कोल्हापूरातील वन्यजीवांचा रक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2021   
Total Views |

Santosh Walvekar
 
 
कोल्हापूर वन विभागात कार्यरत राहून शहरी आणि ग्रामीण भागातील वन्यजीवांचा तारणहार ठरलेले पशुवैद्यक डॉ. संतोष भिकाजी वाळवेकर यांच्याविषयी...
मानवी वस्तीत अडकलेल्या एखाद्या वन्यजीवाची सुटका करण्याचे काम करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच. हेच शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान या पशुवैद्यकाने स्वीकारले. शहरातील पशुवैद्यकीय शिक्षणात प्राणी उपचारादरम्यान अवगत केलेली आधुनिक तंत्र हा पशुवैद्यक कोल्हापूर-सांगलीच्या ग्रामीण भागातील प्राण्यांना जीवदान देण्यासाठी अमलात आणतो. रोजच त्यांचा सामना वन्यजीवांशी होतो. पण, मोठ्या शिताफीने ते या प्राण्यांना जीवदान देतात. संपूर्ण आयुष्य प्राण्यांसाठी काम करण्याचे व्रत घेतलेला हा माणूस सर्वार्थाने पश्चिम महाराष्ट्रातील वन्यजीवांचा तारणहार ठरला आहे. येथील गवे, बिबटे, साप, मगरी, हत्ती यांच्यासह असंख्य प्राण्यांची ’नस’ पकडणारा हा पशुवैद्यक म्हणजे डॉ. संतोष वाळवेकर...
 
 
डॉ. वाळवेकरांचा जन्म दि. १८ डिसेंबर, १९८७ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. त्यांचे वडील हौसेपोटी ’डॉग शो’मध्ये कुत्र्यांना हाताळण्याचे काम करायचे. त्यामुळे घरात पाळीव प्राण्यांचा कायमच राबता होता. यामुळे डॉ. वाळवेकरांची प्राण्यांसोबत जवळीक निर्माण झाली. त्यांचे शिक्षण कोल्हापूरमध्येच झाले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणानंतर करिअरची वाट निवडताना मात्र त्यांनी आपल्या आवडीची निवड केली. मोठे बंधू वैद्यकीय क्षेत्रात असल्याने, डॉ. वाळवेकरांनी आपल्या प्राणीप्रेमामुळे पशुवैद्यकीय क्षेत्रामध्येच करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्यांनी शिक्षणास सुरुवात केली. ‘व्हेटनरी सर्जरी’ आणि ‘रेडिओलॉजी’ या विषयातील पदव्युत्तर शिक्षणादरम्यान त्यांना खऱ्या अर्थाने प्राण्यांना प्रत्यक्षात हाताळून त्यांच्यावर उपचार करण्याची संधी मिळाली. याच अनुभवादरम्यान त्यांच्यासमोर वन्यजीवांना हाताळून त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रसंग आला. पहिल्याच प्रसंगात त्यांना जखमी सिंहावर उपचार करण्याची संधी लाभली. त्यानंतर कासव, ससे अशा प्राण्यांवर उपचार केले. या अनुभवादरम्यान त्यांनी वन्यजीव उपचारातील निरनिराळ्या आधुनिक पद्धती अवगत करुन घेतल्या, ज्याचा उपयोग त्यांना कोल्हापूर वनवृत्तातील कामात झाला.
 
 
२०१७ साली शिक्षण पूर्ण करुन आणि थोडाफार अनुभव गाठीशी बांधून डॉ. वाळवेकर पुन्हा कोल्हापूरमध्ये परतले. तिथे त्यांनी स्थानिक सेवाभावी संस्थांच्या मदतीने भटकी कुत्री आणि जखमी प्राण्यांवर उपचार करण्याचे काम मोफत सुरु केले. शिवाय प्राण्यांसाठी विविध ठिकाणे आरोग्य शिबिरे, रेबीज कॅम्प आणि निर्बिजीकरण कॅम्प आयोजित केले. दरम्यानच्या काळात २०१८ साली त्यांना ‘कोल्हापूर फॉरेस्ट सर्कल’चे पशुवैद्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि सध्या ते याच पदावर कार्यरत आहे. वन विभागात काम करण्यास सुरुवात केल्यावर डॉ. वाळवेकरांसमोर आव्हान होते, ते म्हणजे वन्यजीव बचावकार्याचे. खासकरुन मानव-वन्यजीव संघर्षात अडकलेल्या प्राण्यांना सोडवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे होते. विविध प्रकाराच्या वन्यजीवांना वाचवून त्यांच्यावर उपचार करुन पुन्हा त्यांना निसर्गात सोडण्याचे तंत्र त्यांनी अनुभवानेच अवगत केले. रुजू झाल्यानंतर सुरुवातीलाच त्यांच्यासमोर गव्यांना वाचवण्याचे अवघड काम आले. २०१९ साली कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरावेळी डॉ. वाळवेकरांनी जीवाचे रान करुन आपल्या सहकाऱ्यांसमवेत असंख्य वन्यजीवांचे प्राण वाचवले. महापुरावेळी डॉ. वाळवेकर आणि टीमने एक हजारांहून अधिक वन्यजीवांचे प्राण वाचवल्याची नोंद आहे.
 
 
शहरी शिक्षणादरम्यान अवगत झालेली प्राणी उपचारातील अनेक आधुनिक तंत्र डॉ. वाळवेकरांनी कोल्हापूर वनवृत्तातील कामादरम्यान अमलात आणली आहेत. पंख तुटल्याने जखमी होऊन उडू न शकणाऱ्या पक्ष्यांचे पंख पूर्ववत करण्याची शस्त्रक्रिया त्यांनी कोल्हापूरात केली. महत्त्वाचे म्हणजे, पोहण्याचे पर तुटल्याने जखमी झालेल्या समुद्री कासवाला कृत्रिम पर लावण्यासारखे कौशल्याचे काम डॉ. वाळवेकरांनी केले. डॉ. वाळवेकरांनी केलेल्या या क्लृप्तीची चर्चा त्यावेळी महाराष्ट्रभर झाली. मानव-बिबट्या संघर्षामध्ये अडकलेल्या अनेक बिबट्यांना त्यांनी शिताफीने वाचवले. शिवाय मादी बिबट्यापासून विभक्त झालेल्या कित्येक पिल्लांची पुन्हा आईसोबत पुनर्भेट घडवून आणली. मानव आणि वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखून त्यांनी जनजागृतीही केली. नैसर्गिक अधिवास सोडून मानवी वस्तीनजीक आलेल्या हत्तींना देखील पुन्हा जंगलात सोडण्याचे काम त्यांनी केले. यासाठी हत्तींच्या हालचालींची नोंद घेऊन, त्या हालचालींवर नियंत्रण मिळवून जंगलाच्या दिशेने वळवण्याचे काम त्यांनी केले. यादरम्यान त्यांच्यावर हत्तीने हल्ला देखील केला. मात्र, त्यामधून चलाखीने सुटका करुन डॉ. वाळवेकरांनी स्वत:बरोबर हत्तीला पुन्हा जंगलात धाडून त्याचेही प्राण वाचवले. मानवी वस्तीत भरकटलेल्या गव्यांना वाचवण्यात डॉ. वाळवेकरांचा तर हातखंडाच! गेल्या तीन वर्षांमध्ये त्यांनी २०० हून अधिक गव्यांचा बचाव केला आहे. आज ग्रामीण भागातील वन्यजीवांचे संवर्धन करण्यासाठी डॉ. वाळवेकरांसारख्या तज्ज्ञ पशुवैद्यकाची वन विभागाला गरज आहे, जो निडरपणे वन्यजीवांचा बचाव करुन त्यांच्यावर उपचार करेल. त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!
 
@@AUTHORINFO_V1@@