फुलपाखरांची राणी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2021   
Total Views |

Mangal Rane_1  
 
 
निसर्गाची कास धरून त्यामधील फुलपाखरांचे विश्व आपल्या कॅमेर्‍यात कैद करणार्‍या मंगल अर्जुन राणे यांच्याविषयी...
 
श्रावण सुरू झाल्यावर निसर्गाला नवचैतन्य येऊन ‘जीवो जीवस्य जीवनम्’ याची आपल्याला प्रचिती येते. श्रावण म्हणजे निसर्गातील फुलांचा उत्सव. जितकी फुलं अधिक तितका फुलपाखरांचाही बहर अधिक. फुलपाखरांचा हाच बहर आपल्या कॅमेर्‍यात टिपून त्यांची नोंद करणारी फुलपाखरांची राणी म्हणजे मंगल राणे. ठाण्यात वास्तव्यास असणार्‍या राणे या खर्‍या अर्थाने फुलपाखरांच्या मैत्रीण आहेत. कारण, फुलपाखरांच्या वेडापोटी त्या रत्नागिरीत प्रवास करतात. हाती न लागणार्‍या आणि विहरत राहणार्‍या फुलपाखरांची छायाचित्र टिपण्याचे कसब राणे यांनी साधले आहे. छायाचित्रणाच्या आवडीमुळे फुलपाखरांचा लागलेला छंद जोपण्यासाठी त्यांचे प्रकार, जीवनचक्र आणि वैशिष्ट्यांचा अभ्यास केला. रत्नागिरीत फुलपाखरांची नोंद करून त्यांनी अप्रत्यक्षपणे ‘सिटिझन सायन्स’ मोहिमेला खतपाणी घातले आहे.
 
 
 
कोल्हापुरातील भुईबावडा येथे दि. २५ मे, १९७१ साली राणे यांचा जन्म झाला. वडिलांच्या नोकरीनिमित्ताने त्यांचे रत्नागिरीत वास्तव्य झाले. त्यामुळे लहानपणापासूनच तिथला निसर्ग त्यांना खुणावू लागला. त्या एकट्याच निसर्गात रममाण होत. निसर्गाच्या छंदामुळेच त्याचे प्रतिबिंब पांढर्‍या पानावर रेखाटण्याची आवड त्यांना निर्माण झाली. चित्रकलेची आवड पुढे बहरत गेली. त्यातूनच पुढच्या काळात त्यांना छायाचित्र टिपण्याचा छंद जडला. त्यांनी छायाचित्र काढण्याची सुरुवात छोट्या कॅमेर्‍यापासून केली. त्यानंतर मोबाईल कॅमेरा, ‘पॉईंट अ‍ॅण्ड शूट कॅमेरा’ आणि आता ‘डीएसएलआर’ कॅमेर्‍याने त्या छायाचित्र टिपतात. चित्रकलेने त्यांना निसर्ग कागदावर रेखाटण्याचा आनंद दिला, तर कॅमेर्‍याने निसर्गातील अविस्मरणीय क्षण कॅमेर्‍यात कैद करण्याचे माध्यम दिले. त्यामुळे त्या क्षणाचा निसर्ग कायमचा छायाचित्रात कैद करून आपल्यासोबत ठेवता येऊ लागल्याने त्यांचा छायाचित्रणाचा ध्यास वाढत गेला. स्वतः काढलेल्या फोटोंबाबत असमाधानी राहून त्या सातत्याने नावीन्याचा ध्यास घेतात. त्यामुळेच उत्तमोत्तम फोटो टिपण्याकडे त्यांचा कल आहे.
 
 
 
निसर्गातील सूक्ष्म गोष्टींनी राणे यांना आकर्षित केले. त्यामुळे ‘डीएसएलआर’ हाती आल्यानंतर त्यांनी ‘मॅक्रो फोटोग्राफी’ला सुरुवात केली. त्यासाठी लागणारी एकाग्रता आणि स्थिरता अंगी आत्मसात केली. निसर्गातील सूक्ष्म घटकांचे छायाचित्र टिपत असताना साधारण पाच वर्षांपूर्वी फेसबुकवर त्यांनी केतन अलोनी आणि मनोज शिंदे यांनी काढलेली फुलपाखरांची छायाचित्रे पाहिली. ही छायाचित्रे पाहून त्यांना फुलपाखरांच्या सुंदर रंगबेरंगी दुनियेचे वेड लागले. त्यातूनच पुढे त्यांना फुलपाखरांचा जीवनक्रम जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी फुलपाखरांच्या निरीक्षणामधून त्यांचा अभ्यास सुरू केला. फुलपाखरांच्या निरीक्षणातून त्यांनी काही नोंदी नोंदवल्या आहेत. “फुलपाखरांचा आयुष्यकाल फार कमी असतो. फुलपाखरांचे ‘होस्ट प्लॉण्ट’ आणि खाद्य वनस्पती जर आपल्याला समजल्या, तर आपण कोणत्याही फुलपाखराला सहज त्या ठिकाणी जाऊन शोधू शकतो आणि त्यांचे जीवनचक्र पाहू शकतो,” असे त्या सांगतात.
 
 
राणे यांनी आतापर्यंत जवळजवळ १४० फुलपाखरांच्या प्रजातींचे फोटो काढले आहेत. त्यातील रत्नागिरीमध्ये त्यांना ९० पेक्षाही अधिक प्रजाती पाहायला मिळाल्या आहेत. ‘गॉडी बॅरन’, ‘वॉटर स्नो फ्लॅट’, ‘सिल्वर लाईन’, ‘ग्रे काऊंट’, ‘लार्ज ओकब्लू’ अशी अनेक दुर्मीळ फुलपाखरे त्यांनी रत्नागिरीमध्ये आपल्या कॅमेर्‍यात कैद केली आहेत. “सुदैवाने रत्नागिरीमध्ये अजूनही बराच भाग हा दाट झाडीचा आहे. शिवाय, येथे खूप पाणथळ जागा आहेत, जेथे अनेकविध फुलपाखरांचे अस्तित्व आणि मड पडलिंग पाहता येऊ शकते,” असे राणे सांगतात. “रत्नागिरीत अनेक प्रकारची फुलपाखरे आढळतात. त्यामुळे त्यांचा सविस्तर आणि शास्त्रीय पद्धतीने अभ्यास झाल्यास कितीतरी नवीन प्रजातींचा शोध लागू शकतो. फुलपाखरे असली म्हणजे त्यासाठी अनेक पक्षीही येणार. निसर्गातील प्रत्येक गोष्ट एकमेकांसाठी पूरक आहे. तेव्हा एकाचे संवर्धन केले, तर आपोआपच दुसर्‍याचे संवर्धन होते आणि त्यातून निसर्गाचा समतोल राखला जातो,” असेही त्या म्हणतात.
 
 
रत्नागिरीमधील जैवविविधता संपन्न आहे. येत्या काही दिवसांमधील जिल्ह्यातील सडे हे नानाविध फुलांनी सजतील. त्यावर अनेकविध वनस्पती बहरतील आणि या वनस्पतींवर कितीतरी कीटक, फुलपाखरे बागडताना पाहायला मिळतील. शक्य असेल तर प्रत्येकाने हा निसर्गाचा सोहळा अनुभवावा. अर्थात, योग्य ती काळजी घेऊनच. राणे जवळपास गेल्या २० वर्षांपासून छायाचित्रण करत आहेत. त्यामुळे अर्थात त्यांची यात हातोटी निर्माण झाली आहे. शेवटी त्या आपल्याला एक संदेश देतात की, “हा निसर्ग खूप समृद्ध आहे. आपल्याला शक्य होईल तसे आपण त्याचे जतन करूया. शक्य झाल्यास या फुलपाखरांसाठी एखादे तरी ‘नेक्टर प्लांट’ आणि ‘होस्ट प्लांट’ आपल्या दारी लावूया. ज्यामुळे आपली मुले ही फुलपाखरांची सुंदर दुनिया आपल्या घराजवळ अनुभवू शकतील आणि जीवनाचा आनंद अधिक द्विगुणित करतील.”
 
 
@@AUTHORINFO_V1@@