बोरिवली नॅशनल पार्कमधील बिबट्याला लावला 'सॅटलाईट काॅलर'; 'सावित्री' असे नामकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2021   
Total Views |

leopard _1  H x


मुंबईतील मानव-बिबट्या सहसंबधाचा अभ्यास होणार


मुंबई (अक्षय मांडवकर) - 
मुंबईच्या इतिहासामध्ये प्रथमच बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील बिबट्याला 'सॅटलाईट काॅलर' लावण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी उद्यानामध्ये ही प्रक्रिया पार पडली. मुंबईतील मानव-बिबट्या सहसंबधाचा अभ्यास करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रेडिओ काॅलर लावलेला बिबट्या मादी असून तिचे नामकरण 'सावित्री' असे करण्यात आले आहे.

 

leopard _1  H x 
 
 

मुंबईच्या मध्यभागी वसलेल्या राष्ट्रीय उद्यानात ४७ बिबट्यांचे वास्तव्य आहे. यामधील पाच बिबट्यांच्या गळ्यामध्ये सॅटलाईट काॅलर बसवून त्यांचा भ्रमणमार्ग, अधिवास आणि आवास क्षेत्र समजून घेण्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली आहे. या अभ्यासाकरिता २०१९ मध्ये 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' आणि 'वाईल्ड लाईफ काॅन्झर्वेशन सोसायटी-इंडिया' या संस्थेमध्ये सामंजस्य करार झाला होता. त्यानंतर या प्रकल्पाला प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र यांची परवानगीही मिळाली होती. 'वन्यजीव संरक्षण कायद्या'च्या प्रथम क्षेणीमध्ये बिबट्या हा प्राणी संरक्षित आहे. त्यामुळे सॅटलाईट काॅलर लावण्यासाठी बिबट्याला पकडण्याकरिता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगी मिळाल्यानंतर या अभ्यासाला सुरुवात झाली आहेशनिवारी सायंकाळी वन्यजीव संशोधक डाॅ. विद्या अत्रेय यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत एका मादी बिबट्याला पकडून सॅटलाईट काॅलर लावण्यात आले. यावेळी उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे, वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्टचे (डब्लूसीटी) पशुवैद्यक डाॅ. प्रशांत देशमुख आणि वन्यजीव संशोधक निकीत सुर्वे उपस्थित होते. 'डब्लूसीटी' ही संस्था या अभ्यासाकरिता तांत्रिक मदत करत आहे. 
 
 
येत्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रीय उद्यान आणि त्याला लागून असलेल्या शहरी भागाच्या आसपास वावर करणार्या अजून दोन मादी आणि दोन नर बिबट्यांना सॅटलाईट काॅलर लावण्यात येईल. त्यानंतर या बिबट्यांचा दोन वर्ष अभ्यास केला जाईल. मानव आणि बिबट्या यांचे परस्पर संबंध कसे निर्माण होतात. तसेच बिबटे हे मानवी जीवनासोबत कसे जुळवून घेतात, यासंबंधीचा अभ्यास या शोधकार्यातून करण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील बिबटे तेथील जागेचा वापर कसा करतात तसेच त्यांचे भ्रमण कसे होते, याबाबत या अभ्यासातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या अभ्यास प्रकल्पाचे वन विभागामार्फत अपर प्रधान वनसंरक्षक सुनील लिमये आणि 'वाईल्ड लाईफ काॅन्झर्वेशन सोसायटी-इंडिया' मार्फत डॉ. विद्या अत्रेय या मार्गदर्शन आणि कामकाज पाहणार आहेत.
 
 
 

सावित्री बाईंवरुन नामकरण
भारतातील थोर समाजसुधारक आणि पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या नावावरुन सॅटलाईट काॅलर लावलेल्या मादीचे नामकरण 'सावित्री' असे करण्यात आले आहे. आम्हाला आशा आहे, की हा सावित्री सुद्धा मुंबईच्या बिबट्यांविषयीचे आमचे अज्ञान दूर करुन त्यांच्या संवर्धनाचा मार्ग दाखवेल. येत्या काही दिवसांमध्ये आम्ही एका नर बिबट्याला सॅटलाईट काॅलर लावण्याच्या तयारीत आहोत - जी. मल्लिकार्जुन, मुख्य वनसंरक्षक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

 

सॅटलाईट काॅलर लावल्यानंतर तीन वर्षांच्या 'सावित्री'ला शनिवारी रात्री पुन्हा जंगलात सोडण्यात आले आहे. पुढल्या कालावधीत या मादी बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. - डाॅ. विद्या अत्रेय, वन्यजीव संशोधक, डब्लूसीएस-आय
 

 

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
1)
बिबट्या आणि माणसे एकमेकांशी कशाप्रकारे जुळवून घेत आहेत
2)
बिबटे घोडबंदर रोडसारखे मोठे रस्ते कसे ओलांडतात हे जाणून घेणे
3)
राष्ट्रीय उद्यानातील भूप्रदेशाचा वापर बिबटे कशाप्रकारे करतात, याची माहिती मिळवणे
4)
बिबट्यांचा भ्रमणमार्ग आणि मानव-बिबटे यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

@@AUTHORINFO_V1@@