विदर्भातील वाघ सह्याद्रीत हलवणार नाही ! उपाययोजनांना मुख्यमंत्र्यांची मान्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2021   
Total Views |
tiger_1  H x W:



मुंबई (अक्षय मांडवकर) -
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्याचा उतारा म्हणून या वाघांचे त्याचठिकाणी व्यवस्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या समस्येच्या अभ्यासाकरिता गठीत करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसींना राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. यामुळे विदर्भातील वाघांचे सह्याद्रीच्या खोऱ्यात स्थानांतरित (रि-लोकेट) करण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.


चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांची संख्या वाढली आहे. ही संख्या सुमारे १२० आहे. यामुळे मानव-वाघ संघर्षाच्या घटना वाढल्या असून २००७ पासून जिल्ह्यामध्ये वाघाच्या हल्ल्यात १६७ लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणूनच येथील वाघांचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचे स्थानांतरण आणि निर्बीजिकरण करण्याचा उपाय वन विभागाने योजला होता. मात्र, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या 'राज्य वन्यजीव मंडळा'च्या बैठकीत या उपायांना नकार देऊन या समस्येच्या निराकरणासाठी वन्यजीव तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली. या समितीने अभ्यास करुन एक अहवाल तयार केला. या अहवालातील शिफारशींना मंगळवारी पार पडलेल्या 'राज्य वन्यजीव मंडळा'च्या बैठकीत मान्यता देण्यात आली.



या शिफारशींमध्ये चंद्रपूरातील वाघांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवून त्यावरील उपाययोजनांसाठी जिल्ह्याची चार क्षेत्रांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या क्षेत्रामध्ये जिथे वाघांसाठी संरक्षित क्षेत्र आहे आणि मानव-वाघ परस्परसंबंधाची नकारात्मकता कमी आहे, अशा क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ताडोबा-अंधारी, कन्हाळगाव या परिसराचा समावेश असून जिथे केवळ लोकांमध्ये जनजागृती करुन पर्यटकांना आकर्षित करण्याची उपाययोजना मांडण्यात आली आहे. दुसऱ्या क्षेत्रामध्ये वाघांच्या भ्रमणमार्गांच्या परिसराचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये ब्रम्हपूरी, मध्य चांदा या परिसराचा समावेश असून जिथे वाघांचा कायमस्वरुपी अधिवास होणार नाही आणि भ्रमणमार्ग सुरक्षित राहिल या दृष्टीने उपाययोजना करण्यास सांगितले आहे.


तिसऱ्या क्षेत्रामध्ये छोट्या तुकड्यातील वनक्षेत्रे, वन्यप्राण्यांमुळे पिक नुकसान होणाऱ्या आणि विखुरेल्या गावांसारख्या म्हणजेच ताडोबाच्या पश्चिमेकडील भागांचा समावेश करण्यात आला आहे. ज्याठिकाणीच्या वाघांना निर्णय घेऊन विदर्भातच किंवा राज्याबाहेर स्थानांतरित करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. तर, चौथ्या क्षेत्रात चंद्रपूर शहराचा आसपासचा परिसर म्हणजेच सी.एस.टी.पी.एस आणि डब्लू.सी.एल या कंपन्यांच्या परिसराचा समावेश करण्यात आला असून येथील वाघ स्थानांतरित करुन व्याघ्र अधिवासाला पुरक असलेला अधिवास नष्ट करण्याची शिफारस मांडली असल्याची माहिती या समितीचे सदस्य डाॅ. अनिष अंधेरिया यांनी दिली. याठिकाणी सात प्रजननक्षम वाघांचा अधिवास असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चंद्रपूरातील वाघांचे स्थानांतरण विदर्भामध्येच करावे अशी सूचना अहवालात नमूद केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे हे वाघ सह्याद्रीमध्ये स्थानांतरित होणार नाहीत.

सह्याद्रीत स्थानांतरण का नाही ?
या निर्णयामुळे विदर्भातील वाघ सह्याद्रीमध्ये स्थानांतरित करण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण, सह्याद्रीचे जंगल हे विदर्भातील जंगलापेक्षा वेगळे आहे. याठिकाणच्या डोंगराळ भागात विदर्भातील वाघ अधिवास करु शकत नाहीत. तसेच सह्याद्रीमध्ये वाघांच्या खाण्यासाठी आवश्यक असलेली तृणभक्षी प्राण्यांची संख्या मुबलक प्रमाणात नाही. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सह्याद्रीच्या खोऱ्यात वाघांची संख्या वाढवण्यासाठी पश्चिम घाटामधीलच स्थानिक वाघ आवश्यक आहे.

@@AUTHORINFO_V1@@