सोनगाव - कोकणातील 'मगरींचे गाव'; क्रोकोडाईल सफारी आणि बरचं काही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2021   
Total Views |
crocodile village _1 


वाशिष्ठी नदीच्या तीरावर वसलेले सोनगाव हे ‘मगरींचे गाव’ म्हणून नावारुपास येत आहे. गावातील मगरींचा अधिवास जगाच्या नकाशावर आणून गावात शाश्वत निसर्ग पर्यटन सुरू करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यामुळे गावकर्‍यांना रोजगार मिळणार असून पर्यावरणपूरक पर्यटनाचे उदाहरणही समाजासमोर उभे राहणार आहे.

 
 
 
कांदळवन आधारित रोजगार
 
महाराष्ट्र शासनाने २० सप्टेंबर, २०१७ पासून महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये ‘कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण’ ही योजना सुरू केली. ’कांदळवन कक्षा’च्या ’मँग्रोव्ह फाऊंडेशन’अंतर्गत ही योजना गावांमध्ये तयार केलेल्या ’कांदळवन सह-व्यवस्थापन समिती’च्या मार्फत राबवली जाते. या योजनेमध्ये गटामार्फत राबविण्यात येणार्‍या उपक्रमांना ९० टक्के अनुदान मिळते, तर वैयक्तिक प्रकल्पाला (एक एकरपेक्षा जास्त खासगी कांदळवन जमीन असणार्‍या मालकांना) ७५ टक्के अनुदान मिळते. २०१७ ते २०१९ या वर्षांमध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील १०९ गावे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवडली गेली आहेत. यामध्ये लाभार्थ्यांची संख्या साधारण २,८४२ आहे. समित्यांमधील लोकांना जिताडा, खेकडा, कालवे, शिंपले पालन, शोभिवंत मत्स्यशेती आणि निसर्ग पर्यटनाचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येते. ’मँग्रोव्ह फाऊंडेशन’ने महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रात निसर्ग पर्यटनाची क्षमता असणारी काही ठिकाणे शोधली आहेत. याठिकाणी नौकास्वारी, निसर्गभ्रमंती, न्याहारी निवास, पारंपरिक जेवण इ. उपक्रम सुरू केले आहेत.
 
 
 
सोनगाव
  
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सोनगाव हे छोटेसे गाव आहे. हे गाव वाशिष्ठी नदीच्या काठावर वसलेले आहे. वाशिष्ठी नदी पश्चिम घाटातील तिवरा येथून उगम पावते आणि अरबी समुद्राला येऊन मिळते. सोनगाव येथील वाशिष्ठ नदीच्या प्रदेशात भरतीमुळे समुद्राचे पाणी खाडीत येते. याठिकाणी गाळामुळे तयार झालेली बेटं असून त्यामध्ये गोड्या पाण्यातील मगरींचा अधिवास आहे. या मगरी कांदळवनांमध्ये राहतात आणि त्याचठिकाणी घरटी बांधतात. मगरींचा हा अधिवास निसर्ग पर्यटनाचे प्रमुख आकर्षण आहे. ’मँग्रोव्ह फाऊंडेशन’ने सोनगावमध्ये खाडीला लागून असलेल्या भोईवाडीत ’कांदळवन सह-व्यवस्थापन समिती’ची स्थापना केली आहे. याठिकाणी मगर हा आकर्षणाचा विषय असल्याने निसर्ग पर्यटनाच्या अनुषंगाने या गावाची निवड करण्यात आली आहे.
 
 

crocodile_1  H  
 
 
कांदळवन
  
सोनगावच्या खाडीमध्ये समृद्ध जैवविविधता लाभलेले कांदळवनांचे जंगल आहे. खाडीच्या दोन्ही बाजूला कांदळवनांचे दाट पट्टे असून खाडीत असणार्‍या गाळाच्या बेटांवरदेखील कांदळवने आहेत. आकडेवारीनुसार, या परिसरात एकूण २८.०१ हेक्टर क्षेत्रांवर कांदळवन पसरलेले आहे. त्यामधील २०.९३ हेक्टर क्षेत्राला ’वन कायद्या’च्या ‘कलम २०’अंतर्गत राखीव वनक्षेत्राचा अंतिम दर्जा मिळाला आहे. उर्वरित ७.०१ हेक्टर क्षेत्र ‘कलम ४’अंतर्गत प्रस्तावित करण्यात आले आहे. याठिकाणी कांदळवनांची ‘नॅरो-लिव्ह्ड कॅन्डेलिया’ (कांदळ) या प्रजातीची झाडे मोठ्या संख्येने आहेत. त्याशिवाय ‘ग्रे मँग्रोव्ह’ (तिवर), ‘सोनोरेशिया मँग्रोव्ह’ (सोनचिप्पी), ‘मिल्की मँग्रोव्ह ’(गेवा,हुरा) आणि ‘इंडियन मँग्रोव्ह’ (भारतीय तिवर) प्रजातींचीही कांदळवने आहेत. कांदळवन प्रदेशाला लागून ‘हॉली’(काटेरी, मरांडी), ‘मँग्रोव्ह फर्न’ (कांदळवन नेचे), ‘पोंगामियापिनाटा’, ‘कॉमन डेरिस’ आणि ‘मँगो-पाईन’ या प्रजाती आढळून येतात.
 
 
नॅरो-लिव्ह्ड कॅन्डेलिया
 
सोनगाव खाडीत आढळणारी कांदळवनांची ९० टक्के झाडे ही ’नॅरो-लिव्ह्ड कॅन्डेलिया’ म्हणजे ’कांदळ’ प्रजातीची आहेत. एखाद्या सैनिकी तुकडीसारखी खाडीच्या दोन्ही बाजूंना एका रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने उभी असलेली ही झाडे सुंदर दिसतात. महत्त्वाचे म्हणजे, ही झाडे निसर्गत: शिस्तबद्ध पद्धतीने एका ओळीत उगवलेली आहेत. कारण, ही कांदळवने प्रामुख्याने नैसर्गिक पद्धतीने नदीमुखाशी असलेल्या गाळामध्ये प्रवाहाच्या किनार्‍यावर वाढतात. मुख्यत्वे अनुप्रवाही, भरती-ओहोटीच्या क्षेत्रात आढळतात. कांदळाची झाडे साधारण चार ते आठ मी. उंच वाढलेली अवस्तंभ आणि आधारमुळे असलेली असतात. त्याचे खोड सच्छिद्र आणि जमिनीजवळ रूंद असते. या वृक्षाची हिरवी पाने लंबगोल-आयताकृती आकाराची संमुख रचनेत असतात. पांढर्‍या रंगांच्या फुलांमध्ये अनेक पुंकेसर असतात. कलिकेच्या देठापाशी अरुंद दंडाकृती अंदाजे ४० सेंमी लांब आणि टोकांना मागे वळलेल्या निदलपुंजांचे टोपीसारखे आवरण असते.
 
 

mangrove _1  H  
 
 
 
मार्श क्रोकोडाईल
 
 
सोनगावच्या खाडीतील निसर्ग पर्यटनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथील मगरी. या खाडीत गोड्या पाण्यात ’क्रोकोडिलस पॅल्युस्ट्रिस’ म्हणजेच ’मार्श’ प्रजातीच्या मगरी आढळतात. गोड्या पाण्यातील मगर सुमारे ४ ते ५ मी. लांब असते. पूर्ण वाढ झालेल्या मगरीचे वजन २००-२५० किग्रॅ. असते. डोके, मान, धड आणि शेपटी असे तिच्या शरीराचे भाग असतात. सोनगावच्या खाडीत मगरींच्या विणीच्या जागाही आहेत. येथील गाळाच्या बेटांवर त्या अंडी घालून पिल्लांना जन्म देतात. विशेष म्हणजे, या ठिकाणी मगरींनी आजवर एकाही माणसावर हल्ला न केल्याची माहिती येथील ’कांदळवन सहव्यवस्थापन समिती’चे अध्यक्ष राजाराम दिवेकर यांनी दिली.
 
 
क्रोकोडाईल सफारी
  
मगरींच्या आकर्षणामुळे सोनगावमध्ये ’मँग्रोव्ह फाऊंडेशन’च्या मार्फत ’क्रोकोडाईल सफारी’ सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. याठिकाणी रत्नागिरीचे विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पाटील, फाऊंडेशनचे साहाय्यक संचालक (निसर्ग पर्यटन) वंदन झवेरी, उपजीविका साहाय्यक अभिनय केळस्कर आणि प्रकल्प समन्वयक गौरांग यादव यांच्याकडून प्रकल्पाचे नियोजन सुरू आहे. येत्या एप्रिल महिन्यापर्यंत सोनगावच्या खाडीत ’क्रोकोडाईल सफारी’साठी ’मँग्रोव्ह फाऊंडेशन’कडून दहा आसनी बोट चालू करण्यात येईल. मात्र, त्यापूर्वी स्थानिकांच्या यांत्रिक बोटींच्या माध्यमातून आपण मगरींना पाहण्याचा आनंद लुटू शकतो. या ठिकाणी ‘क्रोकोडाईल सफारी’ ही प्रामुख्याने आहोटीच्या वेळी करता येते. यावेळी दलदलीवर उन्हामध्ये शेकत बसलेल्या मगरींना पाहण्याचा आनंद लुटता येतो. एका फेरीमध्ये जवळपास ६० ते ७० मगरींचे दर्शन आपल्याला घडते. सोबतच पक्षीनिरीक्षण आणि कांदळवन सफरही करता येते. पर्यटकांना गावामध्ये राहण्यासाठी ’होम स्टे’सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी गावातील दहा घरे तयारही झाली असून याठिकाणी राहून पर्यटकांना स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेता येईल. या सर्व उपक्रमांसाठी पर्यटकांकडून पैसे आकारण्यात येणार असल्याने गावकर्‍यांना रोजगार मिळणार आहे.
 
 

crocodile_1  H  
 
 
 
वाळू उपसा
  
सोनगाव खाडीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेला वाळू उपसा येथील कांदळवन अधिवासाच्या मुळावर उठला आहे. बेसुमार पद्धतीने किनार्‍यानजीक सुरू असलेल्या वाळू उपशामुळे येथील बेटांवरील कांदळवने उन्मळून पडू लागली आहेत. यामुळे मगरींचा अधिवासही संकटात सापडला आहे. सोनगावच्या भोईवाडीतील ग्रामस्थांचा वाळू उपशाला विरोध आहे.
 
 
कसे जाल ?
 
सोनगावला जाण्यासाठी चिपळूण हे जवळचे रेल्वे स्थानक आहे. रस्त्याने जायचे झाल्यास मुंबई-गोवा महामार्गावर खेड-चिपळूण तालुक्याच्या सीमेवरील लोटे फाट्यावरून नऊ किलोमीटर अंतरावर सोनगाव आहे. गावात जाण्यासाठी रिक्षाची सोयदेखील आहे.
 
 
 
निसर्ग पर्यटनाचे आकर्षण
 
१) क्रोकोडाईल सफारी
२) पक्षी निरीक्षण
३) कांदळवन सफर
४) सूर्यास्त दर्शन
५) कांदळवन रोपवाटिका
 
 
 
भेटीसाठी संपर्क
 
अभिनय केळस्कर 9404765675
गौरांग यादव 8108076200
राजाराम दिवेकर 8421992724
 
 
@@AUTHORINFO_V1@@