पर्यटकांनी गजबजलेल्या तारकर्ली- देवबाग बीचवर सापडली समुद्री कासवाची घरटी

    दिनांक  12-Jan-2022 18:36:19   
|
sea turtle


मुंबई (अक्षय मांडवकर) -
सिंधुुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांनी गजबजलेल्या तारकर्ली आणि देवबाग किनाऱ्यावर समुद्री कासवाची ( sea turtle ) अंडी आढळून आली आहेत. मंगळवार ११ जानेवारी आणि बुधवार, १२ जानेवारी रोजी याठिकाणी स्थानिकांना समुद्री कासवाची ( sea turtle ) दोन घरटी सापडली. स्थानिकांच्या मदतीने वन विभागाकडून ही घरटी संवर्धित केली जाणार आहेत.
  
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील (sea turtle) 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा ( sea turtle ) विणीचा हंगाम असतो. यामध्ये वन विभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १३ किनाऱ्यांवर कासवांची विण होते. मात्र, वन विभागाकडे कासव विणीचे किनारे म्हणून नोंद नसलेल्या किनाऱ्यांवर देखील आता लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, यंदाच्या हंगामातील 'ऑलिव्ह रिडले' कासवाचे ( sea turtle ) राज्यातील पहिले घरटे हे रायगड जिल्ह्यातील आरवी किनाऱ्यावर सापडले होते. त्यानंतर आता अशाच प्रकारे वन विभागाच्या कासव विणीचे किनारे म्हणून नोंदीत नसलेल्या तारकर्ली आणि देवबाग किनाऱ्यावर सागरी कासवाची ( sea turtle ) घरटी आढळून आली आहेत.


मंगळवार, ११ जानेवारी रोजी देवबाग किनाऱ्यावर पहाटे अंडी घालण्यासाठी आलेल्या मादी आॅलिव्ह रिडले कासवाला स्थानिक पंकज मालंडकर यांनी पाहिले. त्यांचे वडील आनंद मालंडकर कासव संवर्धनाचे काम करत असल्याने त्यांनी ही अंडी आहे त्याच ठिकाणी संवर्धित केली आहेत. तसेच बुधवार, १२ जानेवारी रोजी सकाळी तारकर्ली किनाऱ्यावर सागरी कासवाचे एक घरटे सापडले. हे दोन्ही किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटन होत असल्याने झालेली सागरी कासवांची ( sea turtle ) घरटी ही महत्त्वाची नोंद असल्याची माहिती 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'चे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे यांनी दिली. तसेच देवबागमधून जवळपास सहा वर्षांनंतर सागरी कासवाची ( sea turtle ) नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले. तारकर्ली आणि देवबाग किनाऱ्यावर झालेल्या घरटी आपण स्थानिकांच्या मदतीने 'इन-सेतू' पद्धतीने म्हणजेच आहेच त्या ठिकाणी ठेवून संवर्धित करणार असल्याची माहिती कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी दिली.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.