आव्हान सह्याद्रीतील वाघांच्या संरक्षणाचे !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2021   
Total Views |
tiger_1  H x W:

सह्याद्रीमधील वाघांच्या अधिवासाकडे बर्‍याचदा संशयाच्या नजरेने पाहिले जाते. अशा परिस्थितीत गेल्या आठवड्यात सह्याद्रीमध्ये नर वाघांचा अधिवास समोर आला. त्यामुळे आता हा अधिवास सुरक्षित करण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे. सह्याद्रीमधील व्याघ्र अधिवास आणि त्याभोवती गुंतलेल्या समस्यांविषयी ऊहापोह करणारे या आठवड्याचे निसर्गज्ञान...

 
 
 
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
 
 
२०१० मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्त्वपूर्ण पाणलोट क्षेत्र आहेत. अनेक झरे तसेच वारणा आणि कोयना नद्या ही येथूनच उगम पावतात. वारणा आणि कोयना नद्यांवर धरणाची निर्मिती करण्यात आली असून कोयनेच्या पाण्यावर महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे 317.670 चौ. किमी आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचे 423.550 चौ. किमी असे मिळून हे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. याठिकाणी वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरीण, बिबटे या प्राण्यांचाही अधिवास आहे. विदर्भाबाहेर अस्तित्वात असलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. २०१८ मध्ये प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानात नर वाघाचा वावर आढळून ‘कॅमेरा ट्रॅप’मध्ये कैद झाला होता. त्यानंतर आजतागायत प्रकल्पामध्ये वाघाच्या अस्तित्वाचा पुरावा आढळून आलेला नाही.
 
 
‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’
 
 
खासगी वनक्षेत्र आणि खाणकामामुळे तुटलेला सह्याद्रीमधील व्याघ्र भ्रमणमार्ग जोडण्यासाठी वन विभागाने या भूप्रदेशामध्ये ‘संवर्धन राखीव वनक्षेत्रां’ची म्हणजेच ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’ची निर्मिती केली आहे. त्यानुसार सातार्‍यातील जोर जांभळीपासून सिंधुदुर्गमधील तिलारीपर्यंत एकूण आठ ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’ची निर्मिती करण्यात आली आहे. या क्षेत्रासंबंधी समजून घ्यावयाचे झाल्यास, सह्याद्री व्याघ प्रकल्पाच्या (कोयना-चांदोली) उत्तरेला ‘जोर जांभळी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’ (6,511 हे) आरक्षित करण्यात आले आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान ते राधानगरी वन्यजीव अभयारण्यादरम्यान असलेला महत्त्वपूर्ण व्याघ्र भ्रमणमार्गाला जोडण्यासाठी तीन ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’ची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरमधील विशालगड (9,324 हे), पन्हाळा (7,291 हे), गगनबावडा (10,548 हे) ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’चा समावेश आहे. राधानगरी अभयारण्य ते तिलारी दरम्यानचा व्याघ्र भ्रमणमार्ग संरक्षित करण्यासाठी आजरा-भुदरगड (24,663 हे), चंदगड (22,523 हे), आंबोली-दोडामार्ग (5,692 हे) आणि ‘तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’ आरक्षित करण्यात आले आहे.
 
 
प्रकल्पाबाहेर व्याघ्र अधिवास
 
 
व्याघ्र प्रकल्पाबाहेर असणारा वाघांचा अधिवास हा महाराष्ट्रासमोर मानव-व्याघ्र संघर्षाच्या दृष्टीने सद्यस्थितीत अस्तित्वात असणारा मोठा प्रश्न आहे. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच सह्याद्रीमध्येही व्याघ्र प्रकल्पाबाहेरील क्षेत्रामध्ये वाघांचा अधिवास आणि वावर असल्याचे समोर आले आहे. खास करुन सह्याद्रीमधील ‘राधानगरी वन्यजीव अभयारण्य’ ते ‘तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’दरम्यानच्या वनपट्ट्यांमध्ये वाघांचा अधिवास केंद्रीत झाला आहे. 2019 मध्ये राधानगरी अभयारण्यामध्ये एका नर वाघाचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपण्यात आले आहे. ’आजरा-भुदरगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’दरम्यानही 2020 मध्ये वाघाचा वावर निदर्शनास आला आहे. तसेच गेल्या आठवड्यात राधानगरी ते तिलारी वनक्षेत्रादरम्यान नर वाघाचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाले आहे. त्यामुळे राज्यातील इतर व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्राबाहेर वाघांचा अधिवास असल्याचे स्पष्ट झाले असून राधानगरी ते चांदोली राष्ट्रीय उद्यानादरम्यान असलेला व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित करणे आवश्यक आहे.
 
 
 
चांदोली ते कालीदरम्यान भ्रमणमार्ग
 
 
महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान पश्चिम घाटामध्ये व्याघ्र भ्रमणमार्ग अस्तित्वात असल्याचा पुरावा समोर आला आहे. वन विभागाला ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’मधील चांदोली अभयारण्यात 2018 साली 23-24 मे रोजी नर वाघाचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपण्यात यश मिळाले होते. ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या स्थापनेनंतर प्रथमच प्रकल्पात नर वाघाच्या अस्तित्वाचा छायाचित्रित पुरावा हाती लागला होता. मधल्या दोन वर्षांच्या काळात प्रकल्पात या वाघाचा वावर आढळून आला नाही. मात्र, मे, 2020 मध्ये हा प्रौढ वाघ (टी-31) कर्नाटकातील ‘काली व्याघ्र प्रकल्पा’चा भाग असलेल्या दांडेली अभयारण्यात आढळला. या वाघाने या दोन्ही वनक्षेत्रांदरम्यान साधारपणे 215 किमी स्थलांतर केले. त्यामुळे चांदोली राष्ट्रीय उद्यान, राधानगरी अभयारण्य, तिलारी राखीव संवर्धन क्षेत्र, भिमगड अभयारण्य आणि ‘काली व्याघ्र प्रकल्पा’दरम्यान व्याघ्र भ्रमणमार्ग अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले आहे.
 
 
 
तिलारी प्रजनन केंद्र
 
 
तिलारी परिसरातील 29.53 चौ.किमी राखीव वनक्षेत्र ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये बांबर्डे, घाटिवडे, केंद्रे, केंद्रे बुद्रुक, पाटिये, शिरंगे, कोनाळ, ऐनवडे, हेवाळे आणि मेढे या गावातील राखीव वनक्षेत्र आहे. ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’ला’जोडणार्‍या व्याघ्र भ्रमणमार्गामधील तिलारी हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. कारण, या परिसरात वाघांचे प्रजनन होते. तिलारी परिसर हा महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या तीन राज्याच्या सीमेवर स्थित आहे. गोव्यातील म्हादाई अभयारण्य, कर्नाटकातील भीमगड अभयारण्य आणि तिलारी राखीव संवर्धन हे तीन क्षेत्र वन्यप्राण्यांच्या दृष्टीने विशेषत: वाघांच्या भ्रमणमार्गाकरिता अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. कर्नाटकातील भीमगड आणि गोव्यातील म्हादाई अभयारण्यामधून वाघांचे स्थलांतर तिलारीमध्ये होते. त्यामुळे तिलारी परिसरात कायमस्वरुपी वाघांचा अधिवास असून सह्याद्रीमधील व्याघ्र अधिवासाकरिता हा परिसर अत्यंत महत्त्वाचा आहे.
 
 
 
खंडित कॉरिडोर
 
सह्याद्री-कोकण कॉरिडोर हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला ‘काली व्याघ्र प्रकल्पा’शी जोडतो. राधानगरी वन्यजीव अभयारण्य या दोन व्याघ्र प्रकल्पांच्या मध्यभागी आहे. खाणकाम आणि खासगी जमिनीवरील जंगलतोडीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ते राधानगरीमधील कॉरिडोरचा प्रदेश अतिशय अरुंद आणि खंडित झाला आहे. सह्याद्री आणि काली या दोन व्याघ्र प्रकल्पांदरम्यान नर वाघांचा वावर आहे. मात्र, सह्याद्रीपर्यंत अजूनही वाघिणीचे स्थलांतर किंवा अधिवास असल्याचे नोंदविण्यात आलेले नाही. कारण, साधारण वाघिणी या खंडित झालेल्या कॉरिडोरमध्ये वावरत नाहीत.
-गिरीश पंजाबी, सह्याद्रीमधील व्याघ्र संशोधक
 
 
 
समस्या कोणत्या?
 
 
सद्यस्थितीतील सह्याद्रीमध्ये असलेला वाघांचा अधिवास सुरक्षित ठेवण्याचे आव्हान आता वन विभागासमोर आहे. सह्याद्रीमधील राखीव वनक्षेत्रांना लागून असणार्‍या खासगी जमिनीदेखील वन्यजीव अधिवासाच्या दृष्टीने घातक ठरत आहेत. कारण, या खासगी जमिनींवर रबर आणि अननस यांसारख्या पिकांची लागवड होत आहे. त्यासाठी या जमिनीवर नैसर्गिक वाढलेले जंगल कापून त्याभोवती कुंपन घालून पिकांच्या लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या खासगी जमिनी लागवडीखाली आणण्याचे प्रमाण वाढत आहे. जमिनीच्या बदलत्या वापराबरोबरच चोरटी शिकार हे देखील वन्यजीव अधिवासाला असणारी मोठी समस्या आहे. शिकारीचे वाढत्या प्रमाणामुळे व्याघ्र अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. सह्याद्रीमध्ये कमी प्रमाणात असलेली तृणभक्षी प्राण्यांची संख्या व्याघ्र अधिवासाला पोषक नाही. वाघांचे भक्ष असणार्‍या तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या गवताळ अधिवासाची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यासाठी अभयारण्य क्षेत्रामधील गावांचे पुनर्वसन करुन किंवा मोकळ्या जागेत गवताळ अधिवास निर्माण करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे. याशिवाय खाणकामासाठी सह्याद्रीमधील अनेक वनपट्ट्यांवर खाण माफियांचे डोळे आहेत.
 
 
सुरक्षित अधिवास आवश्यक
  
सह्याद्रीमधील वाघांच्या अधिवासाचे आणि भ्रमणाचे वन विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सक्षमपणे निरीक्षण करणे आवश्यक आहे. या निरीक्षणामुळे केवळ वाघांचा भ्रमणमार्गच नव्हे, त्यांच्या शिकारीविषयी माहिती मिळवता येईल. वाघाचा अधिवास टिकवण्यासाठी सह्याद्रीतील अभयारण्याबरोबरच ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’मध्ये तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. ज्यामुळे वाघ भ्रमणासाठी ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’चा वापर करतील आणि स्वत:चा कायमस्वरुपी अधिवास निर्माण करू शकतील. राधानगरी ते चांदोली दरम्यानच्या ‘कॉरिडोर’जवळ सुरू असलेल्या खाणकामामुळे याठिकाणी वन्यजीव अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे उत्तर सह्याद्रीमध्ये वाघांचे स्थलांतर सुकर करण्यासाठी शक्य असल्यास हे खाणकाम रोखण्याची गरज आहे.
- श्रीकर अष्टपुत्रे, वन्यजीव अभ्यासक
 
 
@@AUTHORINFO_V1@@