युरेशियन ग्रिफाॅन गिधाडाचा केरळ ते कोयना प्रवास; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पहिली नोंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2021   
Total Views |

vulture_1  H x
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये युरेशियन ग्रिफाॅन गिधाडाची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या गिधाडाच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी लावण्यात येणारा टॅग त्याच्या शरीरावर आढळून आला आहे. हा टॅग केरळमध्ये लावल्याची माहिती मिळाली असून या पक्ष्याने केरळपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापर्यंत प्रवास केल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
 
 
 
महाराष्ट्रात गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद असली तरी 'पांढऱ्या पुठ्ठ्याची', 'लांब चोचीची' आणि 'पांढरी गिधाडे' १९९० आणि त्यापूर्वी मोठ्या संख्येने आढळत होती. गिधाडांची संख्या देशभरात कोलमडल्यानंतर अपुऱ्या खाद्यपुरवठ्यामुळे राज्यात आढळणारी गिधाडेसुद्धा दिसेनाशी झाली. त्यामुळे त्यांचा समावेश ‘नष्टप्राय श्रेणी’तील पक्ष्यांच्या यादीत करण्यात आला. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधून युरेशियन ग्रिफॉन प्रजातीच्या गिधाडाची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना वन्यजीव अभयारण्यामध्ये हा पक्षी आढळून आला. अभयारण्याचे वनरक्षक संतोष चाळके जंगली जयगड भागामध्ये गस्तीवर असताना त्यांना हे गिधाड घिरट्या घालताना दिसले. त्यांनी लागलीच या गिधाडाची छायाचित्रे टिपली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधून युरेशियन गिधाडाची ही पहिलीच नोंद असल्याची माहिती साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली.

 
 
 
चाळके यांनी या गिधाडाची छायाचित्रे टिपल्यावर त्यांना एक महत्त्वाची नोंद मिळाली. या गिधाडाच्या उजव्या पंखावर टॅग असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पक्षी स्थलांतराच्या अभ्यास करण्यासाठी पक्षी अभ्यासकांकडून पक्ष्यांच्या शरीरावर रिंग किंवा फ्लॅग लावण्यात येतात. अशाच प्रकारचा एक फ्लॅग या गिधाडाच्या पंखावर आढळून आला. अधिक माहिती घेतल्यानंतर या गिधाडाला केरळमधील कन्नूरच्या येथे फ्लॅग लावण्यात आला होता आणि त्यानंतर त्याला ३१ जानेवारी रोजी वायनाड वन्यजीव अभयारण्यामध्ये निसर्गमुक्त केल्याची माहिती मिळाल्याचे कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही क्लेमेंट बेन यांनी सांगितले. आता हे गिधाड सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळल्याने त्याच्या निरीक्षणासाठी एक प्रोटोकाॅल तयार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
 
 
 (केरळमधील फ्लॅग लावलेले गिधाडाचे छायाचित्र)

vulture_1  H x
 
 
पक्षी कुठून आला ?
 
 
कन्नूरच्या चक्करक्कल येथे २८ डिसेेंबर रोजी हे गिधाड 'मलबार जागरुकता आणि वन्यजीव बचाव केंद्रा'चे (एमएआरसी) स्वयंसेवक संदीप एम सी यांना थकलेल्या अवस्थेत सापडले. केरळ वन विभागाच्या परवानगीने त्याला कन्नूर येथील 'एमएआरसी'च्या केंद्रात ठेवण्यात आले. या पक्ष्यावर उपचार केल्यानंतर 'जटायु संवर्धन आणि प्रजनन केंद्रा'च्या (जेसीबीसी) मार्गदर्शनाअंतर्गत त्याच्या पंखाला फ्लॅग आणि पायाला रिंग लावून ३१ जानेवारी रोजी वायनाड वन्यजीव अभयारण्यामध्ये सोडण्यात आले. त्यानंतर आता हा पक्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळून आला आहे. युरेशियन गिधाड हे दक्षिण युरोप, उत्तर आफ्रिका आणि आशियामध्ये प्रजनन करतात. भारतामध्ये बहुधा हे पक्षी उत्तर हिमालयीन प्रदेशामधून स्थलांतर करुन येतात.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@