रायगडकर वन्यजीव मित्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2021   
Total Views |

Manas_1  H x W:
रायगडमधील वन्यजीव संरक्षण आणि संशोधन क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा हाडाचा कार्यकर्ता कुणाल नितीन साळुंखे याच्याविषयी...
समुद्र, जंगल आणि कांदळवन अशा तिन्ही नैसर्गिक परिसंस्थांचे वरदान लाभलेल्या रायगड जिल्ह्याचा हा वन्यजीव मित्र. दूरचित्रवाणीवर सापांविषयीची मालिका पाहून निर्माण झालेल्या वन्यजीवांबाबतच्या आवडीला त्याने विज्ञानाचे खतपाणी घातले. ‘सर्पमित्र’ म्हणून सुरू झालेला त्याचा प्रवास आज वन्यजीवांच्या शास्त्रीय संशोधनापर्यंत येऊन ठेपला आहे. रायगडमधील स्थानिक वन्यजीवप्रेमींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्याने समविचारी लोकांच्या मदतीने वन्यजीवांवर संशोधनाचे काम करणारी एक संस्थाही स्थापन केली आहे. निसर्गासाठी धडपडणारा हा कार्यकर्ता म्हणजे कुणाल साळुंखे.
 
 
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात दि. ८ मार्च, १९८३ रोजी कुणालचा जन्म झाला. निसर्गसंपन्न वातावरणाने वेढलेल्या अधिवासात त्याचे घर होते. घराच्या मागच्या बाजूला तळे होते. परसदाराजवळ बसून या तळ्यात येणाऱ्या सापांनो न्याहाळणे त्याचा आवडता छंद असायचा. शिवाय, शाळेला लागून असणाऱ्या डोंगरावर तो भटकायलाही जात असे. त्यावेळी दूरचित्रवाणीवरून जेरी मार्टिनचा सर्पविषयक कार्यक्रम प्रक्षेपित व्हायचा. या कार्यक्रमातील मार्टिनच्या सर्प पकडण्याच्या कौशल्याने कुणालला भुरळ पाडली. साप पकडण्यासाठी मार्टिनकडून वापरली जाणारी हत्यारे त्याला आकर्षित करायची. यामुळे त्याला सापांविषयी आवड निर्माण झाली. महाविद्यालयीन वयातील भटकंतीदरम्यान साप पकडून या आवडीला खतपाणी मिळाले. मात्र, महाविद्यालयीन वयानंतर त्याची वन्यजीवांची आवड आणि त्यामागील शास्त्रीय दृष्टिकोन हा अधिक बहरत गेला.
 
 
‘निसर्ग गिरी भ्रमण’ या संस्थेमुळे त्याचे जंगलात भटकणे सुरू झाले. एकदा घराजवळ आलेला साप पकडल्यामुळे त्याची स्थानिक सर्पमित्रांशी ओळख झाली. रायगड जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक गणेश मेहंदळे यांच्याशी भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे रायगडमध्ये सर्पमित्रांचा एक छोटा ग्रुप तयार झाला. त्यावेळी ‘सर्पमित्र’ ही संकल्पना फारच नवीन होती. केवळ साप पकडून कुणालची भूक भागत नव्हती. त्यांची शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी त्याची तळमळ सुरू होती. ही तळमळ त्याला मुंबईतील ‘बीएनएचएस’मध्ये घेऊन आली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वरद गिरी, केदार भिडे, अशोक कॅप्टन यांच्याकडून सापांविषयी प्राथमिक शास्त्रीय माहिती त्याने घेतली. याच ओढीमुळे त्याची भेट पुढे बालपणी आदर्श असलेल्या जेरी मार्टिनसोबत झाली. त्यांच्याकडेही कुणालने सर्पविज्ञानाचे शास्त्रीय धडे गिरवले.
 
 
 
दरम्यान, याच काळात त्याला छायाचित्रणाचाही छंद जडला. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास वेगवेगळ्या ७०० फुलांची छायाचित्रे त्याने टिपली. ग्रामीण भागातील मुलांना वन्यजीव किंवा पर्यावरणाची आवड असते. मात्र, त्यासाठी आवश्यक माहिती देणारे आणि त्यानंतर पाठबळ देणारे व्यासपीठ उपलब्ध नसते. म्हणूनच वन्यजीवांच्या शास्त्रीय अभ्यासाचा दृष्टिकोन ठेवणारी एक संस्था रायगडमध्ये स्थापन करणाचा मानस कुणाल, गणेश मेहंदळे आणि त्याच्या परिचयातील समविचारी लोकांचा होता. त्याअनुषंगाने २०१६ साली ‘ऑर्गनायझेशन फॉर वाईल्डलाईफ स्टडिज’ (आऊल) या संस्थेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्राला सर्पमित्र चळवळीला शिस्तीचा आणि शास्त्रीय दृष्टिकोनाचा विचार देण्याकडे संस्थेचा कल होता. त्यासाठी २०१७ मध्ये संस्थेकडून वनविभागाच्या मदतीने महाराष्ट्रात प्रथमच ‘सर्पमित्र संमेलन’ आयोजित करण्यात आले. या संमेलनामध्ये जवळपास एक हजारांहून अधिक सर्पमित्र सहभागी झाले होते. साप पकडण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य यावेळी सर्पमित्रांना वाटण्यात आले. सर्पमित्रांच्या समस्यांना वन अधिकाऱ्यांसमोर वाचा फोडण्यात आली. सोबतच सर्पमित्रांचे ज्ञानार्जनही करण्यात आले. यावेळी देशातील सर्पसंशोधनातील तज्ज्ञ मंडळींकडून घेण्यात आलेल्या सर्पविज्ञान परिषदेमध्ये सापांची ‘टेक्सोनॉमी’, ‘ऑटोनॉमी’ अशा प्रकारचे ज्ञान सर्पमित्रांना देण्यात आले. शिवाय, या परिषदेचे यश म्हणजे यावेळी सापांना पकडण्यासाठी ‘प्रमाणभूत प्रचलित कार्यपद्धती’ (एसओपी) प्रसिद्ध करण्यात आली.
 
संस्थमार्फेत पुढच्या कालावधीत कुणालने सापांच्या अधिवासाचाही अभ्यास केला. एका ठिकाणाहून पकडलेले साप दुसऱ्या ठिकाणी सोडल्यास, तो आपल्या मूळ अधिवासामध्ये परत येतो का, या कुतुहलाचा अभ्यास या माध्यमातून करण्यात आला. संस्थेमार्फत सावित्री नदीमध्ये अधिवास करणाऱ्या मगरींवरदेखील अभ्यास झाला. दरम्यानच्या कालावधीत रायगडमध्ये गवे दिसत असल्याच्या बातम्या कुणालच्या कानावर येऊ लागल्या. फणसाड अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये गवे दिसत असल्याची माहिती मिळाली. कुणालने त्या परिसराकडे मोर्चा वळवला. मात्र, वर्षभर सर्वेक्षण करूनही त्याला गव्याचे दर्शन घडले नाही. वर्षभरानंतर त्याने पुन्हा एकदा गव्यांच्या शोधमोहिमेला सुरुवात केली. ‘ड्रोन’च्या मदतीने सर्वेक्षण केल्यानंतर अखेरीस गव्याचे दर्शन घडले. हे गवे या ठिकाणी कायमस्वरूपी अधिवास करणारे असल्याचे दिसून आले आणि महत्त्वाचे म्हणजे, फणसाड अभयारण्यामधून प्रथमच कुणालने गव्यांची छायाचित्रित नोंद केली. कोरोनामुळे कुणालच्या या कामात खंड पडला आहे. मात्र, परिस्थिती सुधारल्यानंतर तो रायगडमधील गव्यांचा भ्रमणमार्ग आणि त्यांच्या वैविध्याबाबत अभ्यास करणार आहे. आपला ‘इंटिरिअर डिझायनिंग’चा व्यवसाय सांभाळून कुणाल वन्यजीव रक्षणाचे काम तळमळीने करत आहे. त्याला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@