शार्क-स्टिंग रे संकटात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2021   
Total Views |
sting ray _1  H'इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ (आययुसीएन) या संस्थेकडून जगातील वन्यजीवांच्या अस्तित्वाचे मूल्यांकन करण्यात येते. यासंबंधीचे नवे मूल्यांकन समोर आले आहे. त्यामध्ये ३७,४०० प्रजातींना जगातून लुप्त होण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, यामधील सर्वाधिक संख्या ही समुद्रात अधिवास करणार्‍या ‘शार्क’ आणि ‘स्टिंग रे’ (पाकट) या मत्स्यप्रजातींची आहे. यामधील साधारण 36 टक्के प्रजाती या लुप्त होण्याचा मार्गावर असल्याचे म्हटले आहे. ‘शार्क’ आणि ‘स्टिंग रे’च्या ७६ प्रजाती आता ‘अति-संकटग्रस्त’, ११२ प्रजाती ‘संकटग्रस्त’ आणि १६७ प्रजाती ‘धोकाग्रस्त’ पातळीवर नोंदविण्यात आल्या आहेत. ‘स्टिंग रे’ कुळातील एक प्रजात जगातून नामशेष झाल्याची शक्यता ‘आययुसीएन’ने वर्तवली आहे. इंडोनेशियातील जावा किनारपट्टी क्षेत्रात आढळणारी ‘जावा स्टिंग रे’ या प्रजातीचा समावेश ‘आययुसीएन’ने संभाव्य विलुप्त प्रजातींच्या यादीत केला आहे. या प्रजातीचा समावेश २००६ साली ‘अति-संकटग्रस्त’ प्रजातींच्या यादीत केला होता. इंडोनेशिया देशाला प्रदेशनिष्ठ असलेल्या या प्रजातीचे १९व्या शतकाच्या अखेरनंतर दर्शन घडलेले नाही. ‘स्टिंग रे’ प्रजातींविषयी कमी माहिती असल्याने, त्यांच्या अभ्यासावर हवे तसे लक्ष न दिल्याने आणि मासेमारी-मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनाच्या अभावामुळे या प्रजाती ‘शार्क’ प्रजातींपेक्षाही संकटात सापडल्या आहेत. समुद्रात प्रवाळ क्षेत्रात राहणार्‍या आणि अतिसामान्यपणे दिसणार्‍या ‘शार्क’ प्रजातीही आता धोक्यात सापडू लागल्या आहेत. ‘कॅरिबियन रीफ शार्क’, ‘लेमन शार्क’ आणि ‘अटलांटिक नर्स शार्क’ या सर्वसामान्यपणे दिसणार्‍या प्रजाती आता धोकाग्रस्त म्हणून नोंदविण्यात आल्या आहेत. ‘शार्क’ आणि ‘स्टिंग रे’च्या १,२००पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रजाती आपल्या जागतिक महासागरात वास्तव्यास आहेत. हे वैविध्यपूर्ण जीव डायनासोरच्या काळापासून साधारण ४०० दशलक्ष वर्षांहूनही अधिक काळ समुद्रात वास्तव्य करत आहेत. ‘शार्क’ आणि ‘स्टिंग रे’ समुद्रातील अन्नसाखळीबरोबरच जगभरातील लाखो लोकांची उपजीविका, अन्न आणि पर्यटनाच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत.
शिकार हत्तींच्या मुळावर


जगातील वन्यजीवांच्या अस्तित्वाबाबत ‘आययुसीएन’ने तयार केलेल्या लाल यादीत १,३४,४२५ प्रजातींचा समावेश आहे. त्यामधील ३७,४८० प्रजातींना नामशेष होण्याचा धोका आहे, तर ९०० प्रजाती या जगामधून विलुप्त आणि ७९ प्रजाती या वनांमधून विलुप्त झाल्या आहेत. गेल्या अनेक दशकांपासून अधिवास नष्टता आणि हस्तिदंतासाठी केल्या जाणार्‍या शिकारीमुळे आफ्रिकन जंगली हत्तींचा ‘अति-संकटग्रस्त’ आणि ‘आफ्रिकन सवाना’ हत्तींचा ‘संकटग्रस्त’ प्रजातींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. नव्या मूल्यांकनानुसार संपूर्ण आफ्रिकन हत्तींच्या संख्येमध्ये व्यापक घट दर्शवित आहे. गेल्या ३१ वर्षांच्या कालावधीमधील आफ्रिकन जंगली हत्तींची संख्या ८६ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे, तर गेल्या ५० वर्षांत ‘आफ्रिकन सवाना’ हत्तींची संख्या कमीत कमी ६० टक्क्यांनी घटली आहे. वाढत्या शिकारीमुळे २००८पासून या दोन्ही हत्ती प्रजातीच्या संख्येमध्ये मोठ्या संख्येने घट होत आहे. सोबतच त्यांच्या अधिवासक्षेत्राचा शेती आणि इतर कारणांसाठी वापर वाढला आहे. ‘आययुसीएन’ने २०१६ साली केलेल्या प्रगणनेत या दोन्ही प्रजातींचे साधारण ४ लाख १५ हजार हत्ती जगामध्ये अस्तित्वात राहिले आहेत. प्रथमच ‘आययुसीएन’च्या यादीत आफ्रिकेतील जंगलात आढळणार्‍या हत्तींच्या या दोन्ही प्रजातींचे स्वतंत्रपणे मूल्यांकन करण्यात आले आहे. या मूल्यांकनांसाठी १९६० सालापासूनच्या माहितीचा वापर करण्यात आला. आफ्रिकेच्या वनभूमीवर हस्तिदंताची मागणी वाढत आहे. हत्तींच्या अधिवासावर मानवी दडपशाही वाढत असल्याने आफ्रिकेतील हत्तींच्या प्रजातीवर धोका वाढत आहे. म्हणूनच, या प्राण्यांचे आणि त्यांच्या निवासस्थानांचे सर्जनशीलपणे संवर्धन करण्याची आणि त्यांच्या देखभालीची आवश्यकता पूर्वीपेक्षा अधिक आहे. दोन्ही आफ्रिकन हत्तींच्या प्रजातींच्या संख्येमध्ये घट असली तरी हे मूल्यमापन यशस्वी संवर्धनाच्या प्रयत्नांच्या परिणामावरही प्रकाश टाकते. आफ्रिकेत मानव-वन्यजीव सहजीवनाला चालना देण्यासाठी अधिक समर्थक कायदे आणि भूमीपयोगी नियोजन यांच्या साहाय्याने शिकारविरोधी उपाय हत्तींच्या यशस्वी संवर्धनाची गुरुकिल्ली ठरली आहे.
@@AUTHORINFO_V1@@