आंबोली महादेव मंदिर परिसर आता 'शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळ'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2021   
Total Views |
shitura hiranyakeshi _1&n


मुंबई (अक्षय मांडवकर) -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमधील महादेव मंदिर परिसर हे 'शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळ' म्हणून घोषित करण्यात आले आहे. महादेव मंदिरासमोरील छोट्या कुंडामधून नव्याने शोधलेल्या 'शिस्टुरा हिरण्यकेशी' माशाच्या संवर्धनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा मासा जगात केवळ याच परिसरात आढळत असल्याने त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील हे पाचवे 'जैविक वारसा स्थळ' असून देशात प्रथमच 'टेम्पल कम्युनिटी काॅन्झर्वेशन' ही संकल्पना राबवून एखाद्या माशाच्या संवर्धनासाठी एखादा परिसर संरक्षित करण्यात आला आहे.
 
 
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात 'शिस्टुरा हिरण्यकेशी' माशाच्या शोधाविषयीचा संशोधन निबंध प्रसिद्ध झाला होता. या नव्या प्रजातीचा उलगडा डाॅ. प्रविणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे आणि शंकर बालसुब्रमण्यम यांनी केला आहे. गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या हा मासा प्रदेशनिष्ठ आहे. म्हणजेच तो केवळ आंबोलीतील महादेवाच्या मंदिरासमोरील कुंडामध्ये आणि त्याशेजारी असणाऱ्या हिरण्यकेशी नदी उगमाच्या मुखाशी आढळतो. म्हणूनच या माशाचे मर्यादित स्वरुपाचे अधिवास क्षेत्र लक्षात घेऊन त्याच्या संवर्धनासाठी महादेव मंदिर परिसराला 'जैविक वारसा स्थळा'चा दर्जा देण्यात आला आहे. वन विभागाने 'जैविक विविधता कायदा, २००२' मधील कलम ३२ चा वापर करुन या स्थळाला 'जैविक वारसा स्थळा'चा दर्जा दिला आहे.
 
 
 
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गावामधील २.११ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या महादेव मंदिर परिसराला 'शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळ'चा दर्जा देण्यात आल्याची माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. येथील मंदिर परिसराला 'जैविक वारसा स्थळा'चा दर्जा मिळाल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या धार्मिक हक्कांवर कोणत्याही प्रकारची रोख येणार नाही. केवळ मंदिरासमोर कुंडामधील माशाच्या रक्षणाची जबाबदारी स्थानिकांची असेल, त्यासाठी जैवविविधता व्यवस्थापन समिती तयार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
या परिसराच्या संवर्धनासाठी 'ठाकरे वाईल्ड फाऊंडेशन'चे (टीडब्लूएफ) प्रमुख आणि वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे यांनी वन विभागाच्या सचिवांना पत्र लिहले होते. या पत्रात त्यांनी 'शिस्टुरा हिरण्यकेशी' माशाचा अधिवास असणाऱ्या महादेव मंदिराचा परिसर 'हिरण्यकेशी लोच जैवविविधता वारसा स्थळ' म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. देशात प्रथमच 'टेम्पल कम्युनिटी काॅन्झर्वेशन' ही संकल्पना राबवून आपण स्थानिकांच्या मदतीनेच या प्रदेशनिष्ठ माशाचे संवर्धन करू शकतो, असेही त्यांनी या पत्रात म्हटले होते. महाराष्ट्रामधील हे पाचवे 'जैविक वारसा स्थळ' असून यापूर्वी सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील मायरेस्ट्रिका स्वॅम्पचे एकमेव जंगल, गडचिरोलीमधील ग्लोरी आॅफ अल्लापल्ली, लँडोरखोरी रिझर्व फॉरेस्ट, जळगाव आणि गणेशखिंड गार्डन, पुणे यांना हा दर्जा देण्यात आला आहे.shitura hiranyakeshi _1&n


ऐतिहासिक निर्णय 
कमी प्रमाणात ज्ञात असलेल्या प्रदेशनिष्ठ प्रजातींचे संशोधन आणि त्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या माझ्यासारख्या संशोधकांसाठी हा निर्णय ऐतिहासिक आहे. भारतामध्ये प्रथमच गोड्या पाण्यातील एखाद्या छोट्या माशाच्या संरक्षणासाठी त्याच्या अधिवास क्षेत्राला जैविक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. माझ्या मते, हीच विज्ञान आणि टॅक्सोनाॅमी तंत्राची ताकद आहे. ही एका नवीन उपक्रमाची ही सुरुवात आहे जिथे महाराष्ट्र वन विभाग, स्थानिक स्वयंसेवी संस्था, स्थानिक ग्रामस्थ आणि मंदिर प्रशासन आपल्या देशात पहिल्यांदाच "मत्स्य संवर्धन" या संकल्पनेअंतर्गत 'मंदिर मत्स्य संवर्धन' कार्यक्रमावर काम करण्याची योजना आखत आहेत. यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री, वन विभागाचे सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन आणि मुख्य म्हणजे सर्व स्थानिक आंबोलीकरांचे हिरण्यकेशीच्या रक्षणासाठी एकत्र आल्याबद्दल मनापासून आभार मानू इच्छितो. 'टीडब्ल्यूएफ' ही संस्था ज्ञात नसलेल्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या संरक्षणासाठी वचनबद्ध आहे आणि भविष्यातही त्याच मार्गावर काम करत राहणार आहे. - तेजस ठाकरे, हिरण्यकेशी माशाचे संशोधक 'शिस्टुरा हिरण्यकेशी'ची वैशिष्ट्य

- 'शिस्टुरा' कुळातील असल्याने तिचे नामकरण 'शिस्टुरा हिरण्यकेशी', असे करण्यात आले.

- या माशाचा आकार ३३ ते ३७.८ एमएम आहे.

- हा मासा झूप्लॅक्टन, शैवाळ आणि छोटे कीटक खातो.

- हा मासा भारतातल्या सर्वात सुंदर आणि आकर्षक माशांच्या प्रजातीपैंकी एक असल्याने त्याला मत्स्यपालनासाठी होणाऱ्या अवैध व्यापाराचा धोका आहे.

@@AUTHORINFO_V1@@