रंगांचा जादूगार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2021   
Total Views |

Sumit Patil_1  
 
 
रंगांना सुंगधित करून दृष्टिबाधितांना रंगकलेचे वेगळे विश्व निर्माण करून देणाऱ्या डॉ. सुमित संजय पाटील यांच्याविषयी...
 
 
चित्र ही एक भाषा आहे आणि रंग हे जगण्याचे एक साधन. याच विचाराने चित्रमय आयुष्याच्या पाऊलवाटांवर मार्गस्थ असलेला हा कलाकार. आयुष्यभराचा काजळी काळोख लाभलेल्या अंध मुलांच्या आयुष्यात रंगाचे शिंतोडे उडवून त्यांचे आयुष्य ‘रंगगंध’ करणारा. द़ृश्य कलेची ताकद आणि सर्जनशीलतचे सामर्थ्य लाभलेला हा माणूस म्हणजे चित्रकार आणि कलादिग्दर्शक डॉ. सुमित पाटील.
 
 
सुमितचा जन्म दि. २२ जून, १९८९ साली मुंबईत झाला. त्याचे वडील संजय पाटील हे पोलीस विभागात नोकरीला होते, तर आई स्नेहल पाटील या शिक्षिका. नायगावच्या ‘बीडीडी’ चाळीमध्ये सुमितचे बालपण गेले. आजही सुमित ‘बीडीडी’ चाळीतील त्याच दहा बाय दहाच्या खोलीत राहतो. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये त्याचे बालपण गेले. आई शिक्षिका असल्याने शैक्षणिक पार्श्वभूमी तशी भक्कम होती. मात्र, लहानपणीच सुमितला रेखीव चित्र रेखाटण्याची आवड निर्माण झाली. ‘दूरदर्शन’वर लागणाऱ्या महाभारत आणि रामायणातील पात्र, त्यातील प्रसंग त्याला आकर्षित करायचे. हेच प्रसंग आणि पात्र सुमित कागदावर रेखाटण्याचा प्रयत्न करायचा. कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी आणि पाठिंबा नसताना सुमितची चित्रकला आणि हस्तकलेचे जग बहरत होते.
 
 
दादरच्या पाटकर गुरुजी विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेत असताना सुमितचा चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. त्यावेळी त्याच्या पालकांना त्याच्यामध्ये असलेल्या दृश्यकलेची क्षमता लक्षात आली आणि माध्यमिक शिक्षणापासून सुमितचा चित्रप्रवास सुरू झाला. चित्रकला, हस्तकला किंवा रांगोळी काढणे हा मुलींचा आवडीचा विषय आहे, असा विचार सुमित राहत असलेल्या ठिकाणी होता. अशा परिस्थितीत या विचारांना बळी न पडता, सुमित माध्यमिक शिक्षणादरम्यानच वेगवेगळ्या वस्तू वापरून भव्य रांगोळ्या काढायचा. तांदळाचा वापर करून, तर कधी कोबी आणि मुळ्याचा वापर करून तो रांगोळ्या रेखाटायचा. चित्रकला ही सुमितमध्ये उपजतच असल्याने इयत्ता आठवीपासून त्याने चित्रकलेच्या शिकवण्या सुरू केल्या. दहावीत असताना मात्र त्याच्या आयुष्याला मोठे वळण मिळाले. हे वळण होते ‘बालश्री’चे. सुमितच्या अंगी असलेली सर्जनता पाहून तो दहावी इयत्तेमध्ये असताना तो शिकत असलेल्या राजा शिवाजी महाविद्यालयामधून त्याला भारत सरकारच्या ‘बालश्री’ स्पर्धेसाठी पाठवण्यात आले. ‘क्रिएटिव्ह आर्ट’ या माध्यमातून विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सुमितने या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केली. याची प्रचिती म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याकडून ‘बालश्री’ हा मानाचा पुरस्कार त्याला मिळाला. या पुरस्कारानंतर सुमितच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. ‘बालश्री’ पुरस्कार मिळाल्यानंतर मनश्री सोमण या अंध मुलीने त्याला चित्रकला शिकवण्याची विनंती केली. सुमितने समोर आलेले हे आव्हान पेलले. गेल्या १६-१७ वर्षांमध्ये सुमितने १,५००दिव्यांग मुलांना चित्रकलेचे धडे दिले आहेत. ज्यांचे आयुष्यच रंगहीन आहे, अशा अंध मुलांचे आयुष्य त्याने रंगमय केले. ‘रंगगंध’ या उपक्रमाच्या माध्यमातून रंगांना सुंगधित करून त्याने दृष्टिबाधितांना रंगकलेचे वेगळे विश्व निर्माण करून दिले. सध्या सुमित या सर्जनशील अंध मुलांना सोबत घेऊन त्यांनी निर्माण केलेली चित्रं आणि हस्तकला समाजासमोर सादर करत आहे.
 
 
शालेय शिक्षणानंतर सुमितने कीर्ती महाविद्यालयात प्रवेश घेतला. या काळात आपल्या कलासाधनेला स्वत:च आर्थिक पाठबळ देण्यासाठी त्याने नोकरी करायला सुरुवात केली. ग्रिटिंग कार्डच्या कंपनीमध्ये काम करून तो अभिनेत्री आणि दिग्दर्शिका स्मिता तळवळकर यांच्या ‘अस्मिता चित्र’ या निर्मिती संस्थेमध्ये काम करू लागला. इथल्या मुलांना चित्रकला शिकवणे, बालनाट्याचे कलादिग्दर्शन करण्याचे तो काम करू लागला. नाट्य शिक्षिका विद्याताई पटवर्धन यांच्या बालनाट्यामध्येही त्याने नेपथ्य उभारण्याचे काम केले. या सर्व कामामुळे त्याचा चित्रपटसृष्टीत आणि मुळात नेपथ्य आणि कला दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश झाला. महाविद्यालयामध्येच असतानाच त्याने प्रायोगिक नाटकांसाठी नेपथ्यकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आजवर सुमितने 55 प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमध्ये नेपथ्यकार म्हणून काम पाहिले आहे. नेपथ्यांमध्ये निरनिराळे प्रयोग केले आहेत. या कामांसाठी त्याला ‘झी गौरव’सह अनेक नामांकित पुरस्कारदेखील मिळाले आहेत.
 
 
‘रचना संसद’मध्ये ‘अप्लाईड आर्ट’चे शिक्षण घेत असताना येथील शिक्षिका मानसी केणी यांचा सुमितला पाठिंबा मिळाला. या ठिकाणी त्याने तयार केलेल्या संकल्पानाधारित शिल्पांचे कौतुक झाले. ‘काळा घोडा महोत्सवा’सह देशभरातील अनेक नामांकित महोत्सवामध्ये त्याच्या वास्तू प्रदर्शित झाल्या आहेत. त्यामधील ‘कावळा’, ‘पोलीस’, ‘सिनेमांचे १०० वर्ष’ ही शिल्पं विशेष गाजली आहेत. पर्यावरणातील घटकांचा वापर करून चित्र किंवा शिल्प उभारण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. सुमितने आजवर २० चित्रपटांसाठीही कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. ४५ राष्ट्रीय, १७० राज्यस्तरीय आणि ३०० जिल्हास्तरीय पुरस्कारांचा तो धनी आहे. निसर्गात आणि समाजात दुर्लक्षित राहिलेल्या घटकांवर खास करून माणसं, संस्कृती आणि कलांवर सुमित आपल्या ‘श्रीरंग प्रतिष्ठान’च्या माध्यमातून प्रकाश टाकत आहे. दिव्यांगांच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या आणि कलेच्या माध्यमातून निसर्गाचे ऋण फेडणाऱ्या सुमितला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@