‘वानोशी’चा शिल्पकार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2021   
Total Views |

pravin desai_1  
 
 
तळकोकणाला लाभलेल्या निसर्गसंपदेचे जतन करण्यासाठी निसर्ग पर्यटनाची कास धरलेल्या प्रवीण दत्ताराम देसाई या तरुणाविषयी...
 
 
तळकोकणातील रमणीय निसर्गाचे दर्शन घडवण्यासाठी निसर्गानेच नेमलेला हा दूत. काजू-अननस लागवडीच्या हव्यासाचा विळखा तळकोकणाला बसलेला असताना या तरुणाने त्याला छेद देऊन निसर्ग संवर्धनाची कास धरली. त्यासाठी आपल्या खासगी जागेत बहरलेल्या जंगलावर कुर्‍हाडीचा घाव न घालता त्याठिकाणी नंदनवन फुलवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी निसर्गातील पशू-पक्ष्यांचा अभ्यास केला. नंदनवनात त्यांच्याकरिता अधिवास निर्माण केला. आता या नंदनवनात येऊन निसर्गप्रेमी हे निसर्गाशी अधिक एकरूप होतात. या नंदनवनाचे नाव म्हणजे ‘वानोशी’ आणि ते घडवणारा शिल्पकार म्हणजे प्रवीण देसाई.
 
 
 
प्रवीणचा जन्म दि. २७ फेब्रुवारी, १९८९ रोजी दोडामार्ग तालुक्यातील कुडासे या छोट्याशा गावात झाला. तळकोकणाला निसर्गाचे देणे लाभले आहे. अशा वातावरणातच प्रवीणचे बालपण बहरत होते. घराबाहेर येणारे गवे, पक्षी, नद्यांमधील मासे त्याचे सोबती होते. यामधूनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली होती. मात्र, त्याची जाणीव व्हायला बर्‍याच वर्षांचा कालावधी गेला. मधल्या काळात प्रवीणने आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्याने ‘डी.फार्मसी’चे शिक्षण घेतले आणि त्यानंतर कोल्हापूरला जाऊन पर्यावरण विज्ञान विषयातून ‘एमएससी’चे शिक्षण घेतले. शिक्षणानंतर तो आपल्या गावी पुन्हा परतला.
 
 
 
प्रवीणच्या कुटुंबाचे जंगलामध्ये एक छोटे जुने मोडकळीस आलेले घर होते. त्याभोवतीची जमीन त्यांच्या मालकीची होती. त्यामुळे या घराला तोडून त्या ठिकाणी असलेले जंगल छाटून त्यावर काजूची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यादरम्यान प्रशांत जाधव यांच्या ओळखीने कोल्हापूरचे मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी, फारुख मेहतर अशी वन्यजीवप्रेमी मंडळी प्रवीणच्या त्या जागेवर भटकायला आली होती. त्यावेळी तेथील जैवविविधता पाहून ही मंडळी भारावून गेली. त्या ठिकाणी येणारे गवे आणि पक्ष्यांचे वैविध्य पाहून त्यांनी या जागेचे जतन करण्याचा सल्ला प्रवीणला दिला. “आता त्रास देणारे गवेच पुढे जाऊन पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतील,” असे सांगून या जागेवर निसर्ग पर्यटन सुरू करण्याचे मार्गदर्शन त्याला दिले.
 
 
 
मोक्याच्या जागेवर काजूची लागवड करण्याऐवजी निसर्ग पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेणे, ही बाब प्रवीण आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पचनी पडणारी नव्हती. तरीदेखील त्यावर विचार करून देसाई कुटुंबीयांनी ही जागा निसर्गासाठीच संवर्धित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. एकीकडे आज तळकोकणातील खासगी मालकीच्या जागेवरील जंगलावर कुर्‍हाड चालवली जात असताना देसाई कुटुंबाचा हा निर्णय समाजाला निसर्गरक्षणाची दृष्टी देणारा होता. २०१५मध्ये प्रवीणने या जागेवरील निसर्गाला हात न लावता तिचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याला आपल्यामध्ये दडलेल्या निसर्गप्रेमाची जाणीव झाली.
 
 
 
२०१५ साली या जागेत फुलपाखरू उद्यान तयार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी फारुख मेहतर यांची त्याला मदत मिळाली. शिवाय स्वत: प्रवीणने फुलपाखरांचा अभ्यास केला. त्यांच्या प्रजाती, त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी झाडे, त्या झाडांचे रोपण याविषयी ज्ञान मिळवून फुलपाखरू उद्यान तयार करण्याचे काम सुरू केले. त्यानंतर २०१७ साली मोडकळीस आलेले घर दुरुस्त केले. त्या ठिकाणी पर्यटकांना राहण्याची सोय निर्माण केली. २०१८ पासून त्याने आपल्या कुडासे गावात ‘वानोशी फॉरेस्ट होम स्टे’ सुरू केला. त्यानंतर पक्षिनिरीक्षकांना आकर्षित करण्यासाठी प्रवीणने वाटा धुंडाळून पक्ष्यांच्या विविध प्रजातींचा अंदाज घेतला. त्यासाठी स्वत: पक्ष्यांचा अभ्यास केला. २०१८ सालच्या दिवाळीत पक्षिनिरीक्षणाच्या ट्रिपने ‘वानोशी’चा शुभारंभ झाला. पक्षिप्रेमी आणि निसर्गप्रेमींना ही जागा आवडल्याने ‘वानोशी’ची प्रसिद्धी सुरू झाली.
 
 
त्यानंतरच्या काळात प्रवीणने ‘वानोशी’मध्ये पर्यटकांच्या अनुषंगाने अनेक बदल केले. तिलारी नदीकाठावरील निसर्गभ्रमंतीला सुरुवात केली. पुढे जाऊन जंगलदर्शन, रात्रभ्रमंतीसारखे पर्यटकांना निसर्गाचा आविष्कार दाखवणारे उपक्रम त्याने सुरू केले. 2020 साली ‘कोविड’ संक्रमणामुळे लावलेला ‘लॉकडाऊन’ हा ‘वानोशी’च्या आड आला. त्यानंतर ‘लॉकडाऊन’मध्ये शिथिलता आल्यानंतर ‘वानोशी’ला उत्तम प्रतिसाद मिळाला. दरम्यानच्या काळात ‘तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’ जाहीर झाल्याने त्याचा फायदा ‘वानोशी’ला झाला. अनेक निसर्गप्रेमी, अभिनेते वानोशीला भेट देऊन गेले आहेत. प्रवीणसारख्या स्थानिकाने वेगळा विचार करून आपल्या मोक्याच्या जागेवरील जंगलाचे रक्षण करून त्याचा वापर उदरनिर्वाहासाठी करून घेतला आहे.
 
 
 
कोकणाचे रक्षण करण्यासाठी आज प्रवीणसारख्या तरुणांची गरज आहे. जे विकासाच्या मागे भरकटत न जाता पर्यावरणपूरक रोजगाराची कास धरत आहेत. खासगी जागेवरील जंगल कापून त्यावर काजू-अननसासारख्या पिकाच्या लागवडीची लागलेली कीड काढणे आवश्यक असल्याचे मत प्रवीणने मांडले आहे. “निसर्ग ही तळकोकणाला लाभलेली मोठी संपत्ती आहे आणि त्याला धक्का न लावता येथील तरुण नक्कीच आपला उदरनिर्वाह करू शकतो,” असेही तो सांगतो. “इथला निसर्ग हा स्थानिकच जपतील,” अशी आशाही तो व्यक्त करतो. तळकोकणातील जंगल वाचविण्यासाठी प्रवीणकडून उचलेले हे पाऊल नक्कीच प्रशंसनीय आहे. त्याला पुढच्या वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@