दोडामार्गमध्ये ११ फुटांच्या 'किंग कोब्रा'ला जीवदान; सापांना न मारण्याचे आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2021   
Total Views |

snake _1  H x W
(छायाचित्र - रोहन वारेकर

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामध्ये जगातील सर्वात मोठा विषारी साप असणाऱ्या 'किंग कोब्रा' सापाला जीवदान देण्यात आले आहे. दोडामार्ग तालुक्यात प्रथमच 'किंग कोब्रा' सापाच्या बचावाची घटना घडली आहे. पश्चिम घाटामध्ये या सापाचा अधिवास असून महाराष्ट्रामध्ये केवळ दोडामार्ग तालुक्यात हा साप आढळतो.
 
 
 
'किंग कोब्रा' सापाला 'नागराज' असे म्हटले जाते. दोडामार्ग तालुक्यात त्याला 'डोम' किंवा 'काळा साप' म्हणतात. हा साप विषारी असून तो लांबीने साधारण २० फूटांपेक्षा अधिक वाढतो. कर्नाटक, गोवा आणि केरळमध्ये विस्तारलेल्या पश्चिम घाटामध्ये हा साप प्रामुख्याने आढळतो. पश्चिम घाटामधील 'किंग कोब्रा'च्या अधिवास क्षेत्राची उत्तरेकडील सीमा ही दोडामार्ग तालुका आहे. या तालुक्यातून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच 'किंग कोब्रा'च्या नोंदी आहेत. हा साप मोठा असल्याने त्याला मारून टाकले जाते. त्यामुळे सहजा दोडामार्गमध्ये त्याला जीवदान दिल्याच्या घटना घडत नाहीत. मात्र, रविवार, दि. ८ आॅगस्ट रोजी दोडमार्ग तालुक्यातील एका गावामधून वन विभाग आणि 'सर्प इंडिया' या संस्थेच्या स्वयंसेवकांनी ११ फुटांच्या 'किंग कोब्रा'ला जीवदान दिले.
 
 
 
दोडामार्ग तालुक्यामध्ये 'किंग कोब्रा'ला मारुन टाकण्याच्या घटना लक्षता घेता 'सर्प इंडिया'च्या माध्यमातून या परिसरात जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर 'सर्प इंडिया'चे स्वयंसेवक राहुल निरलगी यांना तालुक्यातील एका गावामध्ये किंग कोब्रा आढळल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सर्प इंडियाचे स्वयंसेवक त्या गावामध्ये गेल्यावर एका घराजवळ असलेल्या बांबूच्या राईमध्ये त्यांना 'किंग कोब्रा' आढळून आला. बांबूचे कोंब काढण्यासाठी गेलेल्या लोकांना त्याठिकाणी असलेल्या 'किंग कोब्रा'चे दर्शन झाल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली. निरलगी यांनी त्या सापाला बाहेर काढून त्यासंदर्भातील माहिती वन विभागाला दिली. तपासणीअंती या सापाचे वजन ५.५ किलो आणि लांबी ११ फूट असल्याचे त्यांनी सांगितले. वन विभागाचे कर्मचारी आणि 'सर्प इंडिया'च्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत या सापाला सुखरुप सोडण्यात आले.
 
 
 
जनजागृतीची आवश्यकता
 
दोडामार्ग तालुक्यामध्ये यापूर्वी 'किंग कोब्रा' दिसल्याच्या नोंदी आहेत. 'तिलारी संवर्धन राखीव वनक्षेत्रा'मध्ये या सापाचा प्रामुख्याने अधिवास आहे. मात्र, या सापाच्या भितीपोटी त्याला मारुन टाकण्याचे प्रकार याठिकाणी घडतात. गेल्या दीड वर्षांमध्ये ३२ वेळा 'किंग कोब्रा' आढळल्याचे आणि तीन ठिकाणी त्याला मारल्याच्या नोंदी आम्ही केल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली. यापार्श्वभूमीवर 'सर्प इंडिया'च्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यात या सापाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, किंग कोब्राच्या छायाचित्र काढण्याच्या हौशीपोटी याठिकाणी येणाऱ्या वन्यजीव छायाचित्रकारांवर नजर ठेवणे आवश्यक आहे. तसेच या सापाला मारणाऱ्या लोकांवरही 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत कारवाई करणे गरजेचे आहे
 
 
 
दोडामार्ग तालुक्यामध्ये 'किंग कोब्रा' आढळत असल्याच्या नोंदी आहेत. मात्र, या सापाच्या बचावाची ही पहिलीच घटना आहे. या बचावकार्यामुळे दोडामार्ग तालुक्यात 'किंग कोब्रा'च्या संरक्षणासंदर्भात नक्कीच जनजागृती होईल. तालुक्यात या सापाचा अधिवास कायम ठेवण्यासाठी त्यांचे संरक्षण महत्त्वाचे आहे. - डाॅ. वरद गिरी, ज्येष्ठ सर्प संशोधक
 
 
@@AUTHORINFO_V1@@