आधुनिक जगाचा ‘डार्विन’ हरपला !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2022   
Total Views |
DR. edwarth wilsonपर्यावरणातील विविध परिसंस्थांकडे विज्ञानवादी दृष्टीने पाहण्याचा विचार मांडणारा एक द्रष्टा विचारवंत, लेखक, संशोधक, शास्त्रज्ञ आपल्यामधून हरपला. जगाचा अंत होण्यापासून रोखण्यासाठी विज्ञान आणि धर्मनिष्ठ लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन करणारे डॉ. एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन यांचे नुकतेच निधन झाले. या द्रष्ट्या पर्यावरणरक्षकाच्या जीवनाचा आणि विचारांचा घेतलेला हा वेध...

अक्षय मांडवकर - 'अमेरिकन असोसिएशन फॉर द अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ची (एएएएस) परिषद सुरू होती. या विज्ञान परिषदेमध्ये शेवटी एका तरुण संशोधकाला आपला शोधनिबंध वाचून दाखवायचा होता. आपल्या भाषणाची वेळ आल्यावर पायाला दुखापत झाल्यामुळे त्याने बसूनच वाचनाला सुरुवात केली. तेवढ्याच अचानक काही तरुण घोषणाबाजी करत मंचावर धावत आले. वक्त्याकडे पाहून त्यांनी “तुम्ही वर्णद्वेष लपवू शकत नाही. आम्ही तुमच्यावर नरसंहाराचा आरोप करतो,” अशा घोषणा दिल्या. या सगळ्या गोंधळात परिषदेच्या नियंत्रकांनी निदर्शकांना थांबण्यास सांगितले आणि मीदेखील एक मार्क्सवादी असल्याचे असे सांगून त्यांना थांबवण्याची विनंती केली. अशातच एका महिलेने त्या वक्त्यावर बर्फाचे थंडगार पाणी ओतले. तरीदेखील त्या वक्त्याने न घाबरता आपला शोधनिबंध वाचण्यास सुरुवात केली. तो वक्ता होता एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन आणि जगाला सामाजिक जीवशास्त्रासाठी मूलभूत कार्यभूत प्रणाली तयार करण्यासाठी मदत करणारा तो शोधनिबंध होता ‘ट्रेंड्स इन सोशोबायोलॉजिकल रिसर्च.’


उत्क्रांतीवादातील नवे सिद्धांत मांडून आपल्या राष्ट्रवादी आणि धर्मनिष्ठ धोरणामुळे लक्षवेधी ठरलेले डॉ. एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन यांचे २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. “सजीव उत्क्रांती ही प्रवाही असते. ती एखाद्या प्रवाहासारखी आपसुक घडत जाणारी असते. त्या प्रवाहात अनेक स्थित्यंतरे येतात आणि त्यामध्ये घटना घडत असतात. त्यामुळे उत्क्रांतीमध्ये वळण आणणार्‍या शक्ती या जैविक असतात,” असे डॉ.एडवर्ड यांनी म्हटले आहे. जगाला सामाजिक जीवशास्त्राची दृष्टी देणारा शास्त्रज्ञ, प्रगतशील निसर्गप्रेमी आणि बोगस चंगळवादी पर्यावरणरक्षकांच्या चौकटीत न बसणारा पर्यावरणरक्षक म्हणून त्यांना ओळखले जाते. शिवाय उत्क्रांतीवादाचा जनक चार्ल्स डार्विनचा रक्ताचा नाही, तर त्यांचा सिद्धांत नव्या अंगाने मांडणारा वारस म्हणून ‘आधुनिक जगातील डार्विन’ म्हणून त्यांना संबोधले जाते. एक प्रजाती संवर्धनामध्ये आपल्या आयुष्य व्यतीत करून मुंग्यांच्या जीवनाचे कोडे जगासमोर उलगडणार्‍या या माणसाला ‘अँट मॅन’ म्हणूनही ओळखले जाते. सामाजिक जीवशास्त्राशिवाय डॉ. एडवर्ड यांनी पर्यावरण विचारवंत क्षेत्रात ‘आयलँड बायोजिओग्राफी’ या वेगळ्याच विषयाची भर टाकली. एखादी परिसंस्था ही इतर अनेक परिसंस्थांनी वेढली गेलेली असते आणि या परिसंस्थांच्या विकासाच्या प्रक्रियेत त्यांचे सहसंबंध असतात, असे डॉ. एडवर्ड यांचे या विषयामागील विचार होते. मुख्य म्हणजे आपले हे सर्व सिद्धांत आणि विचार अगदी सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवून निसर्गप्रेमींची एक नवीन विकसित पिढी घडवण्यासाठी डॉ. एडवर्ड खर्‍या अर्थाने ओळखले जातात. आज लाखो निसर्गप्रेमी आणि निसर्गसंवर्धनकर्त्यांचे डॉ. एडवर्ड हे वाटाड्या आहेत.


मुंग्यांच्या संशोधनाकडे वळवण्यामागे डॉ. एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन यांचे शारीरिक व्यंग कारणीभूत ठरले. डॉ. एडवर्ड हे मूळचे अमेरिकेतील अलाबामा राज्याचे रहिवासी. त्यांचा जन्म दि. १० जून, १९२९ साली झाला. लहान वयातच त्यांचे आई-वडील विभक्त झाले. वडील मद्याच्या आहारी गेल्याने त्यांचेही छत्र डॉ. एडवर्ड यांच्यावरुन हरवले. एकट्या पडलेल्या एडवर्ड यांना निसर्गात भटकण्याचा छंद लागला. पक्षी निरीक्षणाचा छंद जडला. अशावेळी एकदा मासेमारी करताना गळ उलटा फिरुन त्यांच्या उजव्या डोळ्यात घुसला. दुर्दैव म्हणजे यामुळे तो डोळा जायबंदी झाला. लांबचे दिसेनासे झाले आणि ऐकूही कमी येऊ लागले. पक्षीनिरीक्षण करणे कठीण झाले. मात्र, उलटपक्षी जवळचे अधिक सुस्पष्ट दिसू लागले. एरवी डोळ्यांनी न दिसणार्‍या किटकांच्या आणि मुंग्यांच्या शरीरावरील केसही त्यांना स्पष्ट दिसू लागले. यातूनच मुंग्यांच्या निरीक्षणाचा छंद जडला आणि या छंदाचे परिवर्तन अभ्यासात होऊन, पुढे डॉ. एडवर्ड यांनी नवे सिद्धांत मांडले.


डॉ. एडवर्ड यांनी वयाच्या तेराव्या वर्षांपासून मुंग्यांचे वर्तन आणि त्यांच्या वर्गीकरणाचा (टॅक्सनॉमी) अभ्यास केला. कालांतराने हळूहळू मुंग्यांच्या वर्गीकरणाच्या नेहमीच्या कामापासून दूर जाऊन त्यांनी कल्पक पद्धतींद्वारे त्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला. त्यांनी सुरुवातील ‘फायर अ‍ॅन्ट’ या मुंग्यांच्या वर्तनाचे आणि शरारीशास्त्राचे वर्णन केले. या मुंग्यांच्या वसाहतीमधील हालचालींचे निरीक्षण करण्यासाठी त्यांनी कृत्रिम वारुळ तयार केले. या मुंग्या आपल्या कामगार मुंग्यांशी अन्न स्थानांबद्दल माहिती घेण्यासाठी कशा पद्धतीचा संवाद साधतात, याचा अभ्यास केला. एकमेकांशी संवाद साधून संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी ‘फेरोमोन असायन’ उत्सर्जित करतात हे त्यांनी शोधून काढले. मानवानंतर सर्वाधिक गुंतागुंतीचे जीवन असणारा आणि मनुष्याच्या विपरीत सामूहिक निर्णय घेणारा जीव मुंग्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. या सगळ्या निरीक्षणांवर आधारित त्यांनी ‘सोशोबायोलॉजी - द न्यू सिंथेसिस’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की, “पृष्ठवंशीय प्राणी आणि किटकांच्या संवाद साधण्याच्या प्रक्रियेत आणि संप्रेषण प्रणालींमध्ये मूलभूत फरक असूनही प्राण्यांच्या या दोन गटांनी सामाजिक वर्तन विकसित केले आहे, जे जटिलतेमध्ये समान आहेत.”


डॉ. एडवर्ड यांनी अलाबामा विद्यापीठातून जीवशास्त्र विषय निवडून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या काळात त्यांनी अमेरिकेतील ‘डेसेटाईन’ मुंग्यांचे संशोधन केले. त्यानंतर १९५० साली, त्यांनी संशोधन करण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवला. त्यांनी मुंग्यांच्या प्रजातींच्या भौगोलिक क्षेत्राचे निरीक्षण गेले. मुंग्यांच्या स्थलांतरावर आणि प्रदेश विस्तारावर सूक्ष्म निरीक्षणे नोंदवली. शिवाय जुन्या प्रजातींनी नवी प्रजाती कशा निर्माण केल्या, याचेही निरीक्षण नोंदवले. १९६१ साली डॉ. एडवर्ड यांनी ‘रॉबर्ट मॅकार्थर’ यांच्यासोबत बेटांवरील जैवविविधतेसंबंधी संशोधन केले. छोट्या आणि मोठ्या बेटांवरील जैविक वैविध्य आणि त्यामधील प्रजातींना राहण्यासाठी असणार्‍या अधिवासाची क्षमता यावर यांनी अभ्यास केला. याचअभ्यासातील निरीक्षणाच्या माध्यमातून १९६७ साली ‘दि थिअरी ऑफ आयलँड बायोजिओग्राफी’ हे पुस्तक लिहिले. ‘मानववंशशास्त्र’ आणि ‘पर्यावरणशास्त्र’ या दोन विषयांवरीत त्यांनी विपुल लिखाण केले. त्यांच्या चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीवादाशी संबधित असलेला सिद्धांत खळबळजनक ठरला. त्यांच्या दोन पुस्तकांना ‘पुलित्झर’ पारितोषिक मिळाले. ‘सोशोबायोलॉजी - दि ह्युमॅन नेचर’ आणि ‘ऑन ह्युमॅन नेचर’ या पुस्तकांना हा पुरस्कार मिळाला. प्रत्येक प्राण्यांच्या उत्क्रांतीच्या मुळाशी आणि सामाजिक जीवनाच्या जडणघडणीत त्या प्राण्यांच्या जनुकांचा समूह असतो, असा सिद्धांत त्यांनी मांडला. “लोकांच्या आणि प्राण्यांच्या सवयी किंवा त्यांची वर्तवणूक ही त्यांच्या अनुवांशिक जडघडणीमुळे निर्माण होते,” असे त्यांनी म्हटले. डॉ. एडवर्ड यांच्या अशा या अचाट विधानांमुळे त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. निसर्गप्रेमी असूनही त्यांनी आपला धर्म आणि देवाकडे दुर्लक्ष केले नाही. देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणे किंवा कर्मकांड करणे, हा उत्क्रांतीमधील एक टप्पा आहे, असे ते म्हणत. डॉ. एडवर्ड आज आपल्यामध्ये नाहीत. पृथ्वीच्या संवर्धनासाठी आणि तिचा नाश होण्यापासून रोखण्यासाठी विज्ञाननिष्ठ आणि धर्मनिष्ठ मंडळींनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले होते.


@@AUTHORINFO_V1@@