पाणथळींचा वाली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2021   
Total Views |

manasa_1  H x W


मुंबई महानगरक्षेत्रात र्‍हास पावणार्‍या पाणथळ जागांचा आणि कांदळवनांचा आवाज असलेल्या नंदकुमार पवार यांच्याविषयी...


मुंबई महानगराला संरक्षण देणार्‍या पाणथळी आणि कांदळवनांच्या र्‍हासाबाबत आवाज उठवणारा हा कार्यकर्ता. हाडाने मच्छीमार असल्याने किनारी परिसंस्थेतील या घटकांची जाणीव असणारा हा माणूस. त्यामुळेच या परिसंस्थेच्या संवर्धनासाठी धडपडणारा आणि त्यांच्या संरक्षणासाठी न्यायालयाचे दार ठोठावणारा. मोठ्या धडाडीने प्रसंगी हल्ले आणि आरोप-प्रत्यारोप सहन करत ते मुंबईतील कांदळवन आणि उरणमधल्या पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी लढत आहेत. असे लढे मुश्कील असले, तरी त्याविषयी पाठपुरावा करून ते शेवटापर्यंत नेण्यासाठी हा माणूस प्रयत्नशील आहे. खर्‍या अर्थाने मुंबई महानगरक्षेत्रातील नष्ट पावणार्‍या कांदळवनांचा आणि पाणथळ जागांचा आवाज असलेला हा माणूस म्हणजे नंदकुमार पवार.

पवार यांचा जन्म दि. १ फेब्रुवारी, १९६१ रोजी मुंबईतील भांडुप गावात झाला. त्यांचे कुटुंब हे मासेमारी करणारे. त्यामुळे साहजिकच नंदकुमार यांचा ओढा मासेमारी करण्याकडे होता. शाळा सोडून ते दिवसभर खाडीत मासेमारी करत असायचे. क्वचितच शाळेत जायचे. सातवीमध्ये असताना इंग्रजी शिक्षिकेच्या पाठबळामुळे त्यांना इंग्रजी विषयात रस निर्माण झाला. मात्र, हा रस काही काळासाठीच होता. वाढत्या वयात चांगल्या मित्रांची संगत मिळाल्यावर नंदकुमार यांना शिक्षणाचे महत्त्व लक्षात आले. पुढे त्यांनी आपले दहावीचे शिक्षण पूर्ण करून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. २६ जुलै, २००५ रोजी मुंबईत आलेला महापूर हा खर्‍या अर्थाने त्यांच्या जीवनाला वळण देणारा ठरला. या महापुरामुळे महानगरातील कांदळवने आणि पाणथळ जागा का मूल्यवान आहेत, हे लक्षात आले. एका हाडाचा मच्छीमार म्हणून नष्ट पावत जाणार्‍या या नैसर्गिक परिसंस्थेचे रक्षण करणे, हे जगाबरोबरच मच्छीमार समुदायाच्याही हिताचे असल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे २००५ साली किनारी परिसंस्थांबरोबरच त्यावर अवलंबून असणार्‍या समुदायाचे हित जपण्यासाठी नंदकुमार यांनी ‘श्री. एकविरा आई प्रतिष्ठान’ची स्थापना केली.

प्रतिष्ठानची स्थापना केल्यानंतर नंदकुमार हे मुंबई महानगरात फिरू लागले. कांदळवन आणि पाणथळ जागांवर होणार्‍या अतिक्रमणाची माहिती गोळा करण्यास त्यांनी सुरुवात केली. मुंबईसोबत नवी मुंबई, पनवेल आणि खासकरून उरणमध्ये फिरून तेथील पाणथळ आणि कांदळवन आच्छादित जागांची माहिती घेतली. या नैसर्गिक परिसंस्थेतील र्‍हासाची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी त्याविषयी न्यायालयीन लढा सुरू केला. या प्रकरणावर न्याय मिळवण्यासाठी त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. ऐरोली ते वाशी दरम्यानच्या १०० हेक्टरवर परसलेल्या कांदळवनांच्या रक्षणासाठी २००८ साली नंदकुमार यांनी मच्छीमारांच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी भांडुप उदंचन केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. येथील मंडळी कांदळवने तोडत होती आणि त्या ठिकाणी येणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांची शिकार करत होती. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची परिणती म्हणजे भांडुपमधील हे अतिक्रमण पाडण्यात आले. ज्यामुळे सर्व गैरकृत्यांना आळा बसला. सध्या भांडुप उदंचन केंद्राचा परिसर हा ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा भाग असून तो सुरक्षित आहे.

२००९ साली त्यांनी कांजुरमार्ग येथील ‘डम्पिंग ग्राऊंड’विरोधात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेविरोधात न्यायालयात धाव घेतली. ही कचराभूमी कांदळवन आणि पाणथळीच्या जागी उभारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. २०१० साली दहिसर येथील ३३४ एकर कांदळवनाची जागा बांधकाम व्यावसायिकांनी बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतली होती. पवार यांना हे प्रकरण समजल्यानंतर त्यांनी या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यावर स्थानिक गुंडांनी हल्ला केला, त्यांचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी न घाबरता त्यांनी हा लढा दिला आणि ही जागा मोकळी करून त्या ठिकाणी पुन्हा कांदळवनांचे पुनर्रोपण करून घेतले. २०११ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी-दोडामार्गदरम्यानचे क्षेत्र पर्यावरणीय ‘संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हे क्षेत्र ‘संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित झाल्याने या परिसरात प्रस्तावित असलेल्या ४९ खाणी रद्द झाल्या आणि २०० चौ.किमी क्षेत्राला संरक्षण मिळाले.

गेल्या तीन वर्षांपासून नंदकुमार हे उरणमधील पाणथळ आणि कांदळवन आच्छादित जागांच्या संरक्षणासाठी न्यायालयीन लढा देत आहेत. उरणमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे पाणथळ क्षेत्र आहे. मात्र, येथील ३२,६०० हेक्टर क्षेत्रापैकी २० हजार हेक्टरचे क्षेत्र आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अनेक सरकारी संस्था त्यावर भराव टाकत आहेत. त्यासाठी कोणत्याही प्रकारची पर्यावरणीय परवानगी घेत नाहीत. त्यामुळे याविरोधात नंदकुमार यांनी २०१८ साली न्यायालयात धाव घेतली. उरणच्या पाणथळी वाचविण्याचा लढा अजूनही सुरू आहे. हा लढा नैसर्गिक परिसंस्थेचे रक्षण होईपर्यंत सुरू राहणार असल्याचे नंदकुमार सांगतात. पवार यांनी उभारलेला हा लढा नक्कीच मुंबई आणि मुंबईकरांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यासाठी त्यांंना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
@@AUTHORINFO_V1@@