नॅशनल पार्कमधील 'महाराज'ला लावले सेटलाईट काॅलर; बिबट्यांचे विश्व उलगडणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2021   
Total Views |
leopard _1  H x


दोन बिबट्यांना लावले सेटलाईट काॅलर 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील 'रेडिओ टेलिमेट्री प्रकल्पा'अंतर्गत सोमवारी दुसऱ्या बिबट्याला सेटलाईट काॅलर लावण्यात आली. हा बिबट्या नर प्रजातीचा असून त्याचे नामकरण 'महाराज' असे करण्यात आले आहे. मुंबईतील मानव-बिबट्या सहसंबधाचा अभ्यास करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असून यामुळे बिबट्यांचा भ्रमणमार्गही उलगडणार आहे.
 
 
 
 
 

मुंबईत अधिवास करणाऱ्या बिबट्यांविषयीच्या सखोल संशोधन प्रकल्पास सुरुवात झाली आहे. याअंतर्गत बिबट्याच्या गळ्यामध्ये सेटलाईट काॅलर बसवून त्यांचे अधिवास क्षेत्र आणि भ्रमणमार्ग अभ्यासण्यात येत आहेत. वन विभाग आणि 'वाईल्ड लाईफ काॅन्झर्वेशन सोसायटी-इंडिया' ही संस्था 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट'च्या मदतीने हे काम करत आहेत. या संशोधनाअंतर्गत शनिवारी 'सावित्री' नामक मादी बिबट्याच्या गळ्यात सेटलाईट काॅलर लावल्यानंतर सोमवारी एका नर बिबट्याला काॅलर लावण्यात आली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या नागला (वसई) वनपरिक्षेत्रात ही प्रक्रिया पार पडली.
 
 
 
सेटलाईट काॅलर लावलेल्या नर बिबट्याला पकडण्याचे काम गेल्या आठवड्याभरापासून सुरू होते, अशी माहिती राष्ट्रीय उद्यानाचे संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली. शिवजयंतीचे निमित्त साधून कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला 'महाराज' असे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी रात्री या बिबट्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले असून यापुढे डाॅ. विद्या अत्रेय यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत वन्यजीव संशोधक निकीत सुर्वे आणि त्यांची टीम या दोन्ही बिबट्यांच्या हालचालींवर नजर ठेवणार आहेत. 'महाराज' बिबट्याचे प्रथमच छायाचित्रे २०१९ मध्ये कॅमेरा ट्रपिंग प्रकल्पाअंतर्गत टिपण्यात आले होते. राष्ट्रीय उद्यानाचे 'नागला' वनपरिक्षेत्र वसई खाडीच्या पलीकडे असून त्याठिकाणी जाण्यासाठी बिबटे खाडी पोहून जात असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे 'महाराज'ला सेटलाईट काॅलर लावल्याने बिबटे खरचं खाडी पोहून जातात का ? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@