वेदांचा आर्थिक दृष्टिकोन

    30-Nov-2022
Total Views |
 
वेद
 
 
 
 
वेदांनीही मोठ्या प्रमाणात धन मिळवून श्रीमंत होण्याचा संदेश दिला आहे. पण, ते धन वाईट मार्गाने मिळवता कामा नये. त्याकरिता धर्मतत्त्वाची लक्ष्मणरेषा ओढली आहे. धर्माशिवाय धन म्हणजे सारे काही व्यर्थच! धन मिळविताना त्याच्या दानाची व त्यागाची वृत्ती जोपासली जावी, असे वेदांना अभिप्रेत आहे.
 
 
मानवी जीवनाचे सर्वात जवळचे साधन म्हणजे पैसा होय. धन असेल, तरच समाजात व्यक्तीला महत्त्व प्राप्त होते, अन्यथा धनाअभावी त्याचे जीवन नेहमीच दु:खाच्या खाईत लोटले जाते. म्हणूनच अगदी प्राचीन काळापासून धनाला आगळेेवेगळे स्थान आहे. वैदिक वाङ्मयात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार तत्त्वांना ‘पुरुषार्थ’ म्हणून संबोधले आहे. जीवनाची ही चार तत्त्वे आधार मानली जातात. यात अर्थ म्हणजेच, धनाचा दुसरा क्रमांक येतो. धर्ममार्गाने अर्थ (पैसा) कमवत आपल्या पवित्र कामना, इच्छा (काम) पूर्ण करीत शेवटी या सर्व बंधनाचे (माया-मोहाचे) नाते तोडत परमात्म्याशी नाते जोडणे व त्याच्याशी एकरूप होणे, असा हा धर्मार्थ काम-मोक्षाचा मार्ग म्हणजेच पुरुषार्थ होय.
 
 
यातील धनाचा (अर्थाचा) व्यक्ती, कुटुंब, समाज व राष्ट्राशी घनिष्ठ संंबंध आहे. ज्या देशाचे आर्थिक नियोजन सुव्यवस्थित असेल, तो देश सर्वदृष्टीने सुसंंपन्न मानला जातो, अन्यथा अर्थाविना सारी प्रजा दारिद्य्राचे आयुष्य कंठते. त्याच्या अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजा धनामुळेच पूर्ण होतात. याउलट ज्या राष्ट्राची आर्थिक स्थिती नियोजनबद्ध नसेल, ते राष्ट्र मागासलेले मानले जाते. मजबूत आर्थिक परिस्थितीअभावी तो समाज किंवा ते राष्ट्र बलहीन व कमजोर मानले जाते.
वैश्विक ज्ञानाचे आधार म्हणून ओळखल्या जाणार्‍या वेदांनी ‘अर्थ’ या तत्त्वाविषयी मौलिक विचार मांडले आहेत. ‘वेदोऽखिलो धर्ममूलम्।’ म्हणजेच सर्व कर्तव्य धर्माचे मूलभूत आधार वेद आहेत. म्हणूनच अपौरुषेय अशा ईश्वरीय वेदज्ञानाद्वारे प्रतिपादित करण्यात आलेली अर्थविषयक मार्गदर्शक तत्त्वे जगातील सर्व राष्ट्रांकरिता आणि त्या-त्या देशातील नागरिकांकरिता फारच उपयुक्त ठरणारी आहेत. काळ बदलला, तरी जगातील समस्त देशांकरिता वेदांची आर्थिक उदात्त विचारसरणी अत्यंत उपकारक अशी आहे.
 
 
अर्थाकरिता ऋग्वेदात मघ, रत्न, रयि, वसु, राध, धेनु, इष्टका, ब्रह्म, वित्त, रेक्ण, द्रविण इत्यादी पर्यायवाची शब्दांचा प्रयोग झाला आहे. चारही वेदांत ठिकठिकाणी अर्थविषयक उपदेशांचे उल्लेख आढळतात. ऋग्वेदात एके ठिकाणी ‘आम्ही धन-ऐश्वर्याचे अधिपती बनावे. (वयं स्याम पतयो रयिणाम्।) असा संकेत मिळतो.
 
 
धनाच्या प्राप्तीसाठी प्रार्थनेच्या काही वेदसूक्ती खालीलप्रमाणे आहेत-
 
‘श्री: श्रयताम् मयि।’ (माझ्यामध्ये लक्ष्मीचे स्थैर्य असो.)
‘श्रयसे वित्तधम्।’(श्रेयस्कर होण्याकरिता वित्त कमावणारे धनवान लोक जन्माला यावेत.)
‘स नो वसून्या भर।’(तो ईश्वर आम्हाला धन-धान्यांने परिपूर्ण करो.)
‘वयं भगवन्त: स्याम।’(आम्ही धनैश्वर्यसंपन्न बनोत.)
‘उभा हि हस्ता वसुना वृष्णुस्व।’(आमच्या दोन्ही हातांमध्ये धन येऊ दे.) 
‘शतहस्त समाहर सहस्रहस्त सं कीर।’(आम्ही शेकडो हातांनी कमवावे आणि हजारो हातांनी त्याचे दान करावे.)
 
 
आजचे युग अर्थप्रधान मानले जाते. पैशांशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. स्पर्धेच्या या जगात धन मिळविण्यासाठी माणसाची धडपड चालली आहे. धन हे मानवी जीवनाचे सर्वात मोठे उद्दिष्ट बनले आहे. वेदांनीही मोठ्या प्रमाणात धन मिळवून श्रीमंत होण्याचा संदेश दिला आहे. पण, ते धन वाईट मार्गाने मिळवता कामा नये. त्याकरिता धर्मतत्त्वाची लक्ष्मणरेषा ओढली आहे. धर्माशिवाय धन म्हणजे सारे काही व्यर्थच! धन मिळविताना त्याच्या दानाची व त्यागाची वृत्ती जोपासली जावी, असे वेदांना अभिप्रेत आहे. यजुर्वेदातील शेवटच्या अध्यायातील पहिल्याच मंत्रातील ‘तेन त्यक्तेन भुंजीथा।’ हा अंश सन्मार्गाने धन मिळवित ते त्यागवृत्तीने उपभोगण्याचा उपदेश करतो.
 
 
एका सुभाषितकाराने धनाच्या दान (त्याग), उपभोग आणि नाश या तीन गती सांगितल्या आहेत. जो पहिल्या दोन कृती करीत नाही, त्याची शेवटची म्हणजे तिसरी ‘नाश’ ही गती झाल्याशिवाय राहत नाही. कोणाचे लुबाडून, चोरुन अथवा दीन-दु:खितांना त्रास देऊन धन कदापि मिळवू नये. कष्टातून परिश्रमाने मिळविलेले धन हे सर्वाधिक यशदायी व कीर्ती वाढविणारे असते. तसेच तेच धन चिरंतन काळापर्यंत टिकून राहणारे असते असते, वेद सांगतात.
 
 
धनाविना राष्ट्र पंगू ठरते. शासनाचे सारे प्रयत्न धन नसेल, तर फोल ठरतात. प्रजेचे काहीच चालत नाही. म्हणून वेदांनी राष्ट्ररूपी देहात उदराला (पोटाला) त्या संपूर्ण देहाचा अर्थ संचालक व व्यापाराची उपमा दिली आहे. ‘उरू: तदस्य यद्वैश्य:।’ जसे उदर हे विशुद्ध अन्नाने परिपूर्ण असेल व त्यांची पचनक्रिया चांगली असेल, तर सारे शरीर स्वस्थ मानले जाते, त्याचप्रमाणे ज्या देशाची अर्थव्यवस्था सुदृढ असेल, तर तो देश सर्व दृष्टीने संपन्नदेखील मानला जातो. त्याकरिता वेदांनी आर्थिकदृष्ट्या बलशाली राष्ट्राची संकल्पना मांडली आहे. वैदिक तत्त्वज्ञानाचे अनुकरण करणार्‍या ‘मनुस्मृती’ या ग्रंथातदेखील अर्थसंवर्धन आणि आर्थिक सुबत्तेसाठी चार उपाय सुचविले आहेत-
 
 
अलब्धं चैव लिप्सेत लधं रक्षेत्प्रयत्नत:।
रक्षितं वर्धयेत् चैव वृद्धं पात्रेषु नि:क्षिपेत् ॥
 
 
1) अप्राप्त धन मिळविण्याची इच्छा बाळगावी. 2) मिळविलेल्या धनाचे प्रयत्नपूर्वक रक्षण करावे. 3) रक्षिलेले धन वाढवावे आणि 4) वाढविलेल्या धनाचा सत्पात्री (योग्य ठिकाणी) उपयोग करावा.
 
 
ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातील एका मंत्रात अर्थव्यवस्थेचे उत्तम चित्रण केले आहे.
‘एन्द्रं सानसिं रयिं सजित्वानं सदासहम्। वर्षिष्ठमूर्तये भर॥’ (ऋग्वेद 1/8/1)
 
 
या मंत्रात सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे भांडार असलेल्या परमेश्वराकडे याचना करीत याचक म्हणतो - आमचे रक्षण व्हावे आणि आम्ही गतिशील बनावे, याकरिता दीर्घकाळापर्यंत टिकून राहणारे धन आम्हास सर्व दिशांनी मिळत राहो. ते धन एक-दुसर्‍यांना वाटूनच उपयोगात येणारे असावे. तसेच ते आम्हाला विजय प्रदान करणारे, स्वावलंबी बनविणारे व सहिष्णूवृत्ती वाढविणारे असावे. खरोखरच या मंत्रात धनाची उपयुक्तता सिद्ध केली आहे. ज्या धनाद्वारे देशातील प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधला जातो, ते धन पवित्र मार्गाने मिळविलेले असावे. म्हणजेच धनाची पात्रता येथे विशद झाली आहे.
 
 
देशाचा प्रमुख राजा किंवा शासक याने आपल्या प्रजेला सुखी ठेवण्यासाठी आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था नेहमी सुदृढ ठेवणे आवश्यक आहे. वेदांमध्ये असे अनेक मंत्र आले आहेत की, ज्यामध्ये राष्ट्राच्या अर्थनीतीचे वर्णन करण्यात आले आहे. शासकाला आपल्या देशातील जनतेच्या दु:ख-दारिद्—याची नेहमीच चिंता असावी. आपली प्रजा आर्थिक दृष्टीने नेहमी सुखी व समाधानी राहावी याकरिता राजाने सतत विचारमग्न असावे. प्रजेचे पालन आपल्या मुलाप्रमाणे करताना देशातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही व जनता नेहमी धनधान्याने परिपूर्ण असावी, धनसंपदा असावी, याबाबतीत शासनाने सतर्क राहावे. सर्व लोक निरोगी, आनंदी व आपापल्या कर्तव्यात दक्ष असावेत, यासाठी देशाच्या वित्तकोषात सदैव धनाचे आगमन होत राहावे, असा वेदांचा उदात्त विचार आहे. वेदांमध्ये राजाकरिता ‘इंद्र’, ‘अग्नी’, ‘सम्राट’ इत्यादी नावाने संबोधले केले आहे.
 
 
राजाकडून प्रजेला नेहमी धन व सुख-सुविधा मिळत राहाव्यात, याकरिता प्रार्थनेचे मंत्र आले आहेत. विविध मंत्रात वैदिक ऋषी म्हणतात- “हे राजा! तू आपल्या देशातील प्रजाजनांच्या हितासाठी धन प्रजेकडे पाठव. सर्वांसाठी धनाची व्यवस्था कर. कारण, तुझा धनकोश फारच विशाल आहे. तो कधीच नष्ट होत नाही. हे प्रजापती राजा! जनता तुझ्या नियमांचे कधीच भंग करणार नाही. कारण, तू त्यांना नेहमी अन्न व धन देतोस. तुझ्याकडून जनतेस विविध योजनांनी, उपक्रमांनी धन मिळत राहो, जेणेकरून ते शरीर, मन व बुद्धीने सुदृढ बनत आपल्या देशाची मांगलिक व कल्याणाची कामे करीत राहतील. आपल्या राज्यात एखादा विद्वान व ज्ञानी पंडित असेल, तर तो कधीही आर्थिक दृष्टीने कमजोर असता कामा नये.” म्हणूनच राजा अशा विद्वानांना धन व पुरस्कार देऊन त्यांना नेहमी सक्षम बनवित असे. एका मंत्रात याचा उल्लेख आढळतो. राजाची दक्षिणा कधीच लहान नसते. तो आपल्या प्रजाजनावर आवश्यक अशा सुखवस्तूंचा व धनाचा वर्षाव करीत असतो. जेणेकरून प्रजा आनंदात राहो. (क्रमश:)
 
 
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.