‘तुमच्या हिंदू धर्माला संपवून टाकू...’; सीबीआयच्या बंगाल हिंसाचार तपासात धक्कादायक खुलासे

    दिनांक  11-Sep-2021 15:33:23   
|
wb_1  H x W: 0


तृणमूल काँग्रेसचा भयावह चेहरा सीबीआय तपासात उघड होत आहे
 
 
 
 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : “तृणमूल काँग्रेसच्या पाच गुंडांनी माझ्या मुलाचे जीव घेण्याच्या उद्देशाने अपहरण केले. त्याला मरेपर्यंत जबर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर ‘तुमच्या हिंदू धर्मालाही असेच संपवून टाकू’ अशी धमकी आम्हाला देण्यात आली”. मयत बलराम माझी यांच्या आईने सीबीआयकडे नोंदविलेल्या एफआयआरमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे आता सीबीआय तपासामध्ये पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा भयावह चेहरा उघड होत आहे.
 
कोलकाता उच्च न्यायालयाने प. बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची सीबीआय आणि एसआयटी चौकशी करण्याचा आदेश दिला होता. सीबीआयला ३० सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. सीबीआयने २५ ऑगस्टपासून तपासाला सुरुवात केली असून ८ सप्टेंबरपर्यंत ३४ एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. त्यापैकी २२ प्रकरणांची एफआयआर सीबीआयने आपल्या संकेतस्थळावर सार्वजनिक केली असून त्यामध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा हिंसक अजेंडा समोर आला आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयाद्वारेच भाजप कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
 
हिंदू धर्मालाही असेच संपवू...
(एफआयआर क्रमांक - RC0562021S0012, तक्रारदार – तुम्पा माझी, पूर्व वर्धमान जिल्हा)
 
बलराम माझी (वय – २२ वर्षे) यांची आई तुम्पा माझी यांनी एफआयआरमध्ये आपल्या एफआयआरमध्ये म्हटले, आमच्या घरावर शहिदूल आसम मोल्ला, सहानुर आलम मोल्ला, मेहेरदान एसके, शाहजहान एसके आणि कमालुद्दीन एसके यांनी लोखंडी सळ्या, पिस्तुल, बॉम्ब आदींसह हल्ला केला. त्यांनी माझ्या मुलाचे अपहरण केले आणि त्याला रक्तबंबाळ होईपर्यत मारहाण केली. पुढे रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र, ‘तुमच्या हिंदू धर्मालाही असेच संपवून टाकू’ अशी धमकी त्यांनी आम्हाला दिली आहे.
 
 
 
पती नव्हता म्हणून पत्नीची हत्या
(एफआयआर क्रमांक - RC0562021S0017, तक्रारदार – ममोनी खेत्रपाल, पूर्व वर्धमान जिल्हा)
 
ममोनी खेत्रपाल यांनी एफआयआरमध्ये त्यांचे शेजारी अनिल खेत्रपाल यांच्या पत्नीच्या हत्येविषयी सीबीआयला माहिती दिली आहे. तृणमूल काँग्रेसच्या काही समर्थक माझे शेजारी अनिल खेत्रपाल आणि त्यांच्या मुलाचा शोध घेत आले. त्यावेळी अनिल आणि त्यांचा पुत्र घरात नव्हता, त्यांची पत्नी काकुली खेत्रपाल यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तृणमूल काँग्रेस समर्थकांनी काकुली यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनिल खेत्रपाल आणि त्यांच्या भावालाही जबर मारहाण करण्यात आली.
 
 
 
मुस्लिम वस्तीत नेऊन भाजप कार्यकर्त्यास जबर मारहाण
(एफआयआर क्रमांक - RC0562021S0005, तक्रारदार – अयान मोंडल, नदिया जिल्हा)
 
आमचे संपूर्ण कुटुंब हे भाजपसमर्थक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आमचे नातेवाईक संजित मोंडल यांना ८ गुंडांनी मारहाण करत जवळच्या मुस्लिम वस्तीमध्ये नेण्यात आले. तेथेही त्यांना जबर मारहाण करण्यात आली, आम्ही त्यांना सोडविण्यासाठी गेलो असता आम्हालाही चॉपर आणि अन्य शस्त्रांनी मारहाण केली. या प्रकारात माझा मोठा भाऊ अतिशय गंभीररित्या जखमी झाला आहे.
 
  
 
तृणमूलसाठी काम कर, नाहीतर तुझं आयुष्य नरक बनवू
(एफआयआर क्रमांक - RC0562021S0004, तक्रारदार – वंदना खेत्रपाल, बांकुरा जिल्हा)
 
तक्रारदार वंदना खेत्रपाल यांच्या एफआयआरनुसार, माझा मुलगा कुश खेत्रपाल हा दीर्घकाळापासून भाजपचा कार्यकर्ता होता. मात्र, कनन खेत्रपाल, मोतीलाल खेत्रपाल, एसएल कुमार खेत्रपाल, दिलीप खेत्रपाल हे त्याच्यावर सातत्याने तृणमूल काँग्रेससाठी काम करण्याची आणि न ऐकल्यास आयुष्य नरक बनवू, अशी धमकी देत होते. त्याचप्रमाणे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश न केल्यास त्याला जबरदस्ती दारू पाजून तलावात बुडविण्याचीही धमकी देत होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर त्यांनी माझ्या मुलाचे अपहरण केले. त्याचा मृतदेह आम्हाला बिश्तम तलावाजवळ सापडला, त्यामुळे धमकी देणाऱ्यांनीच त्याची हत्या केल्याचा आमचे म्हणणे असल्याचे वंदना खेत्रपाल यांनी म्हटले आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.