साताऱ्यातून बोरिवलीच्या नॅशनल पाॅर्कमध्ये येणार नवे पाहुणे

    13-Dec-2022   
Total Views |
rusty spotted catमुंबई (विशेष प्रतिनिधी) -
साताऱ्यातील कराड तालुक्यात उसाच्या शेतात सापडलेल्या वाघाटीच्या ( rusty spotted cat ) दोन पिल्लांना मुंबईत पाठविण्यात येणार आहे. बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त वाघाटी प्रजनन आणि संवर्धन केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्रात दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या वाघाटींच्या ( rusty spotted cat ) वाढीसाठी उद्यानातर्फे 'वाघाटी प्रजनन प्रकल्प' राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ही पिल्ले याठिकाणी आणण्यात येणार असून त्यांच्या आगमनाने प्रजनन प्रकल्पाला चालना मिळण्याची शक्यता आहे.  ( rusty spotted cat )
कराड तालुक्यातील बेलदरे गावात ऊसाच्या शेतात वाघाटीची दोन पिल्ले आढळून आली. ऊस कापणीवेळी कामगारांना ही पिल्ले मिळाली. मांजरीची पिल्ले समजून ऊसतोड कामगार ही पिल्ले घरी घेऊन गेले. साधारण आठ दिवसानंतर या पिल्लांच्या प्रजातीविषयी समजल्यानंतर कामगारांनी वन विभागाशी संपर्क साधला. वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांच्या मार्गदर्शनखाली ही पिल्ले ताब्यात घेण्यात आली. आठ दिवस ही पिल्ले मानवी हस्तक्षेपात राहिली. त्यामुळे पिल्लांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्याची शक्यता धूसर झाली. त्यामुळे या पिल्लांना मुंबईतील 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त पाठवण्याचा निर्णय साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी घेतला असल्याची माहिती साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली. त्यापूर्वी ही पिल्ले पुण्याच्या रेस्क्यू संस्थेकडे प्राथमिक देखभालीसाठी पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर या पिल्लांना राष्ट्रीय उद्यानात पाठवले जाईल. 
मार्जार कुळात समावेश असणाऱ्या 'वाघाटी'ला जंगलातील सर्वात लहान आकाराचे मांजर म्हणून ओळखले जाते. या प्रजातीच्या वाढीकरिता २०१३ पासून नॅशनल पार्क प्रशासनाने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत 'वाघाटी'चा पिंजराबंद प्रजननाचा प्रयत्न केला जात आहे. अशा पद्धतीचा देशातील हा पहिलाच आणि जगातील दुसरा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील सुसज्ज पिंजऱ्यांचे नुकतेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले आहे. सद्यपरिस्थिती या केंद्रात दोन प्रौढ वाघाटी आहेत. २०१७ साली त्यांना पुण्याहून आणण्यात आले होते. साधारण पाच वर्षांच्या नर आणि मादी वाघाटीचे वास्तव्य केंद्रात आहे. याशिवाय पंधरा दिवसांपूर्वी सांगलीतील शिराळा तालुक्यात सापडलेल्या वाघाटीच्या मादी पिल्लाला देखील या केंद्रात पाठवण्यात आले आहे. साताऱ्यातून केंद्रात पाठवण्यात येणारी पिल्ले ही मादी प्रजातीची आहेत. ही पिल्ले  आल्यानंतर केंद्रातील वाघाटींची संख्या पाच होणार आहे.

वाघाटीची वैशिष्टय़े
* जंगलातील सर्वात लहान मांजराची प्रजात
* मांसभक्षी असून हा प्राणी निशाचर आहे.
* १४ ते १७ इंच रुंद असून सुमारे दीड किलो वजन
* ७० दिवसांचा प्रजननाचा कालावधी

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.