नियोजनबद्ध उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2021   
Total Views |

Kushal Desai  _1 &nb
 
 
२०२०च्या प्रारंभी भारतासह जगभर ओढवलेल्या ‘कोविड’च्या संकटात अनेक उद्योजक भरडले गेले. उद्योगधंद्यांना टाळे लावायची वेळ आली. जून ते डिसेंबर या ‘लॉकडाऊन’च्या काळात ‘अपार’ उद्योग समूहाने उत्पादनाच्या अनुषंगाने अनेक विक्रम मोडले. अशा कठीण प्रसंगात ‘अपार इंडस्ट्रीज लिमिटेड’चे अध्यक्ष कुशल देसाई यांनी अनेकविध समस्या असतानाही, प्रगतीचा गाठलेला टप्पा हा निश्तितच त्यांच्याकरिता एक उपलब्धी आहे. अशा जोखमीच्या परिस्थितीत आपल्या कर्मचार्‍यांच्या साहाय्याने उत्पादनाचे विक्रम मोडणार्‍या कुशल देसाई यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
 
देशात स्पेशालिटी ऑईल, ल्युब्रीकन्ट्स, ट्रान्समिशन लाईन्स, कंडक्टर्स, केबल आणि वायर उत्पादनांमध्ये विश्वासार्हता निर्माण केलेली कंपनी म्हणजे ‘अपार इंडस्ट्रीज लिमिटेड’. १९५८ साली स्व. धरमसिंह डी. देसाई यांनी या कंपनीची स्थापना केली. ऑईल, केबल्स आणि ट्रान्समिशन लाईन्स या तीन उत्पादनांच्या निर्मितीमध्ये कंपनीचा हातखंडा आहे. भारताबरोबर परदेशातही ‘अपार’ उद्योग समूहाच्या कंपन्या कार्यान्वित आहेत. नवी मुंबईतील रबाळे, सिल्वासा आणि दुबईतील हमरिया प्लांटमध्ये कंपनीच्या ‘स्पेशालिटी ऑईल’ आणि ‘ल्युब्रीकन्ट्स निर्मितीच्या कंपन्या आहेत, तर ट्रान्समिशन लाईन्स आणि कंडक्टर्स उत्पादन सिल्वासा आणि ओडिशातील तीन कंपन्यांमध्ये होते. याशिवाय केबल आणि वायर निर्मितीचे कारखाने उमरगाव आणि खत्तलवाडा परिसरात आहेत. ‘उद्याचे निराकरण आज’ या ब्रीदवाक्यासह गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणार्‍या या कंपनीचे सध्याचे वार्षिक उत्पन्न साधारण साडेसात हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
 
 
कुशल देसाई हे ‘अपार इंडस्ट्रीज लि.’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदावर कार्यरत आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले कुशल देसाई वयाच्या साधारण २२व्या वर्षी ‘अपार’ उद्योग समूहामध्ये काम करू लागले. त्यांच्या कामाची सुरुवात विक्री विभागातून झाली. कंपनीच्या उत्पादनाच्या कार्यसीमा विस्तारून ते आज अध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्योग समूहाच्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या काम करणार्‍या साडेपाच हजार कर्मचार्‍यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता होती. मात्र, देसाई आणि त्यांच्या व्यवस्थापन गटाने केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे तसे घडले नाही. ‘इलेक्ट्रिकल प्रोडक्शन आणि डिस्ट्रिब्युशन’ वापरले जाणारे ‘ट्रान्सफॉर्मर ऑईल’ तसेच ‘मेडिकल फ्रॉर्म्युलेशन आणि कॉस्मेटिक’साठी आवश्यक असलेले ‘फार्मास्युटिकल ऑईल’ची निर्मिती ‘अपार’मध्ये होते.
 
 
या प्रकारच्या ऑईलची निर्मिती अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असल्याने सर्वप्रथम देसाई आणि त्यांच्या टीमने या गोष्टींच्या उत्पादनाकडे ‘लॉकडाऊन’च्या काळात आपला मोर्चा वळवला. ‘अपार’च्या मनुष्यबळ विकास आणि सुरक्षा विभागाने नवी मुंबईच्या महानगर आयुक्तांना पत्र लिहून अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणार्‍या तेलांच्या निर्मितीसाठी परवानगी मागितली. आठवडाभरात आयुक्तांनी नवी मुंबईतील रबाळे औद्योगिक वसाहतीमध्ये या तेलांच्या निर्मितीसाठी परवानगी दिली. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाचा मुद्दा लक्षात घेऊन, ही परवानगी देताना केवळ २५ टक्के मनुष्यबळ वापरण्याची अट घालण्यात आली. आता देसाई आणि त्यांच्या टीमसमोर खरे आव्हान होते.
 
 
कारण, तेलांचा पुरवठा करण्यासाठी कंपनीकडे मागणी वाढत होती. अशा परिस्थितीत समाजामध्ये कोरोनाबाबत पसरलेल्या भीतीच्यावातावरणात कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी तयार करण्याचे आव्हान कंपनी प्रशासनासमोर होते. यावेळी देसाई यांनी कर्मचार्‍यांना सुरक्षेची हमी देऊन त्यांना तयार केले. देसाईंच्या मार्गदर्शनांतर्गत कंपनीचा मनुष्यबळ विभाग आणि कर्मचार्‍यांनी मिळून शिस्तबद्ध नियोजित वेळापत्रक तयार केले. यानुसार कर्मचार्‍यांचे विभाजन करून दोन गट करण्यात आले.
 
 
पहिल्या १३ दिवसांसाठी कर्मचार्‍यांचा एक गट कंपनीमध्ये राहून काम करत होता. त्यानंतर पुढील १३ दिवसांसाठी दुसरा गट कार्यरत होणार होता. या संपूर्ण प्रक्रियेसाठी स्थानिक सुरक्षा आरोग्य विभागाची तसेच जिल्हाधिकारी यांची परवानगीही घेण्यात आली. दोन आठवड्यांनंतर पुन्हा कामावर हजर होणार्‍या कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करूनच त्यांना कंपनीमध्ये प्रवेश देण्यात येत होता. सामाजिक अंतराचे पालन करून कशा पद्धतीने कर्मचारी कंपनीमध्ये काम करू शकतात, याविषयी कृती आराखडा तयार करून तो अमलात आणला गेला. कर्मचार्‍यांची झोपण्याची आणि जेवणाची सोय याच पद्धतीने सामाजिक अंतर राखून करण्यात आली.
 
 

APAR  _1  H x W 
 
कोरोनासंदर्भातील जनजागृतीपर लघुपटांची निर्मिती करून कर्मचार्‍यांना खबरदारीचे उपाय घेण्यास सांगितले गेले. अशा पद्धतशीर व्यवस्थापनामुळे एप्रिल महिन्यातच कंपनीची उत्पादन प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. शिवाय, कोरोना संक्रमणापासून सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर नियम पाळल्याने कर्मचार्‍यांनीही कंपनीवर विश्वास ठेवला. त्यामुळे कर्मचार्‍यांनी १५-१६ तासांपर्यंत काम केले. कंपनीतर्फे कामगारांना विशेष सुविधाही देण्यात आल्या होत्या. जसे की, साधारण २५ कामगारांना मोफत पूर्ण दिवसाचा आहार, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, २४ तास वैद्यकीय सुविधा, कारखान्यामध्ये येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची सोय इत्यादी.
 
 
 
 
याव्यतिरिक्त कामगारांची दोन वेळा मोफत कोरोना चाचणीही करण्यात आली. उत्पादन प्रक्रिया सुरू झाली असली, तरी एप्रिल महिन्यात कंपनीसमोर आर्थिक संकट उभे ठाकले होते. कारण, ‘लॉकडाऊन’मुळे ग्राहकांकडून पैसे गोळा करण्यामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. ज्यामुळे आर्थिक प्रवाहाचे चक्र बिघडले. अशा परिस्थितीत बँकेकडून आपत्कालीन निधी घेण्यात आला. मात्र, उत्पादन प्रक्रियेला सुरुवात केल्याने आणि कंपनीचा ताळेबंदही सुस्थितीत असल्याने या निधीचा पूर्ण वापर करण्याची वेळ देसाईंसमोर आली नाही.
 
 
कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) पाळण्याचे बंधन आता कंपन्यांवर आले असले, तरी ‘अपार’ उद्योग समूहाच्या संस्कृतीमध्ये सामाजिक कार्याचा प्रवाह हा गेल्या ६३ वर्षांपासून असल्याचे देसाई सांगतात. कंपनीकडून ‘लॉकडाऊन’च्या काळात ‘अन्नमृता फाऊंडेशन’मार्फत वाडा तालुक्यातील वनवासी बांधवांना जेवणाच्या पाकिटांसोबत वैद्यकीय मदतही ‘सीएसआर’अंतर्गत देण्यात आली. सोबतच या फाऊंडेशनला आवश्यक असणारे सॅनिटायझर आणि सोप सोल्युशनही कंपनीतर्फे पुरविण्यात आले. जे कामगार ‘कोविड’काळाच्या सुरुवातीपासून कंपनीत कामासाठी हजर होते, त्यांचा देसाईंच्या हस्ते मानचिन्ह आणि पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
 
 
‘लॉकडाऊन’च्या कठीण प्रसंगातही उत्तमरीत्या काम केल्याने कर्मचार्‍यांसह प्रशासकीय व्यवस्थापन टीमचाही आत्मविश्वास दुणावल्याचे देसाई सांगतात. सध्या ७५ हून अधिक देशांमध्ये कंपनी आपल्या उत्पादनांची विक्री करत असून ऑनलाईन पद्धतीचा भविष्यात अवलंब करून त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. नवख्या उद्योजकांनी दोन गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम कठीण प्रसंगातील धोके आणि त्यानंतर निर्माण होणार्‍या संधी. कठीण प्रसंगातील समस्यांवर तोडगा काढू शकलात, तर त्यानंतर मोठ्या प्रमाणात संधी चालून येतात.
@@AUTHORINFO_V1@@