सह्याद्रीतून खेकड्याच्या ५ नव्या प्रजातींचा शोध; आंबा-ताम्हिणी-नाशिकमध्ये अधिवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2021   
Total Views |
crab _1  H x W:



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
गोड्या पाण्यामधील दुर्लक्षित जैवविविधता अधोरेखित करणारे एक संशोधन समोर आले आहे. पश्चिम घाटामधून गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या खेकड्यांच्या पाच नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. यामधील चार प्रजाती या महाराष्ट्रातील सह्याद्रीमधील प्रदेशनिष्ठ असून एक प्रजात ही गोवा आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी आढळते.

नव्याने शोधण्यात आलेल्या प्रजातींमधील दोन प्रजाती या 'घाटियाना' आणि तीन प्रजाती या 'सह्याद्रीना' कुळातील आहेत. हे संशोधन 'झूलाॅजिकल सर्व्हे आॅफ इंडिया'चे संशोधक समीर पाटी आणि 'ठाकरे वाईल्ड फाऊंडेशन'चे संस्थापक तेजस उद्धव ठाकरे यांनी केले आहे. फ्रान्सच्या 'नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री'ने प्रकाशित केलेल्या 'झूसिस्टेमा' या संशोधन पत्रिकेत मंगळवारी या शोधाचे वृत्त प्रकाशित झाले. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यात 'घाटियाना' कुळातील खेकडे आढळत असून आजवर या कुळामधून आठ प्रजाती ज्ञात आहेत. तर महाराष्ट्रातील सह्याद्रीमध्येच 'सह्याद्रीना' कुळातील खेकडे आढळत असून प्रजातींची संख्या १० आहे. मात्र, या शोधामुळे या दोन्ही कुळात प्रजातींची संख्या अनुक्रमे १० आणि १३ झाली आहे.
'घाटियाना' कुळातील नव्या प्रजातींचे नामकरण 'घाटियाना रौक्सी' आणि 'घाटियाना ड्यूरेली' असे करण्यात आले आहे. 'घाटियाना रौक्सी' ही गोवा आणि कर्नाटक राज्यामध्ये सापडत असून 'घाटियाना ड्यूरेली' ही प्रजात महाराष्ट्रातील साताऱ्यातील कोयना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा घाटामध्ये सापडते. 'घाटियाना ड्यूरेली' या प्रजातीचे नामकरण नामशेष होणाऱ्या प्रजातींसाठी संवर्धनाचे काम करणारे संवर्धनकर्ते जेराल्ड मालकॉम ड्यूरेल यांच्या नावे करण्यात आल्याची माहिती तेजस उद्धव ठाकरे यांनी दिली. ही प्रजात निशाचर असून ती झाडांच्या खोड्यांच्या छिद्रांमध्ये अधिवास करते. तर 'सह्याद्रीना' कुळातील 'सह्याद्रीना इनोपिनाटा' या प्रजातीचा महाबळेश्वरमधील धोबी धबधब्यातून, 'सह्याद्रीना केशारी' प्रजातीचा नाशिकच्या ब्रम्हगिरीमधून आणि 'सह्याद्रीना ताम्हिणी' प्रजातीचा ताम्हिणी घाटामधून शोध लावण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@