सावंतवाडी-दोडामार्ग इको सेन्सटिव्ह झोन प्रकरण; 'डब्लूआयआय'ने केली १९ प्रजातींची नोंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2021   
Total Views |
tiger_1  H x W:मुंबई (अक्षय मांडवकर) -
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थानने (डब्लूआयआय) केलेल्या पहिल्या सर्वेक्षणामध्ये वन्यजीवांच्या १९ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये दुर्मीळ प्राण्यांची नोंद करण्यात आली असून लवकरच हिवाळी सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. सावंतवाडी आणि दोडामार्गमधील वाढती वृक्षतोड आणि लागवडीखाली जाणारी जमीन पाहता या क्षेत्राला पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी 'डब्लूआयआय'च्या सर्वेक्षणातील माहिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
 
 
 
पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रासंदर्भात स्थापन केलेल्या गाडगीळ अभ्यास समितीने (डब्लूजीईईपी) सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यांना संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची शिफारस केलेली होती. या शिफारसीसंदर्भात निर्णन न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यात खाणकाम आणि वृक्षतोडीवर बंदी आणून हा परिसर पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र वन विभागाला या दोन तालुक्याची पर्यावरणीय स्थिती आणि येथील गावांमधील वन्यजीवांच्या अधिवासासंदर्भात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार वन विभागाने सर्वेक्षणाचे काम भारत सरकारच्या 'डब्लूआयआय' या संस्थेला दिले. या संस्थेच्या संशोधकांनी मार्च ते जून, २०२१ या काळात सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील पहिले उन्हाळी सर्वेक्षण पूर्ण केले आहे.
 
 
 
'डब्लूजीईईपी'ने सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील २५ गावांचा समावेश पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात करण्याची मागणी केली होती. यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील १५ गावांचा आणि दोडामार्ग जिल्ह्यातील १० गावांचा समावेश आहे. 'डब्लूडब्लूआय'चे संशोधक हे सावंतवाडीतील या दहा, तर दोडामार्गमधील सर्व गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम करत आहे. 'डब्लूआयआय'च्या सर्वेक्षणाचा हा अहवाल दै.'मुंबई तरुण भारत'च्या हाती लागला आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत मार्च ते जून, २०२१ या काळात पार पडलेल्या पहिल्या उन्हाळी सर्वेक्षणामध्ये वन्यजीवांच्या १९ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.यामध्ये स्ट्राईप नेकड् मुंगूस, वाघाटी (रस्टी स्पाॅटेड कॅट), चौशिंगा, खवले मांजर अशा दुर्मीळ प्रजातींचा समावेश आहे.

 
 
कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपलेल्या छायाचित्रांच्या आधारे वन्यजीवांची नोंद करण्यात आली आहे. अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे संशोधकांनी पोड्येंमधून सांबर, हेवाळेमधून गवा, तेरवणमेढेमधून पिसूरी हरीण आणि बिबट्या, कोणालमधून रानकुत्रे, वाघाटी, स्ट्राईप नेकड् मुंगूस आणि एका गावामधून खवले मांजराची नोंद केली आहे. याशिवाय संशोधकांनी विविध प्राण्यांच्या विष्ठेचे १४३ नमुने गोळा केले आहेत. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वृक्षतोड आणि अननस-रबर लागवडीखाली जाणाऱ्या खासगी जंगलक्षेत्रावर बंदी घालण्यासाठी पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राची घोषणा आवश्यक आहे. या क्षेत्राच्या घोषणेसाठी हे सर्वेक्षण अहवाल महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

 
 
 
दक्षिण पश्चिम घाटाला जोडणारा वन्यजीव भ्रमणमार्ग हा सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यामधून जातो. त्यामुळे हा परिसर पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या क्षेत्रामध्ये डब्लूआयआयकडून दोन वर्षांचा अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासासाठी ८१ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
 
- डाॅ. व्ही. क्लेमेंट. बेन, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर
 
 
 
या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आम्ही केवळ वन्यजीवांच्या अधिवासाची नोंद नाही, तर त्यांच्या अधिवासाकरिता संवदेनशील असणाऱ्या क्षेत्रांचीही नोंद करत आहोत. कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून प्रत्यक्ष वन्यजीवांच्या नोंदी आणि गावकऱ्यांशी संवाद साधून वन्यजीवांच्या अधिवासाच्या नोंदी घेण्यात येत आहेत. आॅक्टोबर महिन्यात या अभ्यासातील हिवाळी सर्वेक्षणाचे काम सुरू होईल.
 
- एस.पी.गोयल, वरिष्ठ संशोधक, डब्लूआयआय
 
 

@@AUTHORINFO_V1@@