'आंबोली-दोडामार्ग कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये वाघाने केली शिकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2021   
Total Views |
sahyadri tiger _1 &n
 
 मुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधुदुर्गातील 'आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये वाघाची पदचिन्ह आणि त्याने केलेली शिकार मिळून आली आहे. वाघाने मारलेल्या गव्याचे कुजलेले शरीर याठिकाणी आढळून आले आहे. परिसरात नर वाघाचा वावर असल्याची शक्यता असून तिलारी, आंबोली आणि चंदगड परिसरातील राखीव वनक्षेत्रांना 'काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'चा दर्जा दिल्याने वाघांचा भ्रमणमार्ग सुरक्षित झाला आहे.

 
डिसेंबर, २०२० मध्ये राज्य सरकाराने ५ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या 'आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्ह' आणि २२ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावरील 'चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'ची घोषणा केली होती. त्यापूर्वी २९.५३ चौ.किमीच्या 'तिलारी काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'ची स्थापना झाल्याने या भागातील वन्यजीवांचा भ्रमणमार्ग जोडण्यासाठी मदत झाली. तिलारी परिसर हा महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या तीन राज्याच्या सीमेवर स्थित आहे. गोव्यातील म्हादाई अभयारण्य, कर्नाटकातील भिमगड अभयारण्य आणि तिलारी राखीव संवर्धन हे तीन क्षेत्र वन्यप्राण्यांच्या दृष्टीने विशेषत: वाघांच्या भ्रमणमार्गाकरिता अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते. 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला' जोडणाऱ्या वन्यजीव भ्रमणमार्गामधील तिलारी हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. कारण, या परिसरात वाघांचे प्रजनन होते. येथूनच वाघ हे आंंबोली, चंदगड आणि आजरामार्गे राधानगरी व चांदोली अभयारण्यापर्यंत भ्रमण करतात.

 
 
 
आंबोलीत यापूर्वी वाघांच्या पावलांचे ठसे आणि त्याने केलेल्या शिकारीचे अवेशष मिळाले आहेत. लाॅकडाऊनच्या काळातही आंबोली परिसरात वाघाचा वावर होता. यावेळी त्याने म्हशीची शिकार केली होती. आंबोली ते आजरा या भागामध्ये नर वाघाचा वावर असल्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत 'आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'ची घोषणा झाल्यानंतर प्रथमच या भागात वाघाचा अधिवास असल्याचे समोर आले आहे. कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही. बेन क्लेमंट यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी 'आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये वाघांने गव्याची केलेली शिकार आढळली आहे. तसेच वनकर्मचाऱ्यांना गस्ती दरम्यान वाघाची पदचिन्ह सापडली आहेत. 'काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'च्या निर्मितीमुळे वाघांचा भ्रमणमार्ग जोडला जाऊन तो संरक्षित झाल्याचा हा परिणाम असल्याने बेन यांनी म्हटले आहे. वाघ आणि इतर मोठ्या सस्तन प्राण्यांसाठी कॉरीडोर कनेक्टिव्हिटी (भ्रमणमार्गाची जोडणी) महत्त्वपूर्ण असल्याची माहिती सह्याद्रीतील व्याघ्र संशोधक गिरीश पंजाबी यांनी दिली. भ्रमणमार्ग अखंड ठेवल्याने प्रजनन क्षेत्रातील वाघ हे त्या क्षेत्राला जोडणाऱ्या इतर जंगलात आणि संरक्षित वन क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र अधिवास निर्माण करु शकतात, असेही त्यांनी अधोरेखित केले.

@@AUTHORINFO_V1@@