समुद्राची लेक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2021   
Total Views |

reshma _1  H x
सागरी संशोधन क्षेत्रात यशाची शिखरे गाठून अपृष्ठवंशीय सागरी जीवांवर संशोधन करणार्‍या ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या शास्त्रज्ञ रेश्मा दिलीप पितळे यांच्याविषयी...


मनाला आनंद देणार्‍या कामातूनच यश मिळत जाते, हे खरंच आहे. महाविद्यालयातील शिक्षकांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे या मुलीला समुद्राची आस लागली. त्याचे पुढे आवडीत आणि त्यानंतर ध्येयात रूपांतर झाले. महाराष्ट्रात दुर्लक्षित राहिलेल्या सागरी संशोधनासारख्या क्षेत्रात तिने काम करण्याचा निर्णय घेतला. त्याला परिश्रम, जिद्द आणि चिकाटीची जोड दिली. सागरी जीवांमधील ‘फ्लॅटवर्म’ म्हणजेच ‘पॉलिक्लयाड’ वर्गासंबंधी काम करणारी ती भारतामधील एकमेव शास्त्रज्ञ असावी. या जीवांवर संशोधन करण्याच्या ध्येयाने तिने अनेक समुद्रकिनारे पालथे घातले. त्यामुळे भारतासाठी ‘पॉलिक्लयाड’च्या अनेक प्रथम नोंदींसोबतच नव्या प्रजातींचा उलगडाही तिने केला आहे. अशी ही समुद्राची लेक म्हणजे सागरी जीवशास्त्रज्ञ रेश्मा पितळे.
ठाण्यामध्ये दि. २५ ऑक्टोबर, १९८६ रोजी जन्मलेला रेश्मा यांचे बालपण नालासोपार्‍यासारख्या छोट्या शहरात गेले. याच ठिकाणी त्यांचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. लहानपणी त्यांना निसर्गाची आवड वगैरे त्यांना नव्हती. मात्र, आठवी-नववीमधील विज्ञानातील ‘जीवशास्त्र’ विषयामध्ये त्यांना रुची निर्माण झाली. या विषयाबाबत एक आकर्षण निर्माण झाल्यानेच महाविद्यालयीन शिक्षणही विज्ञान शाखेमधून घेण्याचा त्यांनी निश्चय केला. पुढे ‘प्राणिशास्त्र’ विषयातील शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन त्यांना लाभले. प्रसिद्ध सागरी संशोधक डॉ. विनय देशमुख आणि नंदिनी देशमुख यांचे मार्गदर्शनही रेश्मा यांना मिळाले. पदवीच्या शेवटच्या वर्षापर्यंत संशोधन क्षेत्रामध्येच काम करण्याचा निश्चय त्यांनी मनोमन पक्का केला. मात्र, त्यांना प्राणी-पक्षी खुणावत नव्हते. देशमुखांमुळे त्यांचा सागरीविषयक संशोधनामध्ये रस निर्माण झाला. त्यातही समुद्रातील अपृष्ठवंशीय प्राणी त्यांना खुणावू लागले. देशमुखांच्या प्रोत्साहनामुळेच रेश्मा यांना सागरी संशोधनाचा मार्ग सापडला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.


पदव्युत्तर परीक्षा दिल्यानंतर रेश्मा यांनी समुद्रकिनारे पालथे घालण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी सापडणार्‍या अपृष्ठवंशीय सागरी जीवांच्या निरीक्षणाचे काम सुरू केले. याचदरम्यान त्यांना वांद्य्राच्या किनार्‍यावर एक ‘फ्लॅटवर्म’ सापडली. याविषयी त्यांनी माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले. त्यावेळी त्यांना ‘फ्लॅटवर्म’ म्हणजेच सागरी जीवांमधील ‘पॉलिक्लयाड’ या गटावर भारतामध्ये फार कमी संशोधन झाल्याचे समजले. किनारे फिरत असताना अनेक प्रकारचे ‘पॉलिक्लयाड’ दिसू लागले. त्यामुळे याच जीवावर संशोधन करण्याचे त्यांनी ठरवले. २०१० साली रेश्मा यांना ‘राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थे’मध्ये नोकरी मिळाली. ‘प्रकल्प साहाय्यक’ या पदावर काम करत असताना त्यांनी प्रत्यक्ष समुद्रामध्ये जाऊन काम केले. साधारण वर्षभर संस्थेत काम केल्यावर त्यांचा परिचय प्रसिद्ध सागरी संशोधक आणि जीवशास्ज्ञ डॉ. दीपक आपटे यांच्याशी झाला. डॉ. आपटे यांनी पितळे यांच्यामधील संशोधक वृत्ती ओळखून त्यांना ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) या संस्थेमध्ये काम करण्यासंदर्भात विचारणा केली. रेश्मा यांनी ही संधी हेरून तातडीने त्यांना होकार कळवला. २०११ सालापासून त्या ‘बीएनएचएस’मध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांना रत्नागिरीच्या किनार्‍यांवर काम करण्याची संधी मिळाली. या किनार्‍यांवरील सागरी जैवविविधतेचे सर्वेक्षण त्यांनी केले. यादरम्यान त्यांनी गुजरातचे किनारेही निरीक्षणाच्या दृष्टीने पालथे घातले. ब्रिटिश प्राध्यापक फ्रँक लेडलॉ यांनी १९०२ मध्ये भारतात सर्वप्रथम ‘पॉलिक्लयाड’ प्रजातीच्या काही नोंदी केल्या होत्या. लक्षद्विप बेटावरून या प्रजातींची नोंद त्यांनी केली होती. डॉ. आपटेंचा लक्षद्विपच्या सागरी जैवविविधतेवर विशेष अभ्यास असल्याने त्यांनी येथील सर्वेक्षणादरम्यान टिपलेली काही ‘पॉलिक्लयाड’ प्रजातींची छायाचित्र रेश्मा यांना दिली. या छायाचित्राच्या आधारे अभ्यास करून रेश्मा यांनी २०११ मध्ये भारतात ‘पॉलिक्लयाड’च्या दहा प्रजाती प्रथमच नोंदविल्या, म्हणजेच जवळपास 100 वर्षांनंतर भारतात ‘पॉलिक्लयाड’च्या अभ्यासाला त्यांनी सुुरुवात केली.


रत्नागिरीतील सर्वेक्षणादरम्यान त्यांनी २०१२-२०१९ दरम्यान वेगवेगळ्या किनार्‍यांवर ‘सायकलोपोरस’ प्रकारातील तीन प्रजातींची नोंद केली. यातील काही प्रजाती त्यांच्या पहिल्या प्रसिद्धीपासून १५-४० वर्षांनंतर जगभरात प्रथमच नोंदवण्यात आल्या. यादरम्यान उंडी गावाजवळच्या समुद्रकिनार्‍यावर ‘फ्लॅटवर्म’ची एक प्रजात सापडली. तिचे शास्त्रीयरीत्या निरीक्षण केल्यानंतर ती विज्ञानाकरिता नवीन असल्याचे त्यांना समजले. २०१९ साली ’स्टायलोस्टोमम मिक्सटोमॅक्युलॅटम’ नामक या नव्या प्रजातीचा शोधनिबंध प्रकाशित झाला. २०१५ मध्ये त्यांना महाराष्ट्रातील सर्व किनार्‍यांच्या सर्वेक्षणाचे काम करण्याची संधी मिळाली. किनार्‍यावरील समस्या त्यांना समजल्या. सोबतच प्रत्येक किनार्‍यावरील समृद्ध जैवविविधतेची नोंद करण्यास मिळाली. नवीन प्रजातीच्या संशोधनाबरोबर रेश्मा यांनी आजवर ‘पॉलिक्लयाड’मधील किमान १५ प्रजातींची भारतामधून प्रथम नोंद केली आहे. सध्या त्या ठाणे खाडीमध्ये संशोधनाचे काम करत आहेत. सागरी संशोधन क्षेत्रामध्ये अजूनही अमाप काम होणे शिल्लक असल्याचे त्या सांगतात. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
@@AUTHORINFO_V1@@