कर्नाळ्यात माकडांना महामार्ग ओलांडण्यासाठी बांधला पूल; हायवेवर 'मंकी लॅडर'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2021   
Total Views |

monkey ladder _1 &nbमुंबई (अक्षय मांडवकर) -
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये वन्यजीव उपाययोजनेचा भाग म्हणून पनवेलनजीकच्या 'कर्नाळा पक्षी अभयारण्य' परिसरात माकड आणि वानरांना महामार्ग ओलांडण्यासाठी पूल (मंकी लॅडर) बांधण्यात आला आहे. यामुळे या प्राण्यांना बिनदिक्कत महामार्ग ओलांडणे सोयीचे झाले आहे. अशा प्रकारच्या उपाययोजना राबवून 'कर्नाळा पक्षी अभयारण्य' प्रशासनाने विकास प्रकल्पाअंतर्गत वन्यजीव संवर्धनाचे उदाहरण समोर ठेवले आहे.
 
 
 
'कर्नाळा पक्षी अभयारण्या'च्या मधून मुंबई- गोवा महामार्ग गेल्याने अभयारण्य हे दोन भागात विभागले गेले आहे. २०१७ मध्ये मुंबई- गोवा महामार्गच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यासाठी १.६५ हेक्टर वनक्षेत्र वळते करून चौपदरीकरण्याचा कामाला सुरुवात झाली. तत्पूर्वी महामार्ग चौपदरीकरणाचा प्रस्ताव मंजूर करताना 'राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा'समोर (एनएचएआय) काही अटी आणि शर्तीचे पालन करण्याच्या सूचना 'केंद्रीय वन्यजीव मंडळा'कडून करण्यात आल्या होत्या. त्यानुसार अभयारण्याच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करून अटी आणि शर्ती ठरवण्यात आल्या. त्यामध्ये अभरण्यामधून जाणाऱ्या महामार्गाभोवती ध्वनीरोधक लावण्याबरोबर वानर आणि माकडांना महामार्ग ओलांडण्यासाठी पूल बांधण्याचा समावेश होता. महामार्गावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता अभयारण्यातील माकडांना महामार्ग ओलांडून पलीकडे जातांना अपघात होऊ नये म्हणून 'मंकी लॅडर' बांधण्याचे सुचविण्यात आले. आता या लॅडरचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून माकडांनी या लॅडरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
 
 
२२ जानेवारी २०२१ रोजी महामार्गावर प्रत्यक्ष पाहणी करून 'मंकी लॅडर' ची जागा निश्चित करण्यात आली. 'ग्रीन वर्क ट्रस्ट'चे वन्यजीव अभ्यासक निखिल भोपळे आणि सर्वेश अभ्यंकर यांची मदत घेऊन 'मंकी लॅडर'ची रचना तयार करण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम कार्यालयाला पाठवून त्यांच्याकडून बांधकामासाठी परवानगी घेण्यात आली. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर 'मंकी लॅडर'च्या बांधकामाला सुरुवात झाली. जुलै महिन्यात त्याचे काम पूर्ण झाले असून या पूलाचा आकार हा ४० मी लांब आणि २ फूट रुंद असल्याची माहिती 'कर्नाळ पक्षी अभयारण्या'चे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली. या पूलावरुन माकडांना उतरता यावे म्हणून हा पूल महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांना जोडण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी माकडांना खाऊ न घालण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत वन्यजीव उपाययोजनेअंतर्गत या 'मंकी लॅडर'ची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी अंदाजे १४ लक्ष खर्च करण्यात आले असून हा निधी 'एनएचएआय'ने दिला आहे. या पूलामुळे माकडांना निश्चितच महामार्ग ओलांडतांना फायदा होईल यात शंका नाही. - भानुदास पिंगळे, उपवनसंरक्षक (वन्यजीव) ठाणे
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@