हरिश्चंद्रगडावरून पालीच्या नव्या प्रजातीचा शोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2021   
Total Views |

maharashtra _1  
( महाराष्ट्र - निमास्पिस उत्तरघाटी)

कर्नाटक-तामिळनाडूमधून दोन प्रजातींचा उलगडा 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - हरिश्चंद्रगडावरुन पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. सोबतच कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातून देखील संशोधकांनी पालीच्या नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. पश्चिम घाटामध्ये अधिवास करणाऱ्या या नव्या पाली 'निमास्पिस' कुळातील असून त्या या भागाला प्रदेशनिष्ठ आहेत. या शोधामुळे भारतातील पालींच्या संख्येत भर पडली आहे.
 
 
 
‘निमास्पिस’या कुळातील पालींना ‘ड्वार्फ गेको’ असे म्हणतात. या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या साप आणि पालींपेक्षा प्राचीन असून त्यांची उत्क्रांती साधारणपणे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी पश्चिम घाटामध्ये झाली. त्यांच्या गोल आकाराच्या बुबुळांच्या वैशिष्ट्यामुळे या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या इतर पालींपासून सहज वेगळ्या ओळखून येतात. भारतातील इतर पालीची बुबुळे उभी असतात. देशात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पाली निशाचर आहेत. परंतु, ‘निमास्पिस’ कुळातील पाली मुख्यत्वे दिनचर असतात. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांना ‘डे गेको’ असेही संबोधले जाते. भारतामध्ये ‘निमास्पिस’या कुळातील आजवर ५० प्रजातींची नोंद झालेली आहे. त्या पश्चिम घाट, मैसूरचे पठार, पूर्व घाटातील काही भाग, आसाम, अंदमान आणि निकोबर बेटांवरती आढळतात. त्यांचे मुख्य खाद्य हे कीटक असून त्यानैसर्गिक अन्नसाखळीचा महत्वाचा भाग आहेत.
 
 
maharashtra _1  
 


‘निमास्पिस’ कुळामध्ये आता नव्या प्रजातींची भर पडली आहे. संशोधक अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अग्रवाल यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यामधून पालीच्या नव्या प्रजातींचाशोध लावला आहे. 'ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन' आणि 'नॅशनल सेंटर फाॅर बायोलाॅजिकल सायन्स इन्स्टिट्यूट'च्या मदतीने हे संशोधन समोर आले आहे. या संशोधनाचे वृत्त मंगळवारी 'झूटॅक्सा' या संशोधन पत्रिकेमध्ये प्रसिद्ध झाले. अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडावरुन 'निमास्पिस उत्तरघाटी' या पालीचा शोध लावण्यात आला आहे. आकारशास्त्राच्या आधारे या नव्या पालीचा अभ्यास करुन ती विज्ञानासाठी नवीन असल्याचे उलगडण्यात आले आहे. पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील टोकाकडे 'निमास्पिस' कुळातील आजवर आढळलेली ही पहिलीच पाल आहे. त्यामुळे तिचे नामकरण 'उत्तरघाटी' असे केल्याचे संशोधक अक्षय खांडेकर यांनी सांगितले. 'निमास्पिस' कुळातील इतर पालींप्रमाणेच ही पाल दिनचर असून ती बेसाल्ट खडकावर आढळत असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
 
maharashtra _1  
 
याशिवाय कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील सकलेशपूरमधून 'निमास्पिस शालराय' या पालीचा शोध लावण्यात आला. सस्तन प्राण्यांच्या संवर्धनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे डाॅ. जाॅर्ज शालर यांच्या नावावरुन या पालीचे नामकरण करण्यात आले आहे. तामिळनाडूमधील कृष्णगिरी जि्ल्ह्यातील कृष्णगिरी किल्यावरुन 'निमास्पिस कृष्णगिरीएन्सिस' पालीचा शोध लावण्यात आला आहे. ती सापडलेल्या ठिकाणावरुनच तिचे नामकरण करण्यात आले असून ग्रेनाईटच्या खडकावर तिचा अधिवास असल्याचे खांडेकर यांनी सांगितले. या तिन्ही नव्या प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. म्हणजेच जगामध्ये केवळ शोधलेल्या ठिकाणीच त्या आढळत असल्याचे खांडेकर यांनी अधोरेखित केले.
 
 

@@AUTHORINFO_V1@@