५ ते १० फुटाचे अंतर राखून गवानेर यांनी वाघांना बेशुद्ध करून जेरबंद केले. अमरावतीतील नमक कारखाना परिसरातील नाल्यात तरस अडकला होता. अशावेळी वाघाच्या शंकेने त्याठिकाणी सात ते आठ हजार लोकांचा जमाव जमला. जमावाच्या गोंधळात बिथरलेल्या तरसाराला गावनेर यांनी सुखरुप बाहेर काढून त्याला जीवदान दिले. गावनेर यांनी आजवर केलेल्या कामासाठी त्यांना वन विभागाकडून सुवर्ण पदकाचा मान मिळाला आहे. वन्यजीव बचावाच्या घटना या वरकरणी सोप्या वाटत असल्या, तरी प्रत्येक घटनेची परिस्थिती वेगळी असते. परिस्थितीनुरुप त्याठिकाणी निर्णय घ्यावा लागतो. त्यातही प्राण्याला बेशुद्ध करणार्‍या माणसावर जबाबदारीचे ओझे असते. कारण, चुकलेल्या एका निशाण्यामुळे परिस्थितीत चिघळू शकते. त्यामुळे गावनेर यांचे हे काम दाद देण्यासारखे आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!
 
 
@@AUTHORINFO_V1@@