उरणमधील पाणथळींवर भराव सत्र सुरूच; पक्षी अधिवासावरील परिणाम उघड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2021   
Total Views |

uran wetland_1  


'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन' आणि 'बीएनएचएस'च्या अहवालातून पक्षी अधिवासावरील परिणाम उघड

मुंबई (अक्षय मांडवकर) - उरणमधील धुतुम गावातील पाणथळीवर भराव टाकण्याचे काम सुरू असल्याने येथील कांदळवनांचा ऱ्हास होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत वन विभागाचे 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन' आणि 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालामधून उरणमधील पाणथळींवर टाकलेल्या भरावामुळे स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवासावर झालेला विपरीत परिणाम अधोरेखित करण्यात आला आहे.
 
 
उरण तालुक्यातील पाणथळींवर सातत्याने भराव टाकण्याचे सत्र सुरू आहे. तालुक्यातील पाणथळ क्षेत्र हे पक्षी अधिवासाबरोबरच कांदळवनाच्या आच्छादनाकरिता महत्त्वाचे आहे. असे असूनही यापूर्वीच बेलपाडा, जासई, सावरखार, भेंडखळ आणि पांजेमधील पाणथळी या टाकलेल्या भरावामुळे शेवटच्या घटका मोजत आहेत. यामध्येच आता तालुक्याच्या द्रोणागिरी नाॅडमधील धुतुम गावानजीक असलेल्या पाणथळ क्षेत्रावर भराव टाकण्यास सुरुवात झाली आहे. याठिकाणी कांदळवनांवर देखील भराव टाकण्यात येत असल्याची माहिती या प्रकरणी न्यायलयीन आणि प्रशासकीय पाठपुरावा करणारे 'श्री एकविरा आई प्रतिष्ठान'चे नंदकुमार पवार यांनी दिली. सार्वजनिक सुट्टी, शनिवार आणि रविवार रात्रीच्या वेळी भराव टाकण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
उरणमधील पाणथळींवर यापूर्वी टाकलेल्या भरावामुळे स्थलांतरित पाणपक्ष्यांच्या संख्येत झालेली घट आणि त्यांच्या अधिवासावर झालेला परिणाम 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन' आणि 'बीएनएचएस'च्या गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालातून समोर आला आहे. राज्यातील पाणथळींवर स्थलांतर करणाऱ्या पाणपक्ष्यांचा प्रजाती आणि त्यांचे स्थलांतर मार्ग जाणून घेण्यासाठी 'बीएनएचएस'च्या शास्त्रज्ञांनी २०१७ ते २०१९ या कालावधीत अभ्यास केला. त्याअनुसार तयार केलेल्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे जानेवारी २०१८ मध्ये सर्वेक्षणादरम्यान शास्त्रज्ञांना जासईच्या पाणथळीवर भराव टाकण्याचे काम सुरू असल्याचे दिसले. या कामामुळे त्यांना एकही पक्षी दिसला नाही.
 
 
मार्च २०१८ मधील सर्वेक्षणादरम्यान या पाणथळीवर भराव न झालेल्या दक्षिणेकडील भागामध्ये त्यांना काही पक्षी दिसले. मात्र, आॅगस्ट आणि सप्टेंबर २०१८ मध्ये मोठ्या प्रमाणात भरावाचे काम सुरू झाल्याने 'बीएनएचएस'च्या संशोधकांना एकाही पक्ष्याची नोंद करता आली नाही. सारखीच परिस्थिती भेंडखळ पाणथळ क्षेत्रामधूनही नोंदविण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याठिकाणीही भराव वाढत गेल्यानंतर पक्ष्यांच्या संख्येत घट झाल्याचे नोंदविण्यात आले आहे.


मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
 
धुतुम पाणथळींवर सुरू असलेल्या भरावाबाबत नंदकुमार पवार यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली होती. यावर कार्यालयाकडून ही तक्रार पुढील कार्यवाहीसाठी नगरविकास-२ विभागास पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाणथळ यादीत समाविष्ट नसलेल्या मात्र जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पाणथळींचे पुनर्मुल्यांकन करण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@