मुंबईच्या कांदळवनांचे रक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2021   
Total Views |

Suresh varak_1  
 
 
 
मुंबईच्या नैसर्गिक सुरक्षेची भिस्त असणाऱ्या कांदळवनांच्या रक्षणासाठी कार्यरत असणारे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश धोंडीराम वरक यांच्याविषयी...
 
बेताच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमधून उभारी घेऊन आज वन विभागाचा खाकी गणवेश परिधान केलेला हा वन अधिकारी. गेल्या १९ वर्षांपासून ते वन विभागात कार्यरत आहेत. कोयनेतील दुर्गम जंगलाच्या संरक्षणापासून सुरू झालेला त्यांचा वनप्रवास आज मुंबईत संकटात सापडलेल्या कांदळवनांच्या संरक्षणापर्यंत येऊन पोहोचला आहे. असे हे कांदळवनांचे रक्षक म्हणजे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक.
 
 
 
वरक यांचा जन्म दि. ११ मे, १९७९ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गसंपन्न अशा राधानगरी तालुक्यात झाला. घनदाट जंगलामध्येच गाव असल्याने त्यांचा वेळ निसर्गासोबतच जात असे. प्राथमिक शिक्षण राधानगरीमध्येच झाले. वरक हे दोन वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरची परिस्थिती तशी बेताची होती. राधानगरी अभयारण्याच्या विस्तारात त्यांचे गाव विस्थापित झाले. विस्थापनानंतर वरक कुटुंबीय कागल मध्ये राहू लागले. याठिकाणी माध्यमिक शिक्षण आणि कला शाखेतून पदवीपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण वरक यांनी पूर्ण केले. जंगलच जवळचे असल्याने २००१ च्या वन विभागाच्या वनरक्षक आणि वनपालपदाच्या भरती प्रक्रियेमध्ये ते सहभागी झाले. योगायोगाने त्यांची वनपालपदासाठी निवड झाली. वरक यांनी वर्षभर प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणांती त्यांची प्रथम नियुक्ती २००२ साली ’कोयना वन्यजीव अभयारण्या’त झाली. त्याकाळी अतिशय दुर्गम असलेल्या या भागात वनरक्षणाचे काम करणे कठीण आणि जोखमीचे होते. दळणवळणाचे साधन नसल्याने वरक आणि त्यांचे सहकारी कोयना खोऱ्यातील जलाशयामधून बोटीच्या साहाय्याने जंगलात जायचे. बोटीच्या इंजिनचे डिझेल, खाद्यसामुग्रीचा लवाजमा सोबत ठेवून सात-आठ दिवस जंगलामध्येच वास्तव्य करून वन आणि वन्यजीव रक्षणाचे काम करायचे. कोयना अभयारण्यात काम करताना वरक यांनी दुर्गम जंगलातून होणारी तमालपत्राची तस्करी उघडकीस आणली. तसेच वरिष्ठांच्या मदतीने वन्यजीवांची शिकार करण्यासाठी मध्य प्रदेशामधून घाटक्षेत्रात येणाऱ्या शिकारी टोळीच्या मुसक्या आवळल्या. या माध्यमातून १२ ते १३ आरोपींना अटक केली. २००३ मध्ये त्यांची बदली दापोली प्रादेशिक वन विभागात वनपाल पदावर झाली. या ठिकाणी चार वर्षे काम केल्यानंतर २००७ मध्ये त्यांना मुंबईत काम करण्याची संधी मिळाली. ठाणे वनवृत्ताच्या मुंबई वनपरिक्षेत्रामध्ये बोरिवली विभागात त्यांची नियुक्ती झाली. या ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी गोराई-मनोरी या भागातील महसूल विभागांतर्गत असणाऱ्या कांदळवन क्षेत्राच्या हस्तांतरणाचे काम केले. या परिसरातील खाडी क्षेत्रालगतचे कांदळवन क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात घेण्यात आले. २०१० मध्ये त्यांची बदली कुर्ला वनपरिक्षेत्रामध्ये झाली. २०१३ मध्ये वरक यांना पदोन्नती मिळाली आणि वनपरिक्षेत्र अधिकारी या पदावर ते भंडाऱ्यातील ’जंगल कामगार संस्थे’त रुजू झाले.
 
 
’जंगल कामगार संस्थे’च्या व्यवस्थापनाचे काम पाहण्यासाठी वन विभागाने वरक यांची नियुक्ती त्यााठिकाणी केली. वर्षभर संस्थेच्या व्यवस्थापनाची धुरा सांभळल्यावर त्यांची बदली शहापूर वन विभागातील खर्डी वनपरिक्षेत्रामध्ये झाली. या ठिकाणी वनसंवर्धन, मृदा संवर्धनाच्या कामाबरोबरच वन्यजीव संरक्षणाचे कामही झाले. यादरम्यान खर्डीतील एका वनवासी पाड्यातील पाच वर्षांच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर या बिबट्याने पाड्यातील अनेक नागरिकांवर हल्ला केला. त्यामुळे बिबट्याला मारण्याची संमती वन विभागाकडून मिळाली. मात्र, वरक यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने बिबट्याला मारण्याऐवजी जीवंत पकडण्याचा निश्चय केला. त्यासाठी दीड महिने अथक प्रयत्न केले. १३ पिंजरे लावून निरनिराळ्या क्लुप्त्या लढवल्यानंतर अखेरीस बिबट्या जेरबंद झाला. मात्र, यादरम्यान संतप्त झालेल्या वनवासींनी वरक आणि इतर कर्मचाऱ्यांवर हल्ले चढविले, त्यांच्या घरावर दगडफेक केली. अशा परिस्थितीतही न डगमगता वरक आणि सहकाऱ्यांनी बिबट्याला यशस्वीपणे जीवंत जेरबंद केले. २०१६ साली वरक यांची बदली दापोली वनपरिक्षेत्रात झाली. याठिकाणी काम करताना खैराच्या अवैध वाहतुकीवर लगाम लावण्याचे काम त्यांनी केले. शिवाय वन्यजीव गुन्हे विषयक साधारण १३ प्रकरणांचा उलगडा केला. त्याअंतर्गत अनेक गाड्या, बंदुका जप्त केल्या. तालुक्याचे वृक्ष अधिकारी म्हणून २०० विनापरवाना वृक्षतोडीच्या प्रकरणांवर कारवाई केली. याकाळात वरक यांनी समुद्री कासव संवर्धनाचे काम केले. ‘वेळास कासव महोत्सवा’च्या धर्तीवर आंजर्ल्यातील तरुणांच्या मदतीने कासव महोत्सवाला सुरुवात केली. कोळथरे किनाऱ्यावरदेखील अशाच प्रकारचा उपक्रम सुरू केला. २०१९ साली त्यांची बदली ’कांदळवन कक्षा’च्या मध्य मुंबई वनपरिक्षेत्र अधिकारीपदी झाली. सध्या ते या क्षेत्रात कांदळवन संरक्षणाचे काम करत आहेत. गेल्या काही कालावधीत त्यांनी छेडा नगर आणि त्या आसपासच्या परिसरातील वनजमिनींवर अवैधरित्या उभारलेल्या ७०० हून अधिक झोपड्यांवर हातोडा मारला आहे. त्याशिवाय ससून डॉकवर घडलेल्या व्हेल शार्क शिकार प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, नुकतेच त्यांनी वडाळा-माहुल भागातील कांदळवनांवर भराव टाकणाऱ्या कुख्यात आरोपींना गजाआड केले आहे. यासाठी ’कांदळवन कक्षा’चे प्रमुख विरेंद्र तिवारी आणि उपवनसंरक्षक निनू सोमराज यांचा पाठिंबा असल्याचे ते सांगतात. वरक यांना पुढील वाटचालीकरिता दै. ’मुंबई तरुण भारत’ कडून शुभेच्छा !
 
@@AUTHORINFO_V1@@