नृत्यमय युगाचा अंत !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2022   
Total Views |
pt. birju maharajभारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील ‘कथ्थक’ शैलीचे आचार्य आणि लखनौच्या ‘कालका-बिंदादिन’ घराण्याचे प्रमुख प्रतिनिधी नृत्यशिरोमणी ‘पद्मविभूषण’ पं. बिरजू महाराज यांचे सोमवारी निधन झाले. कथ्थक नृत्याचा जगभर प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचणार्‍या या कलाकाराचे योगदान आणि त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा घेतलेला हा आढावा...


 
मुंबई (अक्षय मांडवकर) -  नृत्य आणि संगीतात रममाण होणार्‍या रसिकजनांच्या भावविश्वाचा ठाव घेऊन आयुष्यभर केवळ अन् केवळ कथ्थक नृत्याशी बांधिल राहिलेला ध्रुवतारा अखेर निखळला. नृत्यशिरोमणी पं. बिरजू महाराज हे सोमवार, दि. १७ जानेवारी रोजी निवर्तले. आपले आयुष्य कथ्थक नृत्याचा प्रसार करण्यासाठी वेचणार्‍या एका युगाचा शेवट झाला. या युगाचे क्षितीज लखनौमधील नवाबाच्या दरबारापासून ते अगदी अलीकडच्या ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटापर्यंत विस्तारलेले होते. कथ्थक नृत्याच्या प्रवर्तकांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. तरीही पं. बिरजू महाराज आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या रचनांच्या छायेच्या आसर्‍याला फारसे थांबले नाही. उलटपक्षी आपल्यातील सृजनतेला तावून-सुलाखून स्वत:चे विश्व रचून कथ्थक नृत्याच्या सर्वोच्च बिंदूचे अढळ स्थान त्यांनी मिळवले. माणसाचे संपूर्ण आयुष्य हे ‘विलंबित’, ‘मध्य’ आणि ‘द्रुत’ लयीभोवती गुंफलेले आहे. त्यामुळे निसर्गानेच माणसामध्ये लयीचे बीजांकुरण केल्याची भावना त्यांच्या मनी होती. अखेरीस लयीचा शेवट हा समेवरच होतो. त्याचप्रमाणे या नृत्यमयुराचे आयुष्यही समेवर येऊन थांबले...
 


बिरजू महाराजांचा जन्म दि. 4 फेब्रुवारी, 1938 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये झाला. कथ्थक नृत्यशैलीचा वारसा जपणार्‍या ‘कालका बिंदादिन’ म्हणजेच लखनौ घराण्याच्या संस्थापकांच्या घरातच ते जन्मले. या घराण्याच्या सातव्या पिढीचे ते प्रतिनिधित्व करत होते, तर आज या घराण्याची नववी पिढी कलारसिकांची सेवा करत आहे. त्यांचे मूळ नाव ‘बृजमोहन नाथ मिश्रा’ होते. मात्र, घरातील सगळे त्यांना लाडाने ‘बिरजू’ म्हणून हाक मारत असल्याने समाजमनातही त्यांचे हेच नाव प्रचलित झाले. वडील अच्छन महाराज यांच्याकडून शिष्यत्व स्वीकारून त्यांचे नृत्यशिक्षण सुरू झाले. नवव्या वर्षी डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरवल्यानंतर काका आचार्य शंभू आणि लच्छू महाराजांनी त्यांना नृत्याचे प्रशिक्षण दिले. आपल्या वाडवडिलांप्रमाणे कथ्थक नृत्यविश्वात स्वत:चे एक अढळ स्थान निर्माण करण्यासाठी त्यांनी एकच शस्त्र वापरले. हे शस्त्र होते ‘रियाजा’चे.
पं. बिरजू महाराज यांनी आपल्या उमेदीच्या काळात केलेला ‘रियाज’ हा त्यांच्या यशाची साक्ष देतो. लखनौवरुन दिल्लीत आल्यानंतर पहाटे 5 वाजता उठून त्यांचा ‘रियाज’ सुरू व्हायचा. खोलीच्या खिडक्या आणि दिवे बंद करुन अंधारात त्यांचा ‘पदन्यास’ म्हणजेच ‘तत्कारा’चा ‘रियाज’ सुरू होत असे. जोपर्यंत घामामुळे जमीन ओली होऊन त्यावरुन पाय सरकत नाहीत, तोपर्यंत हा ‘रियाज’ सुरू असायचा. कथ्थकमधल्या पारंपरिकतेला जपून त्यामध्ये विविधांगी बदल करण्याचे श्रेय पं. बिरजू महाराज यांना जाते. लखनौ घराण्यातील अंगसंचलनाला सुबक रुप आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा. नृत्याच्या सौंदर्याकडे त्यांचा विशेष जोर होता. एखाद्या बंदिशीच्या अंगसंचलनाचा विचार करताना ते शरीरातील प्रत्येक अवयवांचे भान राखून नृत्यरचना करायचे. नाचताना एक अवयव शरीराच्या दुसर्‍या अवयवाशी कशा पद्धतीने सुसंगत होईल आणि त्यामुळे या बंदिशीमध्ये कशी सुबकता येईल, याचा खोलवर विचार महाराज करायचे. आपण नृत्य करण्यापूर्वी भूमीचे आभार मानून तिचे आशीर्वाद घेतो, पण नृत्यामध्ये साथ देणार्‍या हाता-पायांचे आभार आपण मानतो का, असा नृत्याचा अगदी खोलवर विचार ते करत.


नृत्यपक्षात सादरीकरण करतेवेळी तोडा-तुकड्यांच्या रचना सादर करताना समेवर येण्यासाठी काही मोजकेच नृत्यबंध (पोझ) होते. या नृत्यबंधांमध्ये विविधता आणण्याचे काम त्यांनी केले. शंभू आणि लच्छू महाराजांनी आपल्या नृत्य सादरीकरणावेळी अनावधतेने दिलेले काही नृत्यबंध त्यांनी टिपले. या नृत्यबंधांच्या बड्या खुबीने वापर आपल्या सादरीकरणात केला आणि त्याचा प्रसारही केला. हा वापर इतक्या खुबीने होता की, त्याला विरोधही झाला नाही. त्याचे कोणाला काही वावगेही वाटले नाही आणि कथ्थक नृत्याच्या प्रवाहात त्या सरमिसळूनही गेल्या. नृत्यरचनांमधील लयीचे महत्त्व आणि रसिकांना त्याचा आनंद देण्याचे काम महाराजांनी मोठ्या कौशल्याने केले. लय ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून ती सर्वव्यापी असण्यावर त्यांचा विश्वास होता. रचनांमध्ये लयीला एक चित्ररूपी माध्यम त्यांनी निर्माण करुन दिले. त्यामुळे ठुमरी आणि भजनाशिवाय त्यांनी रचलेल्या ‘तोडा-तुकड्या’सारख्या तांत्रिक स्वरुपाच्या रचनाही लयबद्धतेबरोबरच श्रवणीय झाल्या. कारण, त्यांना केवळ शास्त्रीय संगीताचे नाही, तर लोकसंगीताचेही उत्तम ज्ञान होते. दोन्ही संगीत पद्धतीमधील वाद्ये त्यांना खुबीने वाजवता येत होती. त्यामुळे अनेकदा त्यांनी रचलेल्या शास्त्रीय रचनांमध्येही लोकसंगीताचा बाज प्रकर्षाने जाणवून येतो. नृत्यप्रिय रसिकांच्या अनेक पिढ्या त्यांच्या डोळ्यांसमोरून गेल्या होत्या. त्यामुळे कार्यक्रमानुरूप समोर असलेल्या रसिकांचा विचार करुन आकर्षक रचनांचे सादरीकरण ते करायचे. ‘बृजश्याम’ या नावाने अनेक ठुमरी आणि भजनांच्या रचना त्यांनी रचल्या आहेत.1990च्या दशकानंतर पं. बिरजू महाराजांनी समकालीन प्रतिस्पर्धी कोणीच नव्हते. जेव्हा होते तेव्हा त्यांच्याशी त्यांचे सौहार्दाचे संबंध होते. कथ्थकच्या बनारस घराण्याचे उत्कृष्ट नर्तक पं. नटराज गोपीकृष्ण हे प्रतिस्पर्धी असूनही महाराजजी बर्‍याचदा त्यांच्या सादरीकरणामध्ये तबलावादन करताना दिसायचे. द्वेष, मत्सर आणि अहम् या दोषांचा लवलेशही महाराजांमध्ये नव्हता. साधेपणा हा स्वभावगुण असल्याने ते कधीच कोणाशी संतापून वागले नाही. एक छोटा बालक त्यांच्यामध्ये दडलेला होता. रचना शिकवताना बर्‍याचदा हा बालक त्यांच्यामधून डोकवायचा. वयोमानानुसार रंजकतेने मुलांना एखादी रचना शिकवण्याची कसब त्यांच्यामध्ये होती. बदलत्या काळानुसार स्वत:च्या आवडीनिवडी आणि स्वभाववैशिष्ट्यांमध्येही त्यांनी काही बदल केले. बदलते तंत्रज्ञान आणि त्यानुसार तयार होणार्‍या ‘गॅजेट’मध्ये त्यांना विशेष रस होता. एखादे नवीन आलेले ‘गॅजेट’ ते खरेदी करत आणि त्याचा वापरही करत.
 
 
 
कथ्थक नृत्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी वयाच्या 80व्या वर्षापर्यंत जगभर पायपीट केली. लाखो किलोमीटरचा प्रवास केला. मात्र, या प्रवासात त्यांनी आपल्या धर्माशी आणि आस्थेशी कदापि तडजोड केली नाही. ते निस्सिम कृष्णभक्त होते. “रचनेची सम ही कलाकाराच्या आनंदाचा परमोच्च शिखर असतो आणि त्या समेवर आल्यानंतर तिथे मला कृष्णा दिसतो,” असे ते म्हणायचे. जगभरातील प्रवासादरम्यान देवांच्या मूर्तींची एक पेटी आणि पूजा साहित्याचा संच त्यांच्यासोबत कायम असायचा. हॉटेलमध्ये गेल्यावर खोलीमध्ये पेटीतील मूर्ती काढून त्या ते साग्रसंगीतपणे मांडायचे. पहाटे धुपारती व्हायची. चंदन उगाळून ते देवाच्या मस्तकी आणि कपाळी लावून महाराजांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. वयाने मोठ्या झालेल्या आणि आपल्या प्रियजनांना गमावलेल्या माणसाचा प्रत्येक दिवस आपल्या प्रियजनांच्या स्मृतींनी ठेचाळून व्यथित होत असतो. महाराजांचेही तसेच काहीसे झाले होते. आयुष्यभर रंगमंच गाजवलेला हा माणूस ‘कोविड’चे बंधन आणि वाढत्या वयामुळे घरापुरताच सीमित झाला होता. तरीही ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून ते जगभरातील आणि आपल्या ‘कलाश्रम’ या नृत्यसंस्थेतील विद्यार्थ्यांशी जोडलेले होते. नर्तक, वादक, कवी, संगीतकार, गायक, चित्रकार अशा या बहुआयामी श्रेष्ठ कलाकाराचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि असंख्य कलारसिक पोरके झाले.


(लेखक दै. ’मुंबई तरुण भारत’चे पर्यावरण प्रतिनिधी असून पं. बिरजू महाराज यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी नृत्य सादरीकरण केले आहे.)

@@AUTHORINFO_V1@@