'क्रीम-कलर्ड कोर्सर' पक्ष्याचे महाराष्ट्रात प्रथमच दर्शन

    दिनांक  29-Sep-2020 19:43:49   
|
cream colour coursera _1&


'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य' परिक्षेत्रात आढळ 

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - धाविक पक्ष्याच्या प्रजातीमधील 'क्रीम-कलर्ड कोर्सर' पक्ष्याची महाराष्ट्रातून प्रथमच नोंद झाली आहे. 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'च्या परिक्षेत्रात सोमवारी हा पक्षी थकलेल्या अवस्थेत आढळून आला. मंगळवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र, वाळवंटी प्रदेशातील हा पक्षी मुंबई खाडी किनारी आढळल्याने पक्षी अभ्यासकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
 
गेल्या काही महिन्यामध्ये हवामानात झालेल्या बदलांमुळे अनेक सागरी आणि परराज्यातील पक्षी महाराष्ट्रात आढळून आले आहेत. आता 'क्रीम-कलर्ड कोर्सर' या पक्ष्याची महाराष्ट्रातून प्रथमच नोंद करण्यात आली आहे. सोमवारी घणसोली येथील खाडी क्षेत्रानजीकच्या चिखलात हा पक्षी थकलेल्या अवस्थेत पडल्याचे मच्छीमारांना दिसले. त्यांनी याविषयीची माहिती 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'तील अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर या पक्ष्याला ऐरोलीतील 'किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रा'त उपचारासाठी दाखल करुन घेण्यात आले. मात्र, मंगळवारी सकाळी या पक्ष्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एन.जी.कोकरे यांनी दिली.
 
'क्रीम-कलर्ड कोर्सर' पक्षी वाळवंट अधिवासातील असून राजस्थानमध्ये हा पक्षी सर्वसामान्यपणे आढळून येतो. आजतागायत या पक्ष्याच्या वावराची नोंद गुजरातच्या कच्छच्या रणापर्यंत करण्यात आली असून तो महाराष्ट्रात प्रथमच सापडल्याची माहिती तज्ज्ञ पक्षीनिरीक्षक आणि अभ्यासक आदेश शिवकर यांनी दिली. हा पक्षी प्रामुख्याने वाळवंटी अधिवासात राहत असल्याने मुंबईत तो भरकटलेल्या अवस्थेत आल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. तसेच अशा प्रकारे भरकटलेल्या अवस्थेत आलेले पक्षी थकव्यामुळे सहजा जीवंत राहत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. हा पक्षी महाराष्ट्रात प्रथमच सापडल्याने त्याच्या मृत शरीराचे टॅक्सीडर्मीच्या स्वरुपात जतन करण्यात येणार असल्याचे, कोकरे यांनी सांगितले.
 
 

कोर्सर पक्ष्यांविषयी
धाविक या पक्ष्यांमध्ये भारतीय धाविक (इंडियन कोर्सर), जेर्डन कोर्सर आणि 'क्रीम-कलर्ड कोर्सर' या तीन प्रजातींचा समावेश होतो. यामधील भारतीय धाविकाचे दर्शन महाराष्ट्रातील माळरान आणि गवताळ प्रदेशांवर सहजपणे होते. 'जेर्डन कोर्सर' या पक्ष्याच्या राज्यात दुर्मीळ नोंदी आहेत. 'क्रीम-कलर्ड कोर्सर' हा पक्षी आफ्रिका ते इजिप्तपासून राजस्थानपर्यंतच्या पट्ट्यामधील वाळवंटी प्रदेशात आढळून येतो. तो कळपाने राहणारा पक्षी आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.