हिमनद्या वितळल्या...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2022   
Total Views |

Glaciers
 
 
 
जागतिक तापमान बदलामुळे हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत असल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे आशियातील लाखो लोकांच्या पाणीपुरवठ्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. साधारण ४००-७०० वर्षांपूर्वी मोठ्या हिमनद्यांचा शेवटचा विस्तार झाला. तेव्हापासून गेल्या काही दशकांमध्ये हिमनद्या सरासरीपेक्षा दहापट अधिक वेगाने वितळत आहेत. ‘सायन्टिफिक रिपोर्ट्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असेही दिसून आले आहे की, हिमालयातील हिमनद्या जगातील इतर भागांतील हिमनद्यांपेक्षा कितीतरी वेगाने आक्रसत आहेत. युकेमधील लीड्स विद्यापीठातील संशोधकांच्या संघाने १४,७९८ हिमालयीन हिमनद्यांचा आकार आणि बर्फाच्या पृष्ठभागाची पुनर्रचना केली. त्यांनी मोजले की, हिमनद्यांनी त्यांचे सुमारे ४० टक्के क्षेत्र गमावले आहे. हे क्षेत्र २८ हजार चौरस किलोमीटरवरुन १९,६०० चौरस किलोमीटरपर्यंत कमी झाले आहे. या काळात हिमनद्यांमधील ३९० ते ५८६ घन किलोमीटरपर्यंत बर्फ वितळला आहे. यामुळे समुद्राची पातळी ०.९२ मिलिमीटर (मिमी) ते १.३८ मिमी दरम्यान वाढली आहे. हिमालय पर्वत रांग ही अंटार्क्टिका आणि आर्क्टिकनंतर जगातील तिसर्‍या क्रमांकाच्या हिमनद्यांचे घर आहे. तसेच बरेचदा या पर्वतरांगाना ’तिसरा ध्रुव’ म्हणून देखील संबोधले जाते. अन्न आणि उर्जेसाठी आशियातील प्रमुख नद्यांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांवर हिमालयातील हिमनद्या वितळण्याच्या गतीचा महत्त्वपूर्ण परिणाम होत आहे. या नद्यांमध्ये ब्रह्मपुत्रा, गंगा आणि सिंधू या काही प्रमुख नद्यांचा समावेश आहे. संशोधकांच्या चमूने ४०० ते ७०० वर्षांपूर्वी हिमनद्यांच्या विस्ताराची रूपरेषा तयार करण्याबरोबरच बर्फाच्या पृष्ठभागाची ‘पुनर्रचना’ करण्यासाठी उपग्रह प्रतिमा आणि डिजिटल एलिव्हेशन मॉडेल्सचा वापर केला. यामुळे हिमालयातील हिमनद्या सामान्यत: पूर्वेकडील प्रदेशांमध्ये वेगाने वितळत असल्याचे समोर आले. हा भाग पूर्व नेपाळ आणि भूतानमधील आहे. या हिमनद्या ज्याठिकाणी सरोवरांना येऊन मिळतात, त्याठिकाणचा भाग वेगाने वितळत असल्याचेही लक्षात आले आहे. परिणामी, सरोवरांची संख्या आणि आकार वाढत आहे. हिमनद्यांवर मानवनिर्मित हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
 
 
 
अंटार्क्टिकालाही धोका
 
जगापासून लाखो वर्षांपूर्वी नैसर्गिकरित्या विलग झालेल्या अनेक प्रदेशनिष्ठ प्रजातींचे अंटार्क्टिका हे निवासस्थान. मात्र, आता येथील प्रजातींनाही धोका निर्माण झाला आहे. हा धोका आहे मानवांमुळे या खंडावर दाखल होणार्‍या दुसर्‍या आक्रमक जीव प्रजातींचा. जगभरातून अंटार्क्टिकात संशोधन, मासेमारी आणि पर्यटनासाठी येणार्‍या जहाजांमधून वाहून येणार्‍या जीव प्रजातींमुळे अंटार्क्टिकाच्या मूळ सागरी परिसंस्थेला धोका निर्माण झाला आहे. ‘ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षण’ आणि केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधन पथकाने याबाबत एक सर्वेक्षण केले, ज्यामधून जगभरातील १,५०० बंदरांवरून जहाजे अंटार्क्टिकाला भेट देत असल्याचे समोर आले. म्हणजेच ही जहाजे अंटार्क्टिकाला जगभरातील १,५०० पेक्षा अधिक बंदरांशी जोडतात. या जहाजांमधून वाहून आलेल्या जीव प्रजाती अंटार्क्टिकावर पूर्णपणे नवीन निवासस्थान तयार करू शकतात. परिणामी, अंटार्क्टिकमधील प्रदेशनिष्ठ प्रजातींना अधिवास तयार करण्यामध्ये स्पर्धा निर्माण होईल आणि त्यांना स्वतःचे स्थान शोधणे कठीण जाईल. त्यामुळे आक्रमक जीव प्रजाती या अंटार्क्टिका खंडावर येऊ नयेत, याची खात्री करण्यासाठी अधिक कठोर उपाय आवश्यक आहेत. शिंपले, बार्नाकल्स, खेकडे आणि एकपेशीय वनस्पती हे अंटार्क्टिका खंडासाठी चिंतेचे आहेत. कारण, ते ‘बायोफौलिंग’ नावाच्या प्रक्रियेत स्वत:ला जहाजाच्या पृष्ठभागाशी चिकटून घेतात. उदाहरणार्थ, शिंपले हे ध्रुवीय पाण्यात टिकून राहू शकतात आणि त्यांचा प्रसार सहज होऊ शकतो. अंटार्क्टिकाच्या प्रदेशनिष्ठ प्रजाती या गेल्या १५ ते ३० दशलक्ष वर्षांपासून वेगळ्या आहेत. जगातील हे शेवटचे ठिकाण आहे जिथे सागरी परिसंस्थेतील आक्रमक जीव प्रजाती नाहीत. अंटार्क्टिकावर पर्यटनाचे नियमन आहे. मात्र, याठिकाणी भेट देणार्‍यांमध्ये सर्वाधिक वाटा पर्यटनाचा आहे (६७ टक्के). त्यानंतर संशोधन (२१ टक्के आणि मासेमारीचा (सात टक्के) वाटा आहे. ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अंटार्क्टिक टूर ऑपरेटर्स’च्या मते, २०१९-२० या हंगामात ७० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या प्रदेशाला भेट दिली. ही संख्या वाढत आहे. त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम आहेत. कारण, मोठ्या संख्येबरोबर याठिकाणी एखादी आक्रमक जीव प्रजाती येऊ शकते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@