ऐका सरस्वतीबाई, तुमची कहाणी...

    11-Jul-2021   
Total Views |

Sarswati River_1 &nb

 



सरस्वती नदीचा अभ्यास अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे - एक तर यामधून भारताच्या प्राचीन इतिहासाच्या पुनर्रचनेसाठी, वेद व महाभारताचा काळ निश्चितीसाठी ठोस माहिती मिळत आहे. तसेच प्राचीन ग्रंथांतून दिलेल्या ‘सरस्वती लुप्त झाली,’ सारख्या कथा म्हणजे ‘थोतांड’ आहे, असे म्हणता येणार नाही. सिंधू-सरस्वतीच्या खोर्‍यातील गावे का ओस पडली, हे कळण्यासाठी आज या माहितीची मदत होते आहे.

 


ऐका सरस्वतीबाई तुमची कहाणी... हिमालयाला एक कन्या होती. लखलख स्वच्छ पाण्याची. हिमालयाच्या खांद्यावरून सरसर सरसर वाहत होती. वाटेतील खडक फोडत वेगाने ती धावत होती. एक दिवस काय झालं? तिला दोन बहिणी भेटल्या. एक निळी शतद्रू होती. दुसरी काळी यमुना होती. आता सरस्वती महानदी झाली. पुढे नदी सिंधुसागराला मिळत होती. अशी कैक युगे लोटली.

 


मग पुढे काय झाले? यमुनाबाई रुसून गेली. करता करता एक दिवस ती गंगेमध्ये विलीन झाली. आणखीही काही शतकं उलटली. सरस्वतीच्या काठाने आश्रम उमलले. तेथील ऋषींनी नदीला आई मानले. देवी म्हणून तिची पूजा केली. नदीवर गाणी रचली.

 


एक दिवस आक्रित घडले. शतद्रूने पण सरस्वतीचा हात सोडला. शतद्रू सिंधू नदीकडे वळली. सरस्वती आता एकटी पडली. पण, पावसाने तिला साथ दिली. नदीला भरपूर पाणी आले. त्यावर शेते पिकू लागली. कितीतरी टुमदार गावं नदीकाठी तेव्हा वसली. आटपाट नगरे होती. तिथे मोठे रस्ते होते. दुतर्फा घरे होती. रस्त्याने गाड्यांची वर्दळ होती. तिथले लोक उद्योगी होते. कापड, मणी, दागिन्यांचा व्यवसाय करत होते. सातासमुद्रापार व्यापार करत होते. त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली. तिने धन, धान्य, समृद्धी दिली. अश्व आणि गायी दिल्या. गावे ऐश्वर्याने नटली होती.

 


परंतु, हे दिवस टिकले नाहीत. पुढे पावसाला ओढ लागली. नदीच्या पाण्याला ओहोटी लागली. नदीचे पात्र कोरडे पडले. शेती सगळी करपून गेली. घरदार सोडून लोकं वाट फुटेल तिकडं गेली. सगळी गावे ओस पडली. युग लोटली आणि गावे मातीत गाढली गेली. ही साठा उत्तरांची कहाणी...
 
 

Sarswati River_1 &nb 

 


... इथे संपत नाही. सरस्वती नदी म्हणून राहिली नाही तरी अंबा म्हणून, देवी म्हणून जागृत राहिली. सरस्वती देवीची आजही पूजा करतात. सरस्वती नदीसुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहिली. सरस्वती नदी भूमीत लुप्त झाली, ही कथा हजारो वर्षं लोकांत जीवंत राहिली. गंगा-यमुनेच्या संगमाला गंगा-यमुना-सरस्वतीचा त्रिवेणी संगम मानला गेला.
 
 
सरस्वतीचे नदी म्हणून अस्तित्व राहिले नसले, तरी तिचे विशाल कोरडे पात्र मागे राहिले. या कोरड्या पात्रातून घग्गर नावाची लहानशी नदी पावसाळ्यात वाहते. ही मौसमी नदी समुद्रापर्यंत पोहोचत नाही. या कोरड्या पात्राला भारतात ‘घग्गर’, पाकिस्तानमध्ये ‘हाकरा’ आणि सिंधमध्ये ‘नारा’ अशी नावे आहेत. १८७४ मध्ये सी.एफ. ओल्डहम नावाचा ब्रिटिश ऑफिसर या घग्गर नदीच्या भागात फिरत होता. दहा-दहा किलोमीटर रुंदीचे पात्र पाहून त्याला आश्चर्य वाटलं. घग्गरसारखी लहान मौसमी नदी इतके विस्तीर्ण पात्र कसे काय निर्माण करू शकेल, असा प्रश्न त्याला पडला. ही नदी निश्चितच एका प्राचीन मोठ्या नदीचे पात्र वापरत असणार या निष्कर्षावर तो आला. त्यावर ‘सर्व्हे ऑफ इंडिया’च्या नकाशांचा अभ्यास करून, प्राचीन ग्रंथातील सरस्वतीच्या प्रवासाचा अभ्यास करून तो या निष्कर्षाप्रत पोहोचला की, घग्गर नदी लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या पात्रातून वाहते.

 


सरस्वती नदीचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांतही आला आहे. ऋग्वेदातील सर्वात प्राचीन मंडळातील सूक्त सरस्वती नदीचे भरभरून वर्णन करतात. हिमालयापासून सिंधुसागरपर्यंत वाहते, असे तिचे वर्णन येते. दुसर्‍या मंडळात ऋषी सरस्वतीची ‘सर्वोत्तम माता, सर्वोत्तम नदी, सर्वोत्तम देवी’ अशी स्तुती करतात. ऋग्वेदाच्या शेवटच्या मंडळात मात्र सरस्वतीचा केवळ नामोल्लेख येतो. स्तुती येत नाही. उलट सरस्वतीपेक्षा अधिक महत्त्व सिंधू नदीला दिलेले दिसते.
रामायणात दशरथाच्या मृत्यूच्या वेळी भरत व शत्रुघ्न आजोळी होते. त्यांना अयोध्येतून आलेल्या दूतांकडून निरोप मिळताच ते आजोळहून म्हणजे केकय इथून अयोध्येला परत निघाले. वाल्मिकी रामायण सांगते की, या परतीच्या प्रवासात भरताने सतलज, सरस्वती, यमुना, गंगा व गोमती या नद्या पार केल्या. या वर्णनातून सरस्वतीचा प्रवाह यमुना व सतलजच्या मध्ये होता हे कळते. तसेच सतलज नदी त्यावेळी पश्चिमेला वाहत असल्याचे कळते.

 


महाभारतात १००हून अधिक ठिकाणी सरस्वतीचा उल्लेख व माहिती आली आहे. तिच्या प्रवाहात अनेक ठिकाणी तळ्यांची निर्मिती झाली होती. काही ठिकाणी नदीला पुष्कळ पाणी होते. तर काही ठिकाणी ती वाळूच्या खाली अदृश्य झाली होती. विनाशन या ठिकाणी सरस्वती लुप्त झाली होती, असा उल्लेख येतो. महाभारतीय युद्धाच्या दरम्यान बलरामाने सरस्वती नदीच्या काठाने तीर्थयात्रा केली. तो सांगतो, “उदापना या ठिकाणी सरस्वती लुप्त झाली होती. मात्र, भूमीतील ओलाव्याने सरस्वतीचे तेथील अस्तित्व कळत होते.तर आणखी एका ठिकाणी सरस्वतीचे पाण्याने भरलेले मोठे पात्र पाहून आश्चर्यचकित झाल्याचे नमूद केले आहे.

 


अगदी अलीकडच्या आठव्या शतकातील ‘चचनामा’ वा 16व्या शतकातील ‘बेगलरनामा’मध्ये सिंधमधील आता कोरड्या असलेल्या हाकरा-नारा पात्रांतून पाणी वाहत असल्याचे दाखले मिळतात.

 


ओल्डहमने सरस्वती नदीचे प्राचीन अस्तित्व रेखल्यानंतर जवळ जवळ ५० वर्षांनी, १९२२ मध्ये हडप्पा येथे प्राचीन गावाचे अवशेष मिळाले. लगेचच मोहंजोदाडो येथेही एक प्राचीन नगरी सापडली. पुढच्या काही दशकात सिंधू नदीच्या परिसरात अनेक प्राचीन स्थळे उत्खननात मिळाली. या संस्कृतीला ‘सिंधू संस्कृती’ किंवा ‘हडप्पा संस्कृती’ असे संबोधले जाऊ लागले. आता या संस्कृतीची 1,500 हून अधिक स्थळे मिळाली आहेत. त्यापैकी दोन तृतीयांश स्थळे शुष्क सरस्वतीच्या काठाने आहेत. सिंधू नदीच्या काठाने मात्र 50पेक्षा कमी स्थळे आहेत. त्यामुळे १९९६ मध्ये, एस. पी. गुप्ता यांनी या संस्कृतीला ‘सिंधू-सरस्वती संस्कृती’ हे नाव योग्य होईल, असे म्हटले.

 


उत्खननाबरोबरच अनेक भूगर्भशास्त्रज्ञांनी, पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी ८०च्या दशकापर्यंत ‘सर्व्हे ऑफ इंडिया (एसओआय)चे नकाशे वापरून सरस्वती नदीचा शोध घेतला. या अभ्यासाला एक कलाटणी मिळाली ती १९७२ मध्ये. त्यावेळी ‘सॅटेलाईट’मधून काढलेल्या वायव्य भारताच्या छायाचित्रातून स्पष्ट झाले की, घग्गरच्या कोरड्या पात्राच्या परिसरातील जमिनीत अधिक ओलावा होता, भूजलपातळी कमी होती आणि या भागात वनराई अधिक होती. ओल्डहम यांनी ‘एसओआय’च्या मदतीने मांडलेला सरस्वतीचा मार्ग या छायाचित्रांनी अधोरेखित केला. या नंतर ‘इस्रो’च्या मदतीने ’Landsat images' वापरून या भागाचा अभ्यास केला गेला. ज्यामधून प्राचीन काळातील नद्यांचे मार्ग रेखले गेले.
 
 
नव्वदच्या शतकात या भागातील भूजलाचा अभ्यास केला गेला. घग्गरच्या कोरड्या पात्रातील भूजलपातळी आजूबाजूच्या परिसरापेक्षा फारच कमी होती. येथून काढलेल्या पाण्याचे (BARCZo) ‘कार्बन डेटिंग’ केले असता, ते तीन ते चार हजार वर्षे जुने असल्याचे कळले. सरस्वती लुप्त होण्याच्या काळाशी मिळता जुळता हा काळ होता.
 
 
२०१३ मध्ये अरबी समुद्रातील मातीचे परीक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये साडेचार हजार वर्षांपूर्वीपर्यंत तिथे नदीतून येणारी माती मिळाली. सरस्वती नदी लुप्त होईपर्यंत अरबी समुद्रात त्या ठिकाणी नदी येऊन मिळत होती हे सिद्ध झाले. (Clift and Giosan)

 


२०१७ पासून केलेल्या अभ्यासात नदीपात्रात जमिनीच्या वेगवेगळ्या पातळीतील ‘सिल्ट’चे परीक्षण केले गेले. यामध्ये घग्गरच्या पात्रात 25 हजार वर्षांपूर्वी सतलजची माती आढळून आली. याने सतलजचा प्रवाह कधीपर्यंत सरस्वतीला मिळत होता हे निश्चित कळले. (सिंघ अ‍ॅण्ड सिन्हा (२०१९)

 


या बरोबरच प्राचीन हवामानाच्या संशोधनातून जुन्या काळातील पावसाचे प्रमाणही कळते. त्यातून मिळणार्‍या माहितीमधून - नदीतील पाण्याची पातळी, त्याचा नदीकाठच्या गावांवर होणारा परिणाम यासंबंधीची माहितीही समोर येत आहे. त्यानुसार चार हजार वर्षांपूर्वी अनेक दशकांचा दुष्काळ पडला होता, असे कळते. या दुष्काळामुळे नद्यांकाठची गावे ओस पडली.

 


सरस्वती नदीचा अभ्यास अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे - एक तर यामधून भारताच्या प्राचीन इतिहासाच्या पुनर्रचनेसाठी, वेद व महाभारताचा काळ निश्चितीसाठी ठोस माहिती मिळत आहे. तसेच प्राचीन ग्रंथांतून दिलेल्या ‘सरस्वती लुप्त झाली,’ सारख्या कथा म्हणजे ‘थोतांड’ आहे, असे म्हणता येणार नाही. सिंधू-सरस्वतीच्या खोर्‍यातील गावे का ओस पडली, हे कळण्यासाठी आज या माहितीची मदत होते आहे. आर्य आक्रमण सिद्धान्त कसा खोटा होता, तेही यावरुन लक्षात येते. भविष्यात नदीचे प्राचीन पात्र वा पाणी आज उपयोगात आणू शकतो का, अशा कैक गोष्टींची उत्तरे मिळण्यासाठी सरस्वतीचा शोध व नवनवीन संशोधनातून येणारी माहिती महत्त्वाची आहे.

 

संदर्भ -
 
-Identification and mapping of the Saraswati River System: - review and new findings. by Amal Kar; Central Arid Zone Research Institute (CAZRI)
 

 


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.