महाराष्ट्रातील चतुरांमध्ये २५ नव्या प्रजातींची भर; आंबोलीतील चतुर-टाचण्यांची यादी प्रसिद्ध

    27-Nov-2022   
Total Views |
odonate


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सह्याद्रीच्या खोऱ्यातील जैवविविधतेची खाण असणाऱ्या आंबोली गावात आढळणाऱ्या चतुर आणि टाचण्यांची ( odonate ) यादी प्रसिद्ध झाली आहे. या अभ्यासामुळे महाराष्ट्रातील चतुर आणि टाचण्यांच्या ( odonate ) यादीत २५ नव्या प्रजातींची भर पडली आहे. जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या आंबोलीतील एखाद्या जीवाच्या प्रजातींची शास्त्रीय नोंद करुन त्याची यादी प्रसिद्ध करण्याची ही पहिलीच वेळ आहे. (  odonate )
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात ५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्रावर आंबोली गाव विस्तारले आहे. या गावाचा परिसर जैवविविधतेचा हाॅटस्पाॅट मानला जातो. कारण, उत्तर आणि मध्य पश्चिम घाटाला जोडणारा हा भाग असल्याने याठिकाणी दक्षिण भारतातील प्रजाती देखील सापडतात. शिवाय एवढ्या छोट्या भागामधून २००५ सालापासून २२ नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. मात्र, याठिकाणी सापडणाऱ्या वेगवेगळ्या जीवांची प्रजातीनुरुप यादी आजवर प्रसिद्ध झाली नव्हती. परंतु, आता आंबोलीत आढळणाऱ्या चतुर आणि टाचणीच्या (odonate) प्रजातींची यादी प्रसिद्ध झाली आहे. 'जर्नल आॅफ थ्रेट्रेंड टॅक्सा' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये शनिवारी ही यादी प्रसिद्ध झाली. संशोधक डाॅ. दत्तप्रसाद सावंत, वन्यजीव अभ्यासक व आंबोलीचे रहिवासी हेमंत ओगले आणि राकेश देऊलकर यांनी या यादीचे संकलन केले आहे.आंबोलीमधून चतुर आणि टाचण्यांच्या (odonate) ९३ प्रजातींची नोंद केल्याची माहिती हेमंत ओगले यांनी दिली. आंबोली, चौकुळ आणि पारपोली या परिसरातील पाणथळींवर तीन वर्ष अभ्यास केल्यानंतर ही यादी प्रसिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले. प्रसिद्ध झालेल्या यादीमधून काही महत्त्वपूर्ण आणि दुर्मीळ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असलेल्या मेगालोगाॅम्फस हॅनिंगटोनी या चतुरांच्या दुर्मीळ प्रजातींची नोंद अभ्यसाकांनी केली आहे. या प्रजातीची महाराष्ट्रातील ही पहिलीच नोंद असून यापूर्वीच्या नोंदी गोवा, कर्नाटक, केरळ आणि ओडिशामधून आहेत. याशिवाय इडिओनीक्स सॅफ्रोनाटा ही प्रजात देखील या अभ्यासामुळे प्रथमच महाराष्ट्रात आढळली आहे. महत्त्वाचे म्हणजे यामुळे इडिओनीक्स या कुळातील चतुरांचा देखील महाराष्ट्रात अधिवास असल्याची नोंद झाली आहे. नोंदवलेल्या एकूण ९३ प्रजातींपैकी १६ टक्के म्हणजेच १५ प्रजाती या जगात केवळ पश्चिम घाटातच सापडत असल्याने या अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे दत्तप्रसाद सावंत यांनी सांगितले. (odonate)odonate
 
महाराष्ट्राच्या यादीत भर
आंबोलीतील चतुर-टाचण्यांच्या या यादीने महाराष्ट्राच्या चतुरांच्या यादीत भर टाकली आहे. या अभ्यासामुळे महाराष्ट्रातील चतुर प्रजातींची यादीमध्ये २५ नव्या प्रजातींची भर पडली आहे. शिवाय अभ्यासकांनी प्रजातींचे शास्त्रीय वर्गीकरण तपासल्यानंतर महाराष्ट्राच्या यादीतून १५ प्रजातींना बाहेर देखील काढले आहे. त्यामुळे पूर्वी महाराष्ट्रामधून नोंदवलेली चतुर-टाचण्यांची १३४ प्रजातींची संख्या आता १४४ झाली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.