सरिसृपांचा सोबती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2021   
Total Views |

Sonak Pal_1  H
 
 
 
सरिसृपांविषयी गैरसमजुतींचे वलय असणार्‍या भारतीय समाजात या जीवांवर संशोधनाचे काम करून त्यांच्या संवर्धनासाठी धडपडणार्‍या सौनक पवित्र पाल यांच्याविषयी...
सरिसृपांच्या जगामध्ये रमणारा हा माणूस. पश्चिम घाटातील दुर्गम दर्‍याखोर्‍यांमध्ये त्यांचा पाठलाग करणारा. सरिसृपशास्त्रासारख्या आडवळणातील करिअरच्या वाटेवर मार्गस्थ असलेला. महत्त्वाचे म्हणजे साप, पाली आणि सरड्यांसारख्या समाजाने वाळीत टाकलेल्या जीवांवर संशोधनाचे काम करणारा. देशात सरिसृपशास्त्रामध्ये काम करणाऱ्या मोजक्या तरुण शोधकर्त्यांच्या फळींमध्ये त्यांचा समावेश होतो. सरिसृपांप्रति असणार्‍या सहानुभूतीची कास धरत त्यांनी १७ नव्या प्रजातींचा आणि तीन नव्या कुळांचा शोध लावला आहे. असे हे सरिसृपांचे सोबती म्हणजे संशोधक सौनक पाल. सौनक यांचा जन्म दि. २५ ऑगस्ट, १९८४ रोजी बदलापूरमध्ये झाला. एका टेकडीपाशीच त्यांचे घर असल्याने लहापणापासूनच टेकडीवरचा निसर्ग त्यांना खुणावत होता. त्या आकर्षणापोटी त्या हिरवळीत त्यांना कुठे वेगळा पक्षीच दिसायचा, तर कधी साप. त्यांना पाहून मनात अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. मात्र, या प्रश्नांची उत्तरे देणारा कुणीच आसपास नसल्याने त्याविषयीचे कुतूहल वाढत गेले. या कुतूहलापोटी आसपासच्या वस्तीमध्ये घरात शिरणारे साप पकडायला सुरुवात झाली. मित्रांसोबत पक्षिनिरीक्षणाच्या वार्‍या सुरू झाल्या. मात्र, या सर्व उद्योगातून निर्माण होणार्‍या प्रश्नांचे शमन करणारे साधन मिळत नव्हते. महाविद्यालयात प्रवेश झाल्यानंतर पुस्तकांच्या माध्यमातून त्यांना पडणार्‍या या प्रश्नांचे उत्तरस्वरूपी शमन होण्यास सुरुवात झाली.
 
 
 
महाविद्यालयीन शिक्षणाला सुुरुवात झाल्यानंतर सौनक यांनी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे (बीएनएचएस) विद्यार्थी सदस्यत्व मिळवले. हे सदस्यत्व मिळाल्यानंतर पहिली धाव तिथल्या ग्रंथालयात घेतली. तिथल्या पुस्तकांमधून विविध जीवांची माहिती खासकरून सरपटणार्‍या प्राण्यांची माहिती वाचण्यास सुरुवात केली. ही माहिती वाचून बदलापूर नजीकच्या हरितक्षेत्रात फिरून निरीक्षणास सुरुवात केली. आपल्या परिचयांमध्ये सादरीकरण करून सरिसृपांविषयी जनजागृतीचे छोटेखानी कार्यक्रम केले. तोपर्यंत त्यांच्या मनी आपल्याला वन्यजीव क्षेत्रामध्येच करिअर करण्यासंबंधीचा विचार पक्का झाला होता. ‘बीएस्सी’चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दांडेली अभयारण्यानजीक एका रिसोर्टमध्ये ‘नॅच्युरलिस्ट’ म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
 
 
दांडेली अभयारण्यात काम करताना सौनक यांना अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळाली. महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत केवळ पुस्तकात वाचलेला पश्चिम घाट ‘याची देहि याची डोळा’ प्रत्यक्ष पाहता आला. दांडेली अभयारण्यात काम करण्यामागे सौनक यांचे मुख्य उद्दिष्ट हे पश्चिम घाट अनुभवण्याचे होते. त्या ठिकाणी वर्षभर काम केल्यानंतर ते पदव्युत्तर शिक्षणासाठी पुन्हा मुंबईत परतले. ‘एमएस्सी’च्या शिक्षणादरम्यान त्यांनी निसर्ग शिक्षण क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. जनजागृती कार्यक्रम, निसर्ग भ्रमंती करून ते इतरांंना निसर्ग शिक्षण देऊन या क्षेत्रातील स्वत:चा अनभुवही वाढवून घेत होते. यावेळी ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तही त्यांनी काम केले. आपल्या सहकार्याच्या मदतीने उद्यानात आढळणार्‍या उभयचर आणि सरिसृपांची यादी तयार केली. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांना ‘आयआयएससी’ या संस्थेच्या पश्चिम घाटामधील एका प्रकल्पामध्ये संशोधनाचे काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीने त्यांच्या करिअरच्या वाटेला नवीन दिशा दिली. या प्रकल्पांतर्गत सौनक यांनी महाराष्ट्रापासून केरळपर्यंतचा पश्चिम घाट पालथा घातला. इथला कोपरा अन् कोपरा पिंजून काढला. पश्चिम घाटाच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये भटकंती केली. या प्रकल्पाचा उद्देश हा नवीन प्रजाती शोधण्याचा नसला, तरी येथील सरिसृप आणि उभयचरांच्या विविध प्रजातींचे वितरण, त्या वितरणामागील कारण आणि प्रजातीनुरूप संवर्धनाच्या प्राधान्यावर त्यांनी काम केले. याचदरम्यान त्यांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने कासमधून पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला. पाच वर्ष पश्चिम घाटाच्या कुशीत काम केल्यानंतर ते 2015 साली ‘बीएनएचएस’मध्ये रुजू झाले. या ठिकाणी प्राणी संकलन विभागामध्ये काम करत असताना त्यांच्यासमोर नवीन विश्व उलगडले. प्रत्यक्ष निसर्गात निरीक्षण केलेल्या नव्या प्रजातींची त्याच कुळातील इतर प्रजातींच्या नमुन्यांशी तुलना करण्याची संधी त्यांना या ठिकाणी मिळाली. सरिसृपांच्या ‘टॅक्सनॉमी’वर काम करता आले.‘बीएनएचएस’मध्ये असताना सौनक यांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने सरड्यांवर विस्तृत संशोधन केले. या संशोधनाअंती सरड्याच्या दोन नव्या कुळांचा आणि दोन प्रजातींचा शोध लावला. त्यानंतर विस्तृतपणे ‘हरणटोळ’ सापांच्या प्रजातींवरही संशोधनाचे काम केले.
 
 
 
भारत आणि श्रीलंकेमध्ये या सापांचा प्रामुख्याने अधिवास आहे. पश्चिम घाटामध्ये आढळणारा हा साप ‘अहेतुल्ला नासुटा’ या एकच प्रजातीचा असल्याचे सुरुवातीपासून मानले जात होते. कारण, त्याच्यावर सखोल अभ्यास झालेला नव्हता. अशा वेळी सौनक आणि सहकार्‍यांनी याबाबत सखोल अभ्यास केला. या संशोधनाअंती पश्चिम घाटामध्ये ‘अहेतुल्ला’ या पोटजातीत पाच वेगवेगळ्या प्रजाती असल्याचे समोर आले. यामधील दोन प्रजाती सह्याद्रीमधून, तर उर्वरित तीन प्रजाती या पश्चिम घाटाच्या दक्षिण भागातून उलगडण्यात आल्या. सध्या सौनक ‘बीएनएचएस’मध्येच कार्यरत असून, सरिसृपांच्या प्रजातींवर संशोधनाचे काम करत आहेत. आजवर त्यांनी सहा साप, दोन सरडे आणि नऊ पालींचा नव्याने शोध लावला आहे. त्याशिवाय तीन कुळांचाही उलगडा केला आहे. सरिसृपांविषयी अनेक गैरसमज असणार्‍या आपल्या समाजात त्यांचे हे संशोधन वाखाणण्याजोगे आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@