राज्याच्या वृक्ष कायद्यात महत्वपूर्ण सुधारणा; वाचा सविस्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2021   
Total Views |
tree_1  H x W:मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
'महाराष्ट्र वृक्ष संरक्षण आणि संवर्धन कायद्या'मधील सुधारणांना गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे वृक्ष कायद्यामध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत.या बदलांअंतर्गत राज्यामध्ये 'हेरिटेज ट्री' संकल्पना, महाराष्ट्र राज्य वृक्ष आणि स्थानिक वृक्ष प्राधिकरणाची स्थापना होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यापुढे तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या वयाच्या संख्येएवढी नवीन झाडे भरपाई वृक्षारोपन म्हणून लावणे बंधनकारक असेल.
 
 
 
राज्याच्या नगर विकास विभागाकडून आजवर वृक्ष कायद्याची अंमलबजावणी केली जात होती. मात्र, आॅक्टोबर २०२० मध्ये हा कायदा पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. या खात्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानंतर या कायद्यातील सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्या. कारण, या कायद्यातील पूर्वीच्या तरतूदींची अंमलबजावणी ही योग्य पद्धतीने होताना दिसत नव्हती. राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड सुरू असल्याने त्यामध्ये बदल करणे गरजेचे होते. गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यावरण विभागाने वृक्ष कायद्यामध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणांना मान्यता देण्यात आली. या कायद्याअंतर्गत आता ५० आणि त्याहून अधिक वय असलेल्या वृक्षांना 'हेरिटेज ट्री' म्हणून परिभाषित केले जाईल. असे वृक्ष हे विशिष्ट प्रजातींचे असतील आणि ते वेळोवेळी अधिसूचित केले जातील.
 
 
 
वृक्षांना 'हेरिटेज ट्री'चा दर्जा देण्यासाठी आणि भरपाई वृक्षारोपनाअंतर्गत लागवड करायच्या झाडांची संख्या निश्चित करण्यासाठी वृक्षांचे वय हा एक महत्त्वाचा पैलू असणार आहे. त्यामुळे वृक्षाचे वय ठरवण्यासाठी वन विभागाच्या प्रचलित पद्धतीविषयी पर्यावरण विभाग त्यांच्यासोबत सल्लामसलत करणार आहे. त्यानंतर वृक्षाच्या वयासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केले जातील. तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या वयाच्या संख्येएवढी ६ ते ८ फूटांची रोपे भरपाई वृक्षारोपनाअंतर्गत लावणे बंधनकारक असेल. पाच वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची २०० हून अधिक झाडे तोडण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवला जाईल. तसेच २०० हून कमी झाडे तोडण्याचा प्रस्ताव स्थानिक वृक्ष प्राधिकरणाकडे असेल. यासाठी या दोन्ही प्राधिकरणांची स्थापना करण्यात येईल. या प्राधिकरणांमध्ये वृक्ष तज्ज्ञांचा समावेश असेल.
 
 
 
स्थानिक वृक्ष प्राधिकरणांकडून हेरिटेज वृक्षांची गणना, स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड-जतन, वृक्ष गणनेवर देखरेखीचे काम केले जाईल. दर पाच वर्षांनी किमान एकदा वृक्ष गणना करणे आवश्यक आहे. वृक्षांचे पुनर्रोपन केवळ तज्ज्ञांच्या मार्गदर्शानाअंतर्गत केले जाईल. पुनर्रोपन करण्यात येणाऱ्या वृश्राच्या अंदाजे वयाइतके वृक्षारोपन भरपाई म्हणून करणे गरजेचे असेल. नागरी स्थानिक प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील सर्व भूमीवरील वृक्षांचे अस्तित्व सुनिश्चित करणे. शहरी स्थानिक प्राधिकरणाच्या किंवा सरकारी मालकीच्या जमिनीवर वृक्षारोपण केले जाईल हे सुनिश्चित करणे. हे वृक्षारोपण वैज्ञानिक पद्धतीने, स्थानिक प्रजातींच्या संरक्षणाच्या दृष्टीने व वृक्षारोपणांतर्गत क्षेत्र हे किमान ३३% असेल या उद्देशाने केले जाईल.वृक्षांची देखभाल व छाटणी (pruning) शास्त्रोक्त पद्धतीने आणि तज्ञांच्या मार्गदर्शनावर केली जाते हे सूनिश्चित करणे.
 

@@AUTHORINFO_V1@@