धडाडीचा उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2021   
Total Views |

CG  _1  H x W:
 
 
उद्योगाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या दत्तात्रय आदाटेंनी गेल्या ३० वर्षांमध्ये स्वबळावर आणि स्वकर्तृत्वावर बांधकाम क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे. कोरोनाचा कठीण काळ हा त्यांच्यासाठीदेखील इतर उद्योजकांप्रमाणेच तितकाच आव्हानात्मक होता. मात्र, त्यावर आदाटेंनी आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक मूल्ये जपून सकारात्मकतेने मात केली. आपल्या कर्मचार्‍यांना सोबत घेऊन त्यांनी संकटकाळातही विकासाची कास धरली आणि कंपनीला विकासमान केले. तेव्हा, ‘लॉकडाऊन'मधील दत्तात्रय आदाटे यांच्या उद्योग संघर्षावर टाकलेला हा प्रकाश...
 
 
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लागलेल्या ‘लॉकडाऊन'चा फटका मुख्यत्वे हातावर पोट असणार्‍या कामगारांना बसला. रोजंदारीवर असलेला बहुतांश कामगार मायदेशी परतल्याने त्याचा फटका उद्योजकांनाही बसला. यावेळी काही उद्योजकांनी आपले हात झटकले, तर काहींनी या कर्मचार्‍यांना साथ दिली. कठीण प्रसंगात कामगारांना आपले कुटुंब मानून त्यांचे साथ देणारे एक उद्योजक म्हणजे दत्तात्रय आदाटे. लालबाग-परळ यांसारख्या कामगार वस्तीत जन्मलेल्या आदाटेंना कामगारांच्या प्रश्नांची उत्तम जाण होती. म्हणूनच ‘लॉकडाऊन'च्या परिस्थितीत आपल्या 'जय एंटरप्रायझेस' आणि 'ग्रीन स्काय डेव्हलपर्स'मध्ये काम करणार्‍या कामगारांना त्यांनी भक्कम साथ दिली.
 
 
एकत्र कुटुंब पद्धतीत आदाटे यांची जडणघडण झाली. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण वांद्रे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये झाले. १९९० साली सिव्हील इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतर ते नोकरीच्या शोधात होते. नोकरीसाठी 'म्हाडा' कार्यालयात गेल्यावर त्यांची ओळख तेथील एका अधिकार्‍यांशी झाली. अगदी नवख्या मुलातील सुप्त गुण त्या अधिकार्‍याने हेरले आणि आदाटेंना ‘नोकरीऐवजी व्यवसाय कर,' असा सल्ला दिला. प्रसंगी केवळ सल्ला न देता, त्यांनी आदाटेंना एक कंत्राट पूर्ण करण्यासाठी दिले. कोणतीही उद्योजकतेची पार्श्वभूमी नसताना वडिलांच्या पाठिंब्यामुळे आदाटेंनी हे कंत्राट पूर्ण केले. योगायोगाने इंजिनिअरिंगच्या निकालाच्या दिवशीच या कंत्राटाचे पैसे त्यांना मिळाले आणि त्यांच्यातील उद्योजकाच्या प्रवासाला सुरुवात झाली.
 
 
स्वत: सिव्हील इंजिनिअर असलेल्या आदाटे यांनी शिक्षणानंतर थेट उद्योग क्षेत्रामध्येच प्रवेश केला. त्यांच्या 'जय एंटरप्रायझेस' आणि 'ग्रीन स्काय डेव्हलपर्स' या कंपन्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. आदाटे यांना बांधकाम क्षेत्रात काम करण्याचा ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. 'जय एंटरप्रायझेस' ही कंपनी बांधकाम किंवा दुरुस्ती संदर्भातील शासकीय कंत्राट स्वीकारून ते पूर्ण करण्याचे काम करते. 'ग्रीन स्काय डेव्हलपर्स' या कंपनीअंतर्गत कर्जत येथे ‘हॉलिडे होम'चे प्रकल्प उभारण्यात येतात. संपूर्णपणे कामगारांवर अवलंबून असणार्‍या बांधकाम उद्योगाला ‘लॉकडाऊन'चा फटका सर्वप्रथम बसल्याचे आदाटे सांगतात. कोरोनाचे संकट हे जगासाठी नवीन होते. त्यामुळे नेमके काय घडते आहे, याचा अंदाज कोणालाच नव्हता. त्यामुळे या परिस्थितीत 'वेट अ‍ॅण्ड वॉच'ची भूमिका आदाटे यांनी घेतली.
 
 
‘लॉकडाऊन'मुळे अन्य राज्यांतील कामगार वर्ग त्यांच्या गावी परतू लागला होता. अशावेळी आदाटे यांच्याअंतर्गत काम करणार्‍या १०० ते १५० कामगारांना दिलासा देऊन त्यांना मुंबईतच थांबविण्यात आले. दोन महिने या सर्व कामगारांची त्यांनी काळजी घेतली. जून महिन्यात ‘लॉकडाऊन'च्या नियमांमध्ये थोड्या प्रमाणात शिथिलता आली. त्यामुळे ‘म्हाडा', रेल्वे अशा सरकारी संस्थांच्या इमारतींच्या दुरुस्तीची कामे अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने ती सुरू झाली. त्यासाठी कामगारांची आवश्यकता भासली. आदाटेंनी दोन महिने कामगारांची काळजी घेतल्याने कामगार वर्ग त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि कामाला सुरुवात झाली. या काळात शासनाशी जोडलेले अनेक अन्य राज्यातील कंत्राटदार परतल्याने वा त्यांचा शासकीय कार्यालयांशी संपर्क तुटल्याने संधी निर्माण झाली होती. हीच संधी अचूकपणे हेरुन आदाटेंनी कामाला सुरुवात केली. स्पर्धा कमी झाल्याने अनेक कामे त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांच्याशी जोडलेल्या कामगारांचाही फायदा झाला.
 
 
 

CG  _2  H x W:  
 
 
‘लॉकडाऊन'च्या काळात अनेक कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या गेल्या किंवा कंपन्या बंद पडल्या. मात्र, आदाटे यांच्या कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा आपल्या वरिष्ठांवर विश्वास होता. याच विश्वासाला सार्थकी लावत त्यांनी आपल्या एकाही कर्मचार्‍याला कामावरून कमी केले नाही. उलटपक्षी कर्मचार्‍यांना एप्रिल-मे महिन्याचा अर्धा पगार आणि जून महिन्यापासून पूर्ण पगार दिला. जून महिन्यात कंपनीचे कामकाज सुरू झाल्यावर जवळ राहणार्‍या कर्मचार्‍यांना अत्यावश्यक सेवेचा पास उपलब्ध करून दिला. शिवाय त्यांना टॅक्सी किंवा रिक्षाने ऑफिसला येण्याबरोबरच बांधकाम साईटवर जाण्याची सोय करून दिली. तसेच कामावर न येऊ शकणार्‍या कर्मचार्‍यांना घरूनच काम करण्याची मुभा दिली.
 
 
बहुतांश मराठी कुटुंबांमध्ये व्यवसाय म्हणून उद्योगाची पार्श्वभूमी नसते. बरीच मराठी मुले नोकरी करण्याच्या दृष्टीने हालचाल करताना दिसतात. शिक्षणदेखील नोकरी करण्याच्या अनुषंगानेच ठरवले जाते आणि नोकरीची हमी असेल, अशाच कोर्समधून शिक्षण घेण्याकडे अधिक कल असतो. त्यामुळे उद्योग क्षेत्रात अधिकाधिक तरुण मुलांनी सहभागी होऊन त्यांना घडवण्यासाठी 'बीएसएस' या ट्रस्टच्या माध्यमातून आदाटे हे प्रयत्नशील आहेत. या ट्रस्टचे ते ‘मॅनेजिंग ट्रस्टी' आहेत. ट्रस्टच्या साहाय्याने ते तरुणांमध्ये उद्योगाबाबत प्रबोधन करतात. या उपक्रमामधून अनेक तरुणांना उद्योगाची संधी देण्यात आली आहे. २०३० पर्यंत दहा लाख तरुण मुलांपर्यंत पोहोचून त्यामधून दहा हजार नवीन उद्योजक घडविण्याचे ध्येय ट्रस्टच्या साहाय्याने आदाटेंनी निश्चित केले आहे.
 
 
‘लॉकडाऊन'च्या काळात सकारात्मक राहण्यासाठी आदाटेंना आपल्या उद्योजक मित्रांची मोलाची साथ लाभली. उद्योजक हा सकारात्मक असला तरच त्याची भरभराट होते. ‘लॉकडाऊन'मधील नकारात्मक घटनांमुळे उद्योजकांचा आत्मविश्वास ढासळत होता. हा आत्मविश्वास पुन्हा उभा करण्यासाठी उद्योजकांचे संघ कार्यरत होते. 'सॅटर्डे ग्रुप'च्या माध्यमातून आदाटेंना या काळात सकारात्मक राहण्यास मदत मिळाली. या ग्रुप्रचे मार्गदर्शक विनीत बनसोडे यांनी उद्योजकांना ऑनलाईन बैठकांच्या माध्यमातून सकारात्मकेचे संदेश दिले. याशिवाय ‘लॉकडाऊन'च्या काळात आपल्या उद्योगाला आणि कार्यालयीन कामकाजाला तांत्रिक जोड देण्याचा धडाही आदाटेंना मिळाला आहे.
 
 
उद्योजक म्हटले की, आव्हाने ही ओघाने आलीच. गेल्या ३० वर्षांच्या कार्यकाळात आदाटेंसमोर अनेक आव्हाने आली. पण, कोणतीही उद्योजकीय पार्श्वभूमी नसल्यामुळे त्यांनी रोजच्या अनुभवांमधूनच त्यावर मात केली आणि ते यापुढेही करत राहतील. पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा...
 
 
"कोणताही उद्योग करताना आर्थिक शिस्त बाळगणे आवश्यक आहे. कठीण परिस्थितीत किंवा संधीनुसार व्यवसायात बदल करणे हे उद्योगातील विश्वासार्हता जपण्यासाठी घातक आहे. सातत्याने व्यवसाय बदलत असाल, तर त्याचा परिणाम तुमच्या गुणवत्तेवर आणि विश्वासार्हतेवर होतो."
@@AUTHORINFO_V1@@