एकीचे बळ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2021   
Total Views |

Deepak Fert_1  
 
 
 
जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना ‘लॉकडाऊन’ काळातही आपल्या उत्पादनांची मशाल पेटती ठेवावी लागली. संक्रमणाचा धोका असूनही या कंपन्यांमधील कर्मचारी आणि प्रशासनामधील मंडळी उत्पादन प्रक्रियेत खंड पडू न देता अविरतपणे कार्यरत होती. यामधीलच एक कंपनी म्हणजे ‘दीपक फर्टिलायझर्स अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड.’ या कंपनीने कर्मचाऱ्यांची योग्य रितीने काळजी तर घेतलीच, शिवाय जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठादेखील सुरळीत ठेवला. तेव्हा, ‘कोविड’ काळातील कंपनीच्या कार्यावर टाकलेला हा एक प्रकाश...
 


‘दीपक फर्टिलायझर्स अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’ ही तळोजा ’एमआयडीसी’मधील एक नामवंत कंपनी. विविध प्रकारचे ‘स्पेशालिटी केमिकल्स’ आणि खतांच्या उत्पादनामध्ये कंपनीचा हातखंडा. तळोजामध्ये कंपनीचे एकूण तीन युनिट्स आहेत. ’दीपक फर्टिलायझर्स अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’ ही कंपनी तळोजा ’एमआयडीसी’मधील सगळ्यात मोठी कंपनी असून कंपनीत काम करणारे ९० टक्के कर्मचारी हे स्थानिक आहेत, हे विशेष. आजूबाजूच्या गावातील सर्वाधिक लोक याच कंपनीत कार्यरत आहेत. केवळ व्यवस्थापनातील १० टक्के कर्मचारी हे इतर परिसरांमधून कामासाठी येतात.
 
१९७९ साली स्थापन झालेल्या या कंपनीच्या प्रगतीचा आलेख चढता राहिला आहे. देशभर कंपनीचा विस्तार झाला असून सद्यस्थितीत कंपनीचे ‘कॉर्पोरेट ऑफिस’ पुण्यात आहे. मुंबई, दहेज, पानिपत, श्रीकाकुलाम येथे कंपनीचे कारखाने आहेत. शिवाय शेअर बाजारात कंपनीचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते. शैलेश मेहता हे ’दीपक फर्टिलायझर्स अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. भारतामध्ये मार्च महिन्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागल्यानंतर ’दीपक फर्टिलायझर्स अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’ने सुरक्षेच्या दृष्टीने हालचालींना तातडीने सुरुवात केली. कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या अध्यक्षांनी दूरदृष्टी ठेवून काही उपाययोजना आखत, समित्यांची स्थापना केली. ‘हेल्थ अ‍ॅण्ड हायजिन’, ‘वेलफेअर आणि ऑपरेशन टास्क रिव्ह्यू’ अशा समिती नेमून कामांची आखणी, विभागणी केली. दूरदृष्टी ठेवून आगाऊ स्वरुपात नियोजन करण्यात आले असले, तरी कंपनीला संकटाचा सामना करावा लागला. कारण, कंपनीची उत्पादने ही अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याकारणाने कारखाने बंद करून चालणार नव्हते. दरदिवशी उत्पादन घेणे आवश्यक होते. मात्र, सुरुवातीच्या काळात लोकांमध्ये कोरोनाविषयक जागृती नव्हती. त्यामुळे कर्मचारीही कामावर येण्यासाठी धजावत नव्हते.
 
 
Deepak Fert_1  
 
 
कंपनीने कारखाने सुरू ठेवल्याने लोकांच्या विरोधाचा प्रसंगी सामनाही कंपनी प्रशासनाला करावा लागला. सोबतच राजकीय पक्ष, माध्यमे आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचाही दबाव होताच. अशा परिस्थितीत कंपनीने आरोग्यविषयक उपाययोजनांवर भर दिला. सुरुवातीपासून कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीबाबत कंपनी प्रशासन सजग राहिले. ठिकठिकाणी जनजागृतीपर सूचनांचे फलकही लावण्यात आले. कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाविषयी असलेले भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी कंपनीने सर्वतोपरी प्रयत्न केले. ‘हेल्थ’ आणि ’हायाजिन’साठी कर्मचाऱ्यांना ‘स्टिमर’ उपलब्ध करून देण्यात आले. दररोज आरोग्य तपासणीला सुरुवात झाली. काही लक्षणे जाणवल्यास कर्मचाऱ्यांना त्याची माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले. एखाद्या कर्मचाऱ्यामध्ये सर्दी-खोकल्याची लक्षणे दिसल्यास त्याला घरी राहण्याची मुभा देऊन योग्य उपाययोजना करण्यात आल्या.
 
 
‘लॉकडाऊन’नंतर सार्वजनिक वाहतूक सेवाही ठप्प झाली. यावेळी कर्मचाऱ्यांना कंपनीच्या बसमधून कामावर आणण्याची सोय करण्यात आली. त्यासाठी कंपनीने बसच्या निश्चित थांब्यांच्या संख्येत वाढही केली. कर्मचाऱ्यांना कंपनीच्या वाहनानेच कामावर कसे आणता येईल, याबाबत खबरदारी घेण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या आहाराचीही काळजी घेतली. समुपदेशनासाठी त्रयस्थ संस्थेची नेमणूक करुन ऑनलाईन माध्यमातून कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले. लांबून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची कंपनीमध्येच राहण्याची व्यवस्था करून देण्यात आली. सोबतच एक हॉटेल राखीव करुन तिथे कर्मचाऱ्यांची सोय करण्यात आली. अशा प्रकारे कंपनीने फार मोठ्या प्रमाणात राबविलेल्या उपाययोजनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकप्रकारची विश्वासाची भावना निर्माण झाली. आपण घरच्यांपेक्षा कंपनीमध्येच सुरक्षित असल्याचा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला. त्यामुळे सुरुवातीला असलेल्या गैरहजेरीचे प्रमाण कमी झाले. कंपनीच्या व्यवस्थापनानेदेखील ‘कोविड’संबंधी उपाययोजनांसाठी कधीच नकार दिला नाही. मनुष्यबळ विभागाने सांगितलेल्या सर्व उपाययोजनांना त्यांनी तातडीने मंजुरी दिली. ‘कोविड’वरील उपाययोजनांसाठी वेगळे ‘बजेट’ही तयार करण्यात आले. या सर्व उपाययोजनांमुळे कंपनीचे सर्व कारखाने अव्याहतपणे एक तासाचा खंडही न पडता सुरू ठेवण्यात आले. हे सर्व कंपनीचे व्यवस्थापन, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमुळे शक्य झाले. सोबतच यातून कंपनीमध्ये असलेल्या ऐक्याचेही दर्शन घडले.
 
‘लॉकडाऊन’च्या काळात कंपनीसमोर उत्पादनांच्या अनुषंगानेदेखील काही आव्हाने होती. कंपनीला विविध सेवा पुरवणाऱ्या लोकांवर असलेले अवलंबित्व कमी करण्यात आले. त्याकरिता प्रशासनामध्ये कंपनीमधील लोकांना प्रशिक्षित करून ती क्षमता निर्माण केली. कंपनीमध्ये तयार झालेल्या उत्पादनांची वाहतूक करण्यामध्येही समस्या होत्या. शिवाय कच्च्या मालाची ने-आण करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. ’दीपक फर्टिलायझर्स अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’मध्ये सॅनिटायझरकरिता लागणारे आयपीए, खाणीसाठी लागणारे ट्रॅन इ. जीवनावश्यक उत्पादनांची निर्मिती केली जाते. त्यामुळे ‘लॉकडाऊन’मधील कठीण काळात अशा उत्पादनांची निर्मिती सुरू ठेवण्याचे आव्हानही कंपनीसमोर होते.
 
‘कोविड’ काळात सामाजिक कार्यातही कंपनी अग्रेसर राहिली. कंपनीच्या कारखान्यात जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन घेतले जात होते. ‘लॉकडाऊन’च्या काळात सॅनिटायझरकरिता आवश्यक असणारे ’आयपीए’चे उत्पादन कंपनीमध्ये होत असल्याने त्यामध्ये खंड पडू न देणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत कंपनीमध्ये सॅनिटायझर तयार होत असल्याचे लोकांना वाटू लागले. त्यामुळे कंपनीकडे सॅनिटायझरची मागणी वाढू लागली. मात्र, लोकांना थेट सॅनिटायझर देणे शक्य नव्हते. तरीदेखील कंपनीने नवी मुंबई महानगर परिक्षेत्रातील पोलीस स्थानकांमध्ये ‘फेस शिल्ड’, मास्क, सॅनिटायझर दिले. कंपनीच्या आसपासच्या गावांमध्ये अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. सोबतच मुख्यमंत्री आपत्कालीन निधीला मदत करत रुग्णवाहिकांची भेटही शासनाला देण्यात आली आहे.
 
"कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांच्यामधील क्षमता जागृत ठेवण्याचे काम उद्योजकांनी करणे आवश्यक आहे. शिवाय त्यांच्यामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे कामही करावे, तरच कंपनीच्या उत्पादनाची ताकद वाढीस लागेल."
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@