वनसेवेची निडर पाईक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2021   
Total Views |

Shital Nagarale_1 &n
 
चाकोरीबद्ध आयुष्याच्या पलीकडे जाऊन इच्छाशक्ती आणि कष्टाच्या बळावर आपले वनसेवेचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्याविषयी...
काम कोणतेही असो, त्यासाठी व्यक्तीचे लिंग महत्त्वाचे नसल्याची बाब महिलांनी सिद्ध करून दाखवली आहे. वनविभागासारख्या शारीरिक कष्टाच्या आणि प्रसंगी जीवाची बाजी लावावी लागणाऱ्या विभागात दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आज अनेक महिला अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी कार्यरत आहेत. याच महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एक अधिकारी म्हणजे शीतल नगराळे. लग्न-संसार या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आणि आता त्या सचोटीने वन आणि जनसेवेचे काम करत आहेत.
शीतल नगराळे यांचा जन्म दि. २९ मार्च, १९८६ रोजी धुळे जिल्ह्यातील कापडणेसारख्या छोट्या खेडेगावात झाला. त्यांच्या आई सुनिता नगराळे माध्यमिक शाळेत शिक्षिका होत्या, तर वडील भास्कर नगराळे तलाठी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत होते. कौटुंबिक वातावरण शैक्षणिक गोष्टींना पाठबळ देण्यासाठी सकारात्मक असल्याने शीतल यांची शिक्षणाची पायाभरणी उत्तम झाली. कापडणेसारख्या छोट्याशा गावातच त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर ‘बीएससी’च्या अभ्यासाकरिता त्या धुळ्यात गेल्या आणि तेथूून ‘प्राणिशास्त्र’ विषयामधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीच्या शेवटच्या वर्षात असताना त्यांचे लग्न झाले. पती मनोज साळवेकर आणि सासरच्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांनी पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. आठ महिन्यांची मुलगी असताना त्यांनी जळगाव येथून ‘एन्व्हायर्नमेंटल सायन्स’ या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. उच्च शिक्षणानंतर आपला प्रवास न थांबवता त्यांनी आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन २०१० सालापासून स्पर्धा परीक्षांची तयार सुरू केली.
२०११ साली शीतल स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ‘साहाय्यक कक्ष अधिकारी’, ‘पोलीस उपनिरीक्षक’, ‘प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी’ आणि ‘असिस्टंट इंटेलिजंट ऑफिसर’ या चार पदांसाठी पात्र झाल्या. मंत्रालयातील ‘साहाय्यक कक्ष अधिकारी’ पदावर त्या रूजू झाल्या. मात्र, मुंबईतील वातावरणात तग धरणे शक्य होत नसल्याने त्यांनी ‘प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी’ म्हणून आपली सेवा सुरू केली. दरम्यानच्या काळात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला. २०१४च्या ‘महाराष्ट्र वनसेवे’च्या माध्यमातून त्या वनपरिक्षेत्र अधिकारीपदासाठी पात्र ठरल्या. पात्र, झाल्यानंतर त्या दार्जिलिंगमध्ये प्रशिक्षणाला गेल्या. प्रशिक्षणाअंती त्यांची पहिली नियुक्ती धुळे जिल्ह्यात झाली. पहिल्याच नियुक्तीमध्ये त्यांनी जनजागृती आणि जलसंधारणासंदर्भात महत्त्वाची कामे केली. विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियानाचे आयोजन केले. महत्त्वाचे म्हणजे शीतल यांनी या काळात ‘पाणी फाऊंडेशन’च्या ‘वॉटर कप’ स्पर्धेतही जलसंधारणाच्या कामाकरिता मदत केली. स्वत: आणि आपल्या विभागातील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने या स्पर्धेमध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रामधील सहभागी झालेल्या गावांमध्ये श्रमदान केले. ‘सीड बॉल’सारखी ‘पाणी फाऊंडेशन’ची संकल्पना त्यांनी आपल्या वनपरिक्षेत्रामध्ये श्रमदानाच्या माध्यमातून राबवली. गावकऱ्यांना या श्रमदानासाठी प्रोत्साहन दिले. या सर्व कामाची दखल घेऊन अभिनेता आणि ‘पाणी फाऊंडेशन’चे संस्थापक सदस्य आमिर खान त्यांना स्वत: येऊन भेटले. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांमध्ये वडाच्या झाडांबद्दल त्यांनी जनजागृती केली. महिलांना जवळपास एक हजार वटवृक्षाचे वाटप करून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.
धुळे जिल्ह्यात काम केल्यानंतर शीतल यांची बदली सोलापूर जिल्ह्यातील माळढोक पक्षी अभयारण्याच्या करमाळा वनपरिक्षेत्रात झाली. करमाळ्यात काम करताना त्यांनी विविध पैलूवर काम केले. त्यामधील मानव-वन्यजीव संघर्षाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. मानव-बिबट्या संघर्ष घटनेच्या उद्रेकावेळी त्यांनी संयमाने लोकांमध्ये मिसळून बिबट्याविषयी जनजागृती केली. वाड्या-वस्त्या फिरून लोकांशी संवाद साधला. मध्यरात्री होणाऱ्या गस्त पथकामध्ये त्या सहभागी व्हायच्या. पुन्हा सकाळी वाड्या-वस्त्या गाठून जनजागृती करायच्या. ऊसातील अधिवास करणाऱ्या बिबट्याविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांनी ऊसतोडणी कामगारांशी संवाद साधून त्यांची बाजू ऐकून घेतली. त्या कामगारांना स्वरक्षणाबाबत जागृत केले. स्थानिकांशी संवाद साधून ऊसतोड मजुरांना मुक्कामासाठी उघड्यावर राहण्याऐवजी अनेकांच्या घरात, गच्चीवर, प्राथमिक शाळांमध्ये राहण्याची सोय करून दिली. एक महिला अधिकारी म्हणून मानव-बिबट्या संघर्षावर उपाययोजना करताना सुरुवातीच्या काळात त्यांना विरोध झाला. मात्र, त्यानंतर त्यांची भूमिका सकारात्मक असल्याचे समजल्यावर लोकांचे त्यांना पाठबळ मिळाले.
संकटकाळातून मार्गस्थ झाल्याशिवाय त्यामधून आपल्या गाठी अनुभवाची शिदोरी बांधली जात नाही. त्याचप्रमाणे एक महिला वनाधिकारी समाजाचा दृष्टिकोन वेगळा असला, तरी शीतल यांनी धडाडीने आणि सर्वांना सोबत घेऊन आजपर्यंतचा प्रवास केला आहे. आज वनविभागाला शीतल यांच्यासारख्या महिला अधिकाऱ्यांची गरज आहे. तरच मुलींच्या नव्या पिढीला वनविभागाची पायरी चढण्यास पाठिंबा मिळेल. नुकतीच शीतल यांची बदली चाळीसगाव येथे झाली आहे. बदली झाल्यानंतर तातडीने त्यांनी कामाला सुरुवात केली असून, वनगुन्ह्यांची उकल करण्याचे काम त्या प्राधान्याने करत आहेत. त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!
@@AUTHORINFO_V1@@