तत्वनिष्ठ वनाधिकारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2021   
Total Views |
jayoti banerjee _1 &

राज्यामध्ये भारतीय वनसेवेअंतर्गत कार्यरत असलेल्या महिला अधिकार्‍यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या मुख्य वनसंरक्षक आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी यांच्याविषयी...

 
 
 
महाराष्ट्रातील भारतीय वनसेवेत (आयएफएस) कार्यरत असणार्‍या महिला अधिकार्‍यांमधील या वरिष्ठ वन अधिकारी. शांतपणे आणि सचोटीने काम करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. पर्यावरणीय परिसंस्थेच्या दृष्टीने विभिन्न असलेल्या विदर्भ आणि कोकणातील वनक्षेत्रात काम करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. वाचन हा आवडीचा विषय असल्याने त्या पुस्तकांमध्ये रमतात. प्रसिद्धीपासून चार हात लांब राहत तत्त्वांशी एकनिष्ठ राहून काम करण्यामध्ये त्या विश्वास ठेवतात. सध्या बातम्यांमध्ये चर्चेत असणार्‍या विदर्भातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकपदी शासनाने नुकतीच त्यांची नियुक्ती केली आहे. वनांशी एकनिष्ठ असलेल्या या वनाधिकारी म्हणजे जयोती बॅनर्जी.
 
 
 
ज्योती यांचा जन्म बंगाली कुटुंबामध्ये कोलकात्यामध्ये झाला. त्यांचे वडील नोकरीनिमित्त ओडिशामध्ये स्थायिक होते. शालेय शिक्षण रांचीमधील ‘बिशप वेस्टकोट गर्ल्स स्कूल’मधून पूर्ण केल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. कटकमधील रेव्हेन शॉ महाविद्यालयातून त्यांनी वनस्पतीशास्त्रामधून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. समजत्या वयामध्येच त्यांनी अधिकारी होण्याचा निर्णय मनोमन पक्का केला होता. घरामध्ये तशी कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नव्हती. अशा परिस्थितीत महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी थेट ध्येय गाठण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
 
 
 
2003 साली जयोती या केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांच्यासमोर नागरी सेवेत जाण्याची संधी होती. मात्र, आपले वनांकडे असलेले आकर्षण पाहता आणि संपूर्ण भारतात काम करण्याची संधी लक्षात घेऊन त्यांनी भारतीय वनसेवेची निवड केली. 2003 साली भारतभरामधून 32 ‘आयएफएस’ अधिकार्‍यांची निवड झाली होती. या 32 जणांमध्ये जयोती या पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. 2003 ते 2005 या कालावधीत त्यांचे वनसेवेतील प्रशिक्षण पूर्ण झाले. प्रशिक्षणानंतर त्यांनी उमेदवारीचा काळ (प्रोबेशन) म्हणून 2005-06 साली नागपूरमध्ये काम केले. प्रोबेशन कालावधीनंतर 2006 साली त्यांची नियुक्ती कोंढाळी वनक्षेत्रामध्ये साहाय्यक वनरक्षकपदावर करण्यात आली.
 
 
 
कोंढाळी वनक्षेत्रात वर्षभर काम केल्यानंतर 2007 साली जयोती यांची बदली ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्पा’मध्ये झाली. या ठिकाणी त्यांनी पश्चिम मेळघाटच्या उपवनसंरक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. मेळघाटमधील वनसंरक्षणाच्या कामाची पद्धत ही पारंपरिक स्वरूपाची आहे. वनवासी बहुल असणार्‍या या भागामध्ये वन संरक्षणामध्ये बरीच आव्हाने होती. व्याघ्र संवर्धनाच्या कामाचा यामध्ये समावेश होता. ही आव्हाने एक महिला अधिकारी म्हणून त्यांनी सक्षमपणे पेलली. या कालावधीत जयोती यांनी वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी आवश्यक असणारे उपक्रम राबवले. 2009 साली त्यांची बदली अमरावती सामाजिक वनीकरण विभागात झाली. या ठिकाणी वर्षभर काम केल्यानंतर केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर त्या दिल्लीत गेल्या.
जयोती 2011 साली ‘भारतीय वन सर्वेक्षण विभागा’मध्ये उपसंचालक म्हणून रुजू झाल्या. दोन वर्षांतून प्रसिद्ध होणार्‍या वनसर्वेक्षण अहवालाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यासाठी ‘सॅटलाईट’च्या आधारे वनक्षेत्राच्या मॅपिंग करण्याचे काम त्यांनी केले. त्याआधारे भारताचा वन सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला. या केंद्रीय विभागात पाच वर्षं काम केल्यानंतर जयोती पुन्हा महाराष्ट्रात परतल्या. 2015 साली त्यांची बदली नागपूर उपवनसंरक्षकपदावर झाली. या पदावर वर्षभर काम केल्यानंतर 2016 साली त्या अलिबाग उपवनसंरक्षक म्हणून रुजू झाल्या.
 
 
 
विदर्भापेक्षा येथील पर्यावरणीय परिसंस्था वेगळ्या होत्या. पश्चिम घाटाच्या गर्द वनपट्ट्यामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. मेळघाटप्रमाणे येथील वनसंरक्षणाची कामे पारंपरिक स्वरूपाची नव्हती. येथील वनसंरक्षणाचे काम शहरी स्वरूपाचे होते. त्यामध्ये कोर्टकचेरी आणि खासगी वनक्षेत्रातील कायदेशीर बाबींचा समावेश होता. त्यामुळे वेगळ्या कामांचा आणि महत्त्वाचे म्हणजे विदर्भाबाहेरील वनक्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव त्यांना मिळाला.
2017 साली जयोती यांची पदोन्नती झाली. पुण्यातील सामाजिक वनीकरण विभागामध्ये त्या वनसंरक्षक म्हणून काम करू लागल्या. त्यानंतर कोकण सर्कलच्या कार्य आयोजन विभागात त्यांची बदली झाली. या ठिकाणी काम करत असताना 2019 साली त्यांना कोकण सर्कलच्या सामाजिक वनीकरण विभागामध्ये काम करण्याची संधी मिळाली. संपूर्ण कोकणपट्ट्यामधील वनीकरणाच्या कामाची मोठी जबाबदारी त्यांनी पूर्ण केली. यादरम्यान सरकारच्या 33 कोटी वृक्षारोपणाच्या मोहिमेमध्येही त्यांनी काम केले. या ठिकाणी काम करत असताना त्यांनी काही महिने मुंबईतील ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’च्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला. या कार्यभारावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. एका दुर्घटनेच्या घटनास्थळी पाहणीसाठी गेल्यावर त्यांच्यावर उद्यानाच्या हद्दीवर राहणार्‍या नागरिकांनी दगडफेक केली. या हल्ल्यामध्ये थोडक्यात जखमी होण्यापासून त्या वाचल्या होत्या.
 
नुकतीच जयोती यांना मुख्य वनसंरक्षकपदावर पदोन्नती मिळाली आहे. शासनाने त्यांची बदली ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्पा’च्या क्षेत्रसंचालकपदावर केली आहे. सध्या ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्प’ बातम्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे या प्रसंगामधून मेळघाटला बाहेर काढून येथील प्रशासनाची घडी पुन्हा बसवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. आपल्याला आवडत असलेल्या वनक्षेत्रामध्ये काम करण्याची संधी शासनाने दिल्याने हे आव्हान यशस्वीपणे पेलणार असल्याचे जयोती सांगतात. त्यांची शांतपणे आणि सचोटीने काम करण्याची वृत्ती पाहता त्या मेळघाटच्या विकासामध्ये भर घालतील याची खात्री आहे. जयोती यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
@@AUTHORINFO_V1@@